क्या हार में, क्या जीत में...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
वाजपेयी संसदेत म्हणाले होते की, ‘सरकारे आएगी-जाएगी, पार्टीयां बनेगी-बिगडेगी, लेकीन ये देश रहना चाहिए।’ हा विचारच आजवरच्या साऱ्या प्रवासाचा मूळ गाभा आहे. दोन खासदार ते स्पष्ट बहुमत असा प्रवास करणाऱ्या पक्षाला हे तीन राज्यांतील पराभव असं सहजपणे संपवू शकतील काय? ते इतकं सोपं आहे काय? या प्रश्नांचा विचार २०१९ डोळ्यांपुढे ठेऊन आताच अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्यांनी करणं गरजेचं आहे.
 

क्या हार में, क्या जीत में,

किंचित नहीं भयभीत मैं

संघर्ष पथ पर जो मिले,

यह भी सही वह भी सही...

 

शिवमंगल सिंह सुमन यांच्या या कवितेचा संदर्भ अनेकदा अटलजींच्या भाषणांत असायचा. स्वतः कवी असलेल्या वाजपेयींची ही खास आवडती कविता होती. याचं कारण या कवितेसारखेच ते जगले होते. कित्येक दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने अशा खूप साऱ्या हार-जीत पाहिल्या, पचवल्या. वाटेवरचे काटे सहन करत हा पक्ष पुढे जात राहिला आणि त्याचं फळदेखील पक्षाला मिळालं. आज कदाचित पुन्हा या ओळी आठवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या महत्त्वाच्या राज्यांत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव पाहून साहजिकच भाजप कार्यकर्ते, भाजपप्रेमी आणि हितचिंतकांना दुःख झालं असेल. अशा वेळी अटलजींच्या या खास कवितेचं स्मरण करणं आवश्यक ठरतं.

 

यह हार एक विराम है, जीवन महासंग्राम है’ अशा ओळींनी या कवितेचा प्रारंभ रचलेला आहे. या तीन राज्यांतील पराभव हा एक टप्पा आहे. परंतु, भविष्यात याहूनही अनेक घनघोर महासंग्राम अद्याप लढायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या, त्या सर्वंकष विकास, पारदर्शी कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त शासन आणि खंबीर नेतृत्व या मुद्द्यांवर. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने मग भाजपला भरभरून मतदान केलं. त्यावेळी जनतेने जो विश्वास पक्ष आणि पक्षनेतृत्वावर दाखवला, तो सार्थ ठरवणं हा काही एका रात्रीचा खेळ नाही. तो पल्ला प्रदीर्घ आहे आणि असंख्य संकटांनी भरलेला आहे. तो खऱ्या अर्थाने ‘महासंग्राम’ आहे, तोवर वाटेत असे जय-पराजय येणारच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक वर्ग असा असतो, जो सुतावरून स्वर्ग गाठतो. किंबहुना, त्याला तेच आवडतं. त्यामुळे, या तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला म्हणजे ‘आता सगळं संपलं,’ ‘२०१९ काही भाजप जिंकत नाही,’ वगैरे बालीशपणा तातडीने सुरू झालेला दिसतो. तो सुरू होणारच, त्यात अनपेक्षित काहीच नाही. परंतु, राजकारण हे असं एखाद्या वातानुकूलित खोलीत बसून कल्पनांची कारंजी उडवून होत नाही. राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो.

 

विशेषतः महाराष्ट्राने हा शक्यतांचा खेळ जवळून पाहिला आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेना सोडून गेले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते सेना सोडून गेले, पोटनिवडणुकांत सेनेचे मोठे पराभव झाले. त्यानंतर ‘आता शिवसेना संपली’ असे निष्कर्ष काढून कित्येक मंडळी मोकळी झाली होती. तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर, क्षमतेवर रोज प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तरमहापालिका निवडणुकांनंतर शिवसेना संपेल’ असं म्हणून मोकळेही झाले. प्रत्यक्षात काय झालं? सेनेच्या त्या पडझडीला दहा-बारा वर्षं झाली. या काळात उद्धव ठाकरेंनी शिवसेना उत्तमरित्या हाताळली; इतकंच नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’तही शिवसेनेला ६३ जागा आणि दुसऱ्या क्रमांकाचं स्थान त्यांनी प्राप्त करून दिलं. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, दोन-चार लोकांनी वल्गना केल्या म्हणून काही सगळं संपत नसतं किंवा निर्माणही होत नसतं. त्यासाठी समोर ध्येय असावं लागतं, त्या ध्येयपूर्तीसाठी कार्यक्रम असावा लागतो, तिथे कसं पोहोचायचं हे सांगणारा नेता असावा लागतो आणि मुख्य म्हणजे त्या नेत्यापाशी आणि त्याच्या पाठीराख्यांपाशी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती असावी लागते. ती असेल तर जगात कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही, संपवू तर नाहीच नाही. भाजपकडे हे सगळं आहे का, याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा आणि असेल, तर मग या अशा हार-जीत विसरून पुढील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने ‘कामाला’ लागावं.

 

आता भाजप संपणारअसं म्हणणाऱ्या अनेकांच्या दृष्टीने ही लढाई २०१४ मध्ये सुरू झाली आहे. परंतु, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, खरी लढाई ही १९२५ मध्येच सुरू झाली होती. २०१४ आणि त्यापुढील विचार करणं म्हणजे हिमनगाचं वर तरंगणारं टोक पाहून त्याच्या वजनमापाबद्दल अंदाज लावण्यासारखं आहे. केवळ एक पक्ष म्हणून आणि एखाददुसरी निवडणूक म्हणून याचा विचार करायला गेलं तर हे असंच होतं. कारण, तो केवळ एक पक्ष नाही. त्यामध्ये बीज आहे ते संघ परिवाराचं, राष्ट्रवादाने भरलेल्या विचाराचं. तीन तीन बंद्या, कारावास, आणीबाणीतील अनन्वित छळ आणि असंख्य हालअपेष्टा सहन करूनही ही विचारधारा जिवंत राहिली, इतकंच नाही तर दिवसेंदिवस अधिक वाढत गेली आणि एके दिवशी थेट देशाच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक केंद्रस्थानी आली. याच विचारांना मातृस्थानी मानणाऱ्या पक्षाने एकेकाळी अवघे २ खासदार निवडून आलेले पाहिले. ५४३ पैकी केवळ २! त्यानंतर पुढच्या तीस वर्षांत हा पक्ष स्पष्ट बहुमतात सत्तेत जाऊन बसला होता. हा इतिहास फार जुना नाही. तुम्ही-आम्ही सर्वांनी जवळून पाहिलेला आहे.

 

चाहे हृदय को ताप दो, चाहे मुझे अभिशाप दो,

कुछ भी करो, कर्तव्य पथ से किंतु भागूंगा नहीं..

 

शिवमंगल सिंह यांच्याच कवितेच्या शेवटच्या भागातील या ओळी. वाजपेयी संसदेत म्हणाले होते की, ‘सरकारे आएगी-जाएगी, पार्टीयां बनेगी-बिगडेगी, लेकीन ये देश रहना चाहिए।’ हा विचारच आजवरच्या साऱ्या प्रवासाचा मूळ गाभा आहे. त्याचं बीज अस्सल आहे. दोन खासदार ते स्पष्ट बहुमत असा प्रवास करणाऱ्या पक्षाला हे तीन राज्यांतील पराभव असं सहजपणे संपवू शकतील काय? ते इतकं सोपं आहे काय? या प्रश्नांचा विचार २०१९ डोळ्यांपुढे ठेऊन आताच अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्यांनी करणं गरजेचं आहे. या निकालांमुळे दुःखी झालेले भाजप कार्यकर्तेदेखील हे समजून घेतील, आणि ‘कर्तव्य पथावरून’ अविचलपणे वाटचाल करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@