मतदारांचा कौल काँग्रेसला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 

छत्तीसगढ, राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत, मध्य प्रदेशातही मोठी मुसंडी

 

तेलंगणात टीआरएसचा मोठा विजय, मिझोरम मात्र काँग्रेसने गमावले

 

नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितरीत्या जोरदार पुनरागमन केले. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह विजय संपादित केला तर मध्य प्रदेशमध्येही मोठी मुसंडी मारत सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले. मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमतापासून केवळ २ जागांच्या अंतरावर राहिली. तेलंगणात अपेक्षेप्रमाणे तेलंगण राष्ट्र समितीने स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय नोंदवला तर मिझोराममध्येही मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट बहुमत प्राप्त केले.

 

विविध संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांचे कल काँग्रेसच्या सरशीचे भाकीत वर्तवणारे होते व प्रत्यक्षात निकालदेखील त्याप्रमाणेच लागले. गेल्या वीस वर्षांत कधीच एका पक्षाला पुन्हा बहुमत न देता खांदेपालट करण्याचा राजस्थानचा प्रघात यावेळीही कायम राहिला. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व युवा नेते सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने राजस्थानात मोठी मुसंडी मारली. राजस्थानच्या एकूण २०० जागांपैकी १९९ जागांवर मतदान झाले होते. पैकी १०० जागांवर विजय मिळवत काँग्रेसने बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला. भाजपला येथे ७४ जागांवर विजय मिळवता आला तर बहुजन समाज पक्षाने ६ जागी विजय प्राप्त केला. स्वतः मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरापाटण या मतदारसंघातून विजयी झाल्या. राजस्थानात सत्तापालट होण्याचे अंदाज वर्तवले जात होतेच परंतु, छत्तीसगढमध्येही अनपेक्षितरित्या काँग्रेसने मोठे यश मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. छत्तीसगढमध्ये एकूण ९० जागांपैकी ६५ जागा जिंकत तब्बल १८ वर्षानंतर राज्यात विजय प्राप्त केला. २००३ पासून सलग तीन निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा केवळ १६ जागांवर यश मानावे लागले. तसेच, बसपला येथे ८ जागांवर यश मिळवता आले.

 

मध्य प्रदेशातील लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. येथील एकूण २३० जागांपैकी ११४ जागा मिळवत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. तसेच, भाजपनेही १०८ जागांवर विजय मिळवला. बसपला येथे केवळ २ जागांवर विजय मिळवता आला. यामुळे मध्य प्रदेशात आता काँग्रेस बहुमतापासून केवळ २ जागांनी दूर राहिली असून अपक्ष आणि इतर पक्षांच्या मदतीने काँग्रेस येथे सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. तेलंगणमध्ये अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने पुन्हा एकदा बाजी मारत एकूण ११९ पैकी ८७ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला. काँग्रेस व तेलगु देशम आघाडीला येथे केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले तर ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षाला ७ जागांवर विजय मिळाला. भाजपला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान येथे नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या काँग्रेसने ईशान्य भारतातील मिझोरममध्ये मात्र आपली असलेली सत्ता गमावली. एकूण ४० सदस्यांच्या मिझोरम विधानसभेतील २६ जागा जिंकत मिझो नॅशनल फ्रंट या स्थानिक पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवला तर काँग्रेसला येथे केवळ ५ जागांवरच समाधान मानावे लागले. आधीपासून सत्ता असलेले मिझोरम गमावल्यामुळे निर्भेळ यशाचा आनंद काँग्रेसला गमवावा लागला.

 

युवा नेतृत्वांची मेहनत काँग्रेस पथ्थ्यावर

 

राजस्थान व मध्य प्रदेशात काँग्रेसच्या अनुक्रमे सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे या युवा नेत्यांनी घेतलेली मेहनत पक्षाच्या पथ्थ्यावर पडली. हे दोन्ही नेते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. या दोघांचेही आपापल्या राज्यांतील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाले होते व त्यातून पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजीही झाली होती. राजस्थानात माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व पायलट यांच्यात मोठे खटके उडाले होते तर मध्य प्रदेशात प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशी ज्योतिरादित्य शिंदे यांचे मतभेद झाले होते. मात्र, तरीही या दोघा युवा नेत्यांचे चेहरे पुढे आणल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला. आता राजस्थान व मध्य प्रदेशात अनुक्रमे गेहलोत आणि कमलनाथ मुख्यमंत्री होणार का पायलट आणि शिंदे मुख्यमंत्री होणार, प्रश्न विचारला जात आहे. या निकालांमुळे काँग्रेसला दोन युवा चेहरे मिळाले असल्याचे मतही राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे.

 

प्रथमच काँग्रेसकडून भाजपचा पराभव

 

२०१४ मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून कोणत्याही राज्यात भाजप व काँग्रेस अशा थेट लढतीत काँग्रेसला असा मोठा विजय मिळवता आला नव्हता. छत्तीसगढच्या रूपाने गेल्या चार वर्षांत काँग्रेसने प्रथमच भाजपला मात दिली. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत जेथे जेथे भाजपचा पराभव झाला तेथे काँग्रेस एकतर मुख्य पक्ष नव्हता किंवा त्यांनी अन्य प्रादेशिक पक्षाशी आघाडी केली होती. मात्र, छत्तीसगढमध्ये सत्ताधारी भाजप व काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष एकमेकांसमोर उभे थकले होते.

 

वादग्रस्त वक्तव्यांनंतरही काँग्रेस विजयी

 

या पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये केली होती. सी. पी. जोशी यांनी थेट पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसेच साध्वी ऋतंभरा यांना त्यांच्या जातीवरून लक्ष्य केले होते तसेच, धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राम्हणांनाच असल्याचा दावा केला होता. राज बब्बर यांनी तर नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या आईबाबतही बब्बर यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे समर्थन केले होते तसेच महिलांबाबतही त्यांनी निषेधार्ह वक्तव्य केले होते. यामुळे काँग्रेस पुरती बदनाम झाली होती. मात्र, तरीही या निवडणुकीच्या निकालांवर या वक्तव्यांचा काहीच परिणाम जाणवला नाही.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

@@AUTHORINFO_V1@@