विहित कर्म मी नित्य करावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |
 

कर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करतात आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे.

 

भगवद्गीता ग्रंथ हा नुसता वाचण्याचा ग्रंथ नाही, तर तो आचरण्याचा ग्रंथ आहे. काही लोकांना वाटतं की, ‘अध्यात्म’ आणि ‘आचरण’ या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु, असं अजिबात नाही. गीता जगायची असते. गीता जगण्यासाठी आधी तिचे आकलन व्हायला हवे. त्यासाठी ती वारंवार वाचणं आवश्यक असतं. वाचून मनन, चिंतन घडलं की, मग आचरण करता येतं. ग्रंथ हा पारायणकर्त्याशी संवाद साधतो. तो केव्हा संवाद साधतो किंवा बोलतो? ग्रंथामध्ये डूब घेतली की नूतन अर्थ हाती येतो. भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली? रणांगणावर म्हणजे, कौरव-पांडवांच्या युद्धप्रसंगी सांगितली. जेव्हा अर्जुन आजूबाजूला आपले नातेवाईक पाहून गांगरला. त्याने धनुष्य खाली ठेवले आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, “मी हे युद्ध करणार नाही. मला हे राज्य नको. आपल्या कुळाचा संहार करणारं राज्य काही कामाचं नाही. मी त्यांना मारण्याचं पाप करणार नाही.”

 

भगवान हसून म्हणाले, ‘’अरे, तू यांना मारणारा कुणीही नाहीस. तू मारलं नाहीस तरी, ते मरणारच आहेत. मी त्यांना मारणारच! उगाच ’मी’पणा कशाला आणतोस? कर्तृत्व स्वत:कडे का घेतोस? कर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करतात आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे संघर्षमय असतं. म्हणजेच तना-मनाचं युद्ध चालू असतं. आपल्याला वाटतं, आत्ताच्या काळात युद्धं कुठली आली? संत तुकाराम महाराज म्हणतात,

 

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

अध्यात्म अंगी बाणवण्यासाठी ते मनात मुरावं लागतं ना! रात्रंदिवस कोणते युद्धाचे प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात आले असतील? जीवनात कठीण, अवघड प्रसंग कमी येतात का? कठोर परीक्षा घेतली जाते. युद्ध कुणाशी? आपल्याच मनातील कामाशी, क्रोधाशी लढावं लागतं. मद-मत्सराशी दोन हात करावे लागतात. मोह-लोभाला परतवून लावण्याची पराकाष्ठा करावी लागते. सगळ्यात लवकर न मरणारा अहंकार! त्याला बाणांनी कितीही घायाळ केलं तरी त्याचा अंत होत नाही. त्यामुळे प्रपंच व परमार्थ यामध्ये विजय मिळवणं कठीण होऊन बसतं. षड्रिपू, षड्विकारांशी लढता लढता माणूस थकून जातो.

 

गीतेमध्ये लढणारा अर्जुन आणि आपण वेगळे नाही. अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंतानं उपदेश करून लढण्याला बळ दिलं. आपल्याला गीता बळ देते. कलियुगात तर युद्धाची वेळ वारंवार येते. म्हणूनच भगवद्गीता पठण करून ती समजून घेणं गरजेचं आहे. गरज वाटली की, ती पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करतोेच. ही गरज वृद्धावस्थेतच असते असे नसून ती अगदी तारुण्य, उमेदीच्या काळापासूनच असते. काय करावं? कसं करावं? कधी करावं? या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये सापडतात. संभ्रमित अवस्था असणारा तो अर्जुन! ही अवस्था अधांतरी ठेवणारी, लोंबकळत ठेवणारी अवस्था असते.ती संपवण्यास साहाय्य करणारी गीता आहे.

 

विहित कर्म मी नित्य करावे ।

आस नको चित्ती॥

 

आसरहित, कामनारहित विहित कर्म सहजपणानं घडलं पाहिजे. निषिद्ध कर्म कोणती ती समजून घेऊन पुन्हा करायची नाहीत हा निश्चय केला पाहिजे. भगवंत सांगतात की, सदगुरूंची प्राप्ती झाली की, कर्माची बाधा होऊ न देता मार्गक्रमण करणं शक्य होतं. सदगुरू तो मार्ग दाखवतात इतकंच नाही, तर ते बोट धरून घेऊन जातात. सद्गुरू प्राप्ती होऊन भागत नाही, तर सद्गुरूंची कृपा प्राप्त होणं आवश्यक आहे. एकदा कृपा झाली की, अवघड असं काही उरतचं नाही. प्रत्येक प्रसंगात युद्धात यश नक्की मिळतंनित्य उपासना करणारा उपासक हा जीवनात प्रगती करतो. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये पुढे जातो. ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ या दोन्ही स्तरावर त्याला यश मिळतं. अध्यात्म हे सांगण्यासाठी नाही, तर ते आचरणात आणून अनुभवण्यासाठी आहे. तरीदेखील भगवंतानं गीता सांगितली. सामान्य माणसाला कोणीतरी समजावून सांगितल्यावर कळतं. एकदम अनुभवायला कसं येईल? त्यामुळे भगवंताचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. हा संवादात्मक ग्रंथ आहे. श्रीकृष्ण व अर्जुन यांचा सुरेख संवाद आहे. संवाद साधला की, त्यामधून समस्या सुटतात म्हणून सुसंवाद साधावा, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात.

मानव जन्म, नरजन्माचं सार्थक, भगवंताची भक्ती करून मुक्तीचा, मोक्षाचा लाभ करून घेण्यात आहे. ज्ञानप्राप्ती झाली की, कर्म बाधत नाहीत. त्यामुळे कर्मवासनेला जन्म देत नाहीत. आत्मज्ञानाचा प्रकाश सर्वत्र प्रसरला की, अज्ञानाचा मागमूस, अंधार नष्ट होतो. कर्माचं कर्तृत्त्व आपोआप गळून पडतं. ‘मी’पणा संपून जातो. हा अवघड प्रवास सोप्पा करण्याचं काम गीतेसारखा महान ग्रंथ करतो, यात शंका नाही. ग्रंथसागराच्या तळाशी असणारे अमूल्य मोती प्राप्त होण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करणं प्रत्येक माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनाची ओंजळ वाळूने भरायची की मोत्याने खुलवायची हे आपल्याच हातात आहे.

 
-  कौमुदी गोडबोले
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@