थेंबभर पाण्याची कृतिशील कहाणी...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतील या ओळींमध्ये ‘शेतकर्‍याचा जन्मही मातीत झाला. मातीचा दास म्हणून सेवा करतो आणि मृत्यूही मातीतच होतो’ ही जीवनरीत उत्कटतेने व्यक्त होते.
 
याप्रमाणेच श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांनी वाकोदसारख्या छोट्याशा गावातून शेतीच्या माध्यमातून अवघ्या ब्रह्मांडाला गवसणी घातली. मातीतून सोने उगविणार्‍या मोठ्याभाऊंनी मातीचेच सोने केले.
 
कृषिक्षेत्रात विविध प्रयोग, संशोधन करीत असताना ‘शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू’ यावे हिच त्यांची आंतरिक इच्छा आणि तळमळ होती.
 
शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठेवून कृषिक्षेत्राची कास धरत आदर्श कार्यसंस्कृतीच्या आगळ्यावेगळ्या श्रमसंस्कारासह जैन उद्योग समूहाचा विस्तार सातासमुद्रापार केला. मोठेभाऊंच्या कृषिक्षेत्रातील द्रष्टेपण सर्वांना मार्गदर्शक ठरण्यासारखेच. भाऊंच्या 81 व्या वाढदिवशी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन...


बळीवंत आम्ही, मातीतला दास
धरलेली कास, मरणाची

 
 
 
पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर सनदी अधिकारी होण्याची संधी होती मात्र आईने ‘नोकरी करण्यापेक्षा तू असे काही निर्माण कर ज्यात, आपल्या परिवाराचे पोट भरेल इतकेच नव्हे तर पशू, पक्ष्यांचेही पोट भरेल’ या प्रेरणेतून भाऊंनी जैन उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली.
 
सुरूवातीला रॉकेलचा व्यापार, पेट्रोल पंप, खते, बी-बियाण्यांची एजन्सी, ट्रॅक्टर विक्री, पीव्हीसी पाईपची एजन्सी, पपईच्या चिकापासून पपेनची निर्मिती त्यानंतर पीव्हीसी पाईपची निर्मिती, ठिबक तुषार सिंचन साहित्याची निर्मिती, बायोएनर्जी, सौर कृषी पंप असा हा सगळा प्रवास विलक्षण आहे. मनुष्य, प्राणी, वनस्पती, हवा, निसर्ग या सर्वांना सांभाळून समाजाच्या प्रत्येक घटकांशी बांधिलकी जोपासत सर्वसमावेशक विकास साधण्याची किमया कर्मयोगी मोठ्याभाऊंनी केली.
 
 
भारतीय संस्कारातील मूल्यांना आधुनिकतेची जोड देत त्यांनी जैन इरिगेशनमधील सहकार्‍यांना कठोर परिश्रमाची शिकवण दिली. भाऊंनी संस्कारित केलेल्या कार्यसंस्कृतीतून ‘कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी!’ या ब्रीद्रवाक्यानुसार जैन इरिगेशन वैश्विक स्तरावर यशस्वी वाटचाल करीत आहे.
 
कठोर परिश्रम, संशोधन हेच भाऊंचे जीवन. जीवनमान समृद्ध करणार्‍या भूमिपुत्रांच्या हिताचा विचार करणारा जैन उद्योग समूह जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला आहे.
 
मोठ्याभाऊंनी दूरदृष्टीतून शेती, शेतीपूरक उद्योग, जैन हिल्सवरील पाणलोट क्षेत्र, गिरणा नदीवरील बंधार्‍यासह उजाड टेकड्यांवर हिरवाई, वनराई फुलवली. केवळ दगड, मातीच्या टेकड्याच हिरव्यागार केल्या नाहीत तर माणसांची मनेही त्यांनी हिरवी केलीत.
 
‘हिरवाईने नटलेली माझी सृष्टी हेच माझे वैभव आहे!’ असे म्हणणार्‍या कर्मयोगी मोठ्याभाऊंचे नाते मातीच्या माध्यमातून ब्रह्मांडाशी होते.
 
ब्रह्मांडातील तेजस्वी, तपस्वी अवघे विश्व प्रकाशमय करणार्‍या सूर्याप्रमाणे असलेले त्यांचे कार्य, विचार, संस्कार, आजही जैन कुटुंबिय व सहकारी जपत आहेत.
 
 
भाऊ हे अमेरिकेमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. तेथे शेती सुधारणा व आधुनिक कृषितंत्रांच्या प्रसाराचं कार्य करणारे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार व माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याशी भेट झाली.
 
अण्णासाहेब शिंदे यांनी भाऊंबद्दल असे उद्गार काढले की, ‘भवरलाजींसारखी 100 माणसे घडणार असतील तर या देशाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.’ हे उद्गार भाऊंनी कर्तबगारीने खरे व शेतकर्‍यासंदर्भात सार्थ करून दाखविले.
 
इस्त्राईल, अमेरिकेमधील तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर आणल्याने 50 लाखाच्यावर शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. पाण्याचे महत्त्व भाऊंनी ओळखले, तसे सूर्यशक्तीचे ही महत्त्व ओळखले.
 
त्यांंनी सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप जैन इरिगेशनच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांकडून तयार करून घेतला. यामुळे दुर्गम भागातही अल्पभूधारक शेतकर्‍यांना आपल्या शेतात फळबागा फुलविता आल्या.
 
सर्वसामान्य शेतकरी मोठा झाला तरच मी मोठा होईल, ही व्यापक भूमिका त्यांनी मनाशी पक्की बांधली होती. आर्थिकदृष्ट्या शेतकरी मजबूत व्हावा यासाठी उत्पादित मालावर प्रक्रिया करून देशासह परदेशात निर्यात केली.
 
त्यासाठी जागतिक दर्जाचे फळप्रक्रिया उद्योग उभारले. पांढर्‍या कांद्याच्या माध्यमातून करार शेतीचे पथदर्शी मॉडेल मांडले. गुणवत्ता, विश्वास आणि पारदर्शकता या जीवनमूल्यांचा आदर्श पेरत करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
 
भाऊंकडे विलक्षण दूरदृष्टी होती. उतीसंवर्धनात बायोटेक्नॉलॉजीचे महत्त्व त्यांनी ओळखले आणि भारतातील सर्वात मोठी लॅब उभारली.
 
जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या टिश्युकल्चर केळीच्या ‘ग्रॅण्ड नाईन’ या व्हरायटीने शेतकर्‍यांचे जीवनमान बदलून गेले. जळगाव जिल्हा भारतात क्रमांक एकचा केळी उत्पादक जिल्हा म्हणून अल्पावधीतच नावारुपास आला.
 
यासह डाळिंब, स्ट्रॉबेरी, मोसंबी टिश्युकल्चर रोपांमुळे शेतकर्‍यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग गवसला. ऊतीसंवर्धन व ठिबक सिंचन या दोन्ही तंत्रांच्या संयोगातून केळीस लागणार्‍या एकूण पाण्यापैकी साडेतीन पटीने पाण्याची बचत आम्ही करू शकलो; त्याबरोबरच विजेचाही वापर 200 टक्क्यांनी कमी करू शकल्याचे समाधान त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते.
 
 
शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, संशोधनाची माहिती होण्यासाठी जैन हिल्स येथे जैन गुरूकुल प्रशिक्षण केंद्र सुरू केले. प्रात्यक्षिकासाठी डेमोस्ट्रेशन व्यवस्था केली.
 
शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत कृषितंत्रज्ञान पोहोचवावे यासाठी तालुकास्तरावर कृषितज्ज्ञ नेमले. जगातील विविध कृषी विद्यापीठाशी करार केले. शेतकर्‍यांना शेतीविषयी मार्गदर्शन माहिती मिळण्यासाठी ‘भूमिपुत्र’ आणि ‘कृषिजल’ ही कृषिक्षेत्राला वाहिलेली नियतकालिके त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झाली.
 
 
भाऊंची जन्मभूमी वाकोद. येथे जलसंधारण आणि जलरक्षण हे भाऊंचे स्वतःचे काम होय. कांताई बंधार्‍याची निर्मिती म्हणजे कृषी आणि जल क्षेत्रातील सर्वोच्च योगदान ठरावे. त्या माध्यमातून आजूबाजूच्या खेड्यांचा विकास झाला.
 
 
महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प म्हणून कांताई बंधार्‍याकडे बघितले जाते. महात्मा गांधीजींच्या विचारांप्रमाणे ‘ग्रामीण भागातील समस्या दूर करण्याचे ते महत्त्वपूर्ण पाऊल’ आहे.
 
 
कृषिक्षेत्राला पोषक ठरणार्‍या पक्षी-प्राण्यांचे, किटक-मुंगी-मधमाशांचे संरक्षण आणि संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी मानून ती स्वीकारली.
 
पक्षी, प्राण्यांबाबत भाऊ म्हणायचे ‘आपण त्यांच्या अधिवासात आहो ते आपल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यांच्यापासून होणारे नुकसानही आपण सहन केले पाहिजे.’ यातून भाऊंचे पशू-पक्ष्याबाबतची जवळीकीचे नाते कळते.
 
 
भाऊंच्या शेतीतील योगदानाची सकारात्मकपणे घेतलेली दखल म्हणजे त्यांना लाभलेले असंख्य पुरस्कार. सिंचन तंत्राचा वापर व त्याचा प्रसार यासाठी असणार्‍या अत्यंत गौरवास्पद अशा क्रॉफर्ड रीड पुरस्काराने भाऊंना सन्मानित करण्यात आले.
 
 
भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराव्दारे त्यांच्या कार्याची दखल घेतली. यशवंतराव प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाल्यावर भाऊंनी सांगितले की, ‘शेतकर्‍यांसाठी चांगलं काम करणार्‍या या प्रतिष्ठानने मला दिलेल्या पुरस्काराच्या रकमेत उजव्या बाजूचे एक शून्य वाढवून ही रक्कम आदरपूर्वक देत आहे’, आणि भाऊंनी दहा लाखाची रक्कम दिली.
 
 
यावरून शेती, शेतकर्‍यांप्रती भाऊंचे असलेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. विद्येला विनयाची, साधनेला सातत्याची, विचाराला आचाराची, श्रद्धेला बुध्दीची, सुखाला शांतीची, संकल्पाला सिद्धीची, सौंदर्याला शालिनेची आणि प्रतिष्ठेला सेवेची साथ-संगत लाभते तेव्हाच पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांच्यासारखे कृतज्ञ भूमिपुत्र घडतात.
 
 
त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. म्हणूनच कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात याची प्रचितीच शब्दा शब्दातून येते. तीच पाऊले देखणी असतात जी ध्यासपंथे चालतात आणि वाळवंटातसुद्धा स्वस्तिपद्मे रेखाटतात..
देवेंद्र पाटील-
जैन इरिगेशन सिस्टीम्स, जळगाव
9673934618
@@AUTHORINFO_V1@@