भटक्या विमुक्तांना जीवनशिक्षण देण्याची कर्तव्यभावना, जिद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

कुर्‍ह्याच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतर्फे 2 दशकांपासून सुरु आहे पवित्र ज्ञानयज्ञ


 
 
कुर्‍हा ता.मुक्ताईनगर : 
 
पोटासाठी पिढ्या अन् पिढ्या वणवण भटकणार्‍या आणि शाळेचे तोंडही न पाहू शकणार्‍या निरक्षर भटक्या विमुक्त समाजबांधवांच्या पुढच्या पिढीच्या साक्षरतेसाठी येथे परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतर्फे मोठा ज्ञानयज्ञ गेल्या 2 दशकांपासून सुरु आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या या संस्थेद्वारे संचलित स्व.लक्ष्मीनारायण चौधरी भ.वि.जा.ज. प्राथमिक आश्रमशाळा आणि स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालयाने हे आश्वासक परिवर्तन निरपेक्ष भावनेने आरंभले आहे.
 
अध्यक्षपद ध्येयवादी व समर्पित स्वयंसेवक प्रमोद गणपतराव शिवलकर (विहिंपचे मुक्ताईनगर प्रखंड अध्यक्ष) आणि सचिवपदाची जबाबदारी भालचंद्र दिनकर कुळकर्णी यांच्याकडे आहे. समर्पित 22 अध्यापक आहेत.
 
कुर्‍हा हे जळगाव जिल्ह्याचे पूर्वसिमेवरील सुमारे 15 हजार लोकसंख्येचे गाव. मुक्ताईनगरपासून तब्बल 35 कि.मी. दूर...पूर्वी आणि जणू खान्देशातील ‘अंदमान’. गेल्या काही वर्षातील कमी आणि अनियमित पावसामुळे तसा दुष्काळी गणला जाणारा हा परिसर.
 
माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंना 1978 च्या विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर देत दमछाक करायला लावणारे तत्कालीन जनसंघ कार्यकर्ते स्व.अशोक फडके ( ) यांंच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्याचा अमीट ठसा उमटणारे तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढावो’ राष्ट्रीय आंदोलनाचे संयोजक, भाजपचे विभागीय संघटनमंत्री आणि प्रयोगशील शेतकरी डॉ.राजेंद्र फडके यांच्या समवेतच्या जुन्या जाणत्या संघ-जनसंघ कार्यकर्त्यांचे गाव...तत्कालीन जनसंघाचे कार्यकर्ते व सरपंच पुरणमल चौधरी यांनी 1969 मध्ये एकहाती ग्रामपंचायतीत पॅनेल एकहाती विजयी करुन खळबळ माजवून देत या गावाचे नाव राजकीय वर्तुळात गाजवले.
 
मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावर गावाच्या अलिकडे असलेली संस्थेची दुमजली भव्य वास्तू लक्ष वेधून घेते . 1995 मध्ये राज्य सरकारने भटक्या विमुक्त जमातींसाठी निवासी शैक्षणिक आश्रम शाळा सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले.
 
तसा प्रस्ताव पाठवल्यानुसार रितसर खातरजमा, चौकशी, पाहणी करुन तो जूनमध्ये मंजूरही झाला, सप्टेंबरमध्ये अनुमतीही मिळाली. शाळेसाठी पुरणमलजींनी दान दिलेली 2 एकर जागा व परिसरातील जनतेचे कैवारी ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या मौलिक सहकार्यामुळे गती आली.
 
सुरुवातीला संघ व तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुरणमल चौधरी यांंच्या मालकीच्या खोरी गाव शिवारातील पत्री, टिनाच्या शेडमध्ये ही निवासी आश्रमशाळा सुरु झाली. पिढ्यानपिढ्या निरक्षर ठेलारी परिवारातील 19 बालविद्यार्थी (11 मुलं-8 मुली) पहिल्याच वर्षी प्रवेशित झाले.
 
 
कार्यकर्त्यांचा संपर्क आणि आंतरिक तळमळीचा हा जणू सुखद धक्काच! पुढे 2 वर्ष ती कार्यकर्त्यांनी स्वत: आणि लोकसहभागातून सुरुच ठेवली... कुशल अध्यापनतंत्र आणि शिक्षकांची तळमळ याचा परिणाम दुसर्‍या वर्षी पहिलीत अनिवासी 36 विद्यार्थी दाखल झाले आणि पुढे नैसर्गिक वाढ होत गेली.
 
सध्या विद्यार्थी संख्या 974 असून त्यात भटकेविमुक्त समूहातील निवासी 120 विद्यार्थ्यांसह 550 आहेत, त्यांच्या निवास,भोजनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तसेच 2 महिला स्वयंपाकी, 1 मदतनीस निवासी वसतीगृह अधीक्षक आहेत. (उर्वरित विद्यार्थी अन्य इतर व खुल्या प्रवर्गातील )
 
 
प्राथमिक व माध्यमिक विभागाला फी नाही...सेमीवर्गाला पाचवी, सहावी, सातवीला वर्षाला फक्त 1500 आणि आठवी, नववी, दहावीच्या वर्गाना वार्षिक फी फक्त 2000 हजार रु. आहे. अन्य आवश्यक खर्च लोकसहभागातून भागवला जातो.
ऑक्टोबर 97 मध्ये कै.अशोक फडके माध्यमिक विद्यालय सुरु झाले. त्यात आठवी, नववी, दहावीचे प्रत्येकी 2 असे 6 आणि सेमीचे प्रत्येकी 1 असे 3 वर्ग आणि विद्यार्थी संख्या 600 आहे. विद्यार्थिनींची संख्या निम्मे आहे.
 
 
सुजाण, जागृत, ज्ञानी, बहुश्रुत नागरिकांच्या जडणघडणीसाठी भारतीय संस्कार व संस्कृतीची जपणूकसाठी वर्षभर विविध उपक्रम होतात. (संपर्क- प्रमोद शिवलकर -7620632516)
चर्चेअंतीचे वास्तव: संघ कार्यकर्त्यानी स्वीकारले आव्हान...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते संघाच्या उत्सवानिमित्त वाडीवस्ती उपक्रमात ठेलारी बांधवांच्या वस्त्यांवर (जे मोकळ्या शेतांमध्ये जमिनीचा कस वाढावा, यासाठी पशूधन, शेळ्या मेंढ्या काही दिवस बसवतात) गेले असता चर्चेत 90 टक्केच्या वर ठेलारी पुरुष आणि महिला वर्ग पूर्णत: 100 टक्के निरक्षर आणि त्यांची पुढची पिढी तर शाळाच माहित नसल्याने पूर्ण निरक्षर आढळली, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे, या उदात्त हेतूने त्यांना साक्षर करण्याचे आव्हान पेलावे, या विचारप्रवाहाचा परिणाम 1995 मध्ये ‘परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था’ स्थापन झाली. या वास्तूचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते नितीन गडकरी,आ.एकनाथराव खडसे ,ज्येष्ठ समाजसेवी डॉ.अविनाश आचार्य, संस्थेचे तेव्हाचे व विद्यमान उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, अन् 2002 मध्ये ही वास्तू पूर्ण होत येथे शाळा भरु लागली.
@@AUTHORINFO_V1@@