स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |

 
 
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघातामुळे घरातील कर्त्या पुरुषावर ओढवलेल्या संकटामुळे त्या व्यक्तीच्या परिवाराचे जीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही.
 
घरातील त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदतीसाठी कोणतीही स्वतंत्र वीमा योजना अस्तित्वात नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केली होती.
 
सन २००९-१० पासून या योजनेचे नामाभिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. ही विमा योजना रु.१.०० लाख इतक्या विमा सुरक्षेसह राबविण्यात येत होती. परंतु, या योजनेचे नामाभिधान आता बदलण्यात आले असून २०१५-१६ पासून त्याचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात वीमा योजना असे नामांतरण करण्यात आले आहे.
 
 
सदर योजनेनुसार विमा सुरक्षेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून रुपये २.०० लाख ठरविण्यात आली आहे. त्यामुळे अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
 
 
या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात येते. शासनाने जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीला अधिकृत विमा सल्लागार म्हणून नेमले असून त्यांचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३५३३ आहे. प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी कोणत्याही खासगी व्यक्ती, मध्यस्त किंवा दलालाचे सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही.
 
 
शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी समस्या असल्यास कृषी विभाग किंवा सल्लागार कंपनीशी संपर्क साधावा. यापूर्वी शेतकर्‍यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभही स्वतंत्र असतील.
 
 
योजना कालावधीत संपूर्ण दिवसभरासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी ही योजना लागू राहील.
 
या कालावधीत शेतकर्‍याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही तो या योजने अंतर्गत लाभासाठी पात्र राहील. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
-कल्पेश गजानन जोशी
kavesh37yahoo.com
वैशिष्ट्य
 
२००९-१० मध्ये ठरविलेली राज्यातील १ कोटी ३७ लाख अपेक्षित लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या कायम करण्यात आली आहे.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
 
तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. अपघात होणार्‍या शेतकर्‍यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल.
 
विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
 
अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला जाईल.
@@AUTHORINFO_V1@@