बजाज फायनान्सचा डेटा चोरी करून घेतले कर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 

 
मुंबई : बजाज फायनान्सच्या ग्राहकांचा डेटा बजाजच्या वेब पोर्टलवरून चोरून ग्राहकांच्या नावाने कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ग्राहकांचा डेटा वापरून त्यांच्या नावाने कर्ज घेण्याऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून या तिघांवर मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
 

बजाज फायनान्स कंपनीकडून ग्राहकांना बजाजच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. कर्जासाठी अर्ज करणे, अर्जदारांचे कर्ज मंजूर करणे या सर्व प्रक्रिया बजाजच्या वेब पोर्टलवरून ऑनलाईन पार पाडल्या जातात. यासाठी बजाजच्या सर्व शोरुम्समध्ये वेब पोर्टलच्या यूजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. बजाजच्या वेबपोर्टलवरून ग्राहकांच्या नावाने कर्ज घेतले जात होते. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीदेखील खरेदी केली जात होती. कंपनीकडून ग्राहकांना यासंबंधी विचारणा केली जात होती. ही फसवणूक करणारे तिघेजण बदलापूर आणि वरळी परिसरात राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मालमत्ता कक्षाचे सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना ही माहिती मिळाली होती.

 

मालमत्ता कक्षाच्या पथकाने वरळी आणि बदलापूर येथे छापा टाकून या तिघांना पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. अबूबकर मोहम्मद साब शेख, रमीज हुसेन मोहम्मद शेख, राजेश बाबुराव वडलुरी अशी या तीन आरोपींची नावे आहेत. या तिघांनी आतापर्यंत बजाज फायनान्स कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून १५ जणांच्या नावाने कर्ज घेऊन आहे. भोईवाडा, अँटॉप हिल, विक्रोळी, भांडूप, खेरवाडी, भाईंदर, ठाणे- कोळसेवाडी येथील पोलीस स्टेशनमध्ये या तीन आरोपींच्या नावे इतरही काही गुन्हे दाखल आहेत.

 

या तीन आरोपींपैकी रमीज शेख हा लालबाग येथील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुममध्ये नोकरी करत होता. बजाज फायनान्सच्या ग्राहकांचे तो काम पाहायचा. नोकरी सोडल्यानंतर त्याने वेब पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बजाज फायनान्सच्या ग्राहकांचा डेटा मिळवला. त्याद्वारे बनावट कागदपत्रे बनवून अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे हप्ते भरण्यासाठी ग्राहकांना फोन येऊ लागले. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@