‘अनुभूती’ ही समाजपरिवर्तनाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |



 
 
गेल्या १८ वर्षांपासून दीपा अशोक पवार या महिलांसाठी, वंचितांसाठी ‘अनुभूती’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 

दीपा अशोक पवार यांचा मुंबईतील शिवडी परिसरात गाडिया लोहार समाजात जन्म झाला. या समाजाचा समावेश भटक्या-विमुक्त समाजामध्ये होतो. आपल्या उपजीविकेच्या शोधात हा समाज रोजगारासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सारखा भटकत असतो. सध्याच्या काळात ही जमात थोडा स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, बऱ्याच प्रमाणामध्ये एका जागी स्थायिक नसल्यामुळे गरिबी, असुरक्षितता, निरक्षरता या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. दीपा यांचे बालपण मुंबईमधील शिवडीचे. दीपा यांना एकूण चार बहिणी आणि त्यात दीपा सर्वात मोठ्या आहेत. लहानपणापासून त्यांनी पाहिले की, महिला आणि वंचित समाजाला दुय्यम वागणूक दिली जाते. या समाजात जन्मलेल्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना घरदार, रोजगार, शिक्षण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तर दुसरीकडे समाजात महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. लहान असताना दीपा यांना शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. परंतु, त्यांना जाणवले की, घरात बसून काही शिक्षण पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यास सुरुवात केली. पोलिओ लसीकरणाचे काम केले, खाजगी कंपन्यांमध्येही कामाचा अनुभव घेतला. अशी छोटी-मोठी कामे करत असताना त्यांना कळले की, घरात वाचनालय चालविण्यासाठी मुलींची आवश्यकता आहे. त्यांनी ‘प्रथम’ संस्थेशी संपर्क करून मग तिथे अर्धवेळ काम केले. त्या संस्थेमार्फत घरामध्ये वाचनालय चालविले. त्यावेळी दीपा केवळ १३-१४ वर्षांच्या होत्या. घरात वाचनालय चालविणे, अशिक्षित महिलांना वाचायला शिकविणे; यासोबतच त्यांनी किशोरवयीन मुलींची वेगवेगळ्या प्रकल्पांतून जनजागृती केली. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. त्यांनी ‘प्रथम’मध्ये तीन वर्षे काम केले. त्यानंतर ‘वायडब्ल्यू’ नावाच्या संस्थेच्या प्रकल्पात ‘कम्युनिटी ऑर्गनायझर’ म्हणून दोन ते अडीच वर्षे काम केले. हे सामाजिक कार्य सुरू असताना वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. सुदैवाने त्यांना अतिशय समजूतदार असा जोडीदारही मिळाला. दीपा यांच्या समाजकार्यात त्यानेही पाठिंबा दिला. त्यामुळे लग्नानंतरही दीपा यांचा सामाजिक कामाशी संबंध कायम राहिला.

 

लग्नापूर्वी दीपा यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण संघर्षाने पूर्ण केले होतेच. परंतु, लग्नानंतर पदवी, पदव्युत्तर शिक्षणापर्यंत त्यांनी मजल मारली. ‘वाचा’ संघटनेत पाच ते सहा वर्षे त्या कार्यरत होत्या. ही संस्था समाजातील जुन्या, भुरसटलेल्या चालीरिंतींविरोधात जनजागृती करते. तरुण-तरुणींनी स्वत: पुढाकार घेऊन समाजबदलाच्या कामात सहभागी व्हावे, सामाजिक काम करावे त्यासाठी दीपाने युवांना प्रशिक्षण दिले. ‘ऊर्जा’ नावाच्या संस्थेसोबत काम करताना बेघर आणि तरुण मुलींच्या त्या संपर्कात आल्या. या अशा तरुणींचे विविध प्रश्न दीपा यांनी हाताळले. एकूणच सामाजिक क्षेत्रात १८ वर्षे कार्यरत असलेल्या दीपा यांनी ‘राईट टू पी,’ ‘क्लीन टॉयलेट फॉर वुमन,’ ‘वस्ती शौचालय’ या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. २०१५ मध्ये स्वत: ‘अनुभूती’ या संस्थेची सुरुवात केली. ही संस्था गावस्तरावर, शहरातील वस्त्यांमध्ये वस्ती विकासाचे काम करते. तरुणांच्या माध्यमातून वस्त्यांचा विकास घडवून आणला जातो. विलेपार्ले आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही या संस्थेचे काम सुरू आहे. त्या माध्यमातून युवा-युवतींची गटबांधणी करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवापिढीला सज्ज केले जाते. युवतींना राजकीय, सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा या विविध पातळीवर, विविध संस्थांमध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या दीपा यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून ‘टेल हर स्टोरी’ या पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आशिया खंडातील तीन महिलांना मिळाला. त्यामध्ये एका पाकिस्तानी महिलेचा, तर दोन भारतीय महिलांचा सहभाग होता. यामध्ये दीपा यांना प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले.

 

सामाजिक कार्यासाठी युवावर्ग, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, पोलीस आदींना त्या प्रशिक्षणही देतात. स्त्री-पुरुष समानता, प्रसूती हक्क, संविधान हक्क, लोकशाही आदी विषयांवर त्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करतात. महिलांसाठी विविध पातळीवर काम करणाऱ्या संघटनांसोबत त्यांचे काम सुरू आहे. “बालविवाह, गर्भपात आदी गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. मुख्यत: या बाबतीत महिला संवेदनशील होत नाही, त्या मुकाट्याने हिंसा सहन करतात. म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत जोपर्यंत महिला आपल्या गरिमेचे जतन करत नाही, तोपर्यंत त्या संघर्षही करू शकणार नाही,” असे दीपा विशेषत्वाने अधोरेखित करतात. कारण, दीपा यांच्या मते, “जेव्हा महिला स्वत:चे निर्णय स्वत: घेतील, तेव्हाच त्या बहुतांशी गोष्टींना सामोरे जाऊ शकतील.”

 
 
- नितीन जगताप 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@