प्रशासन लागले लोकसभा निवडणुकीच्या कामाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थापनाचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

 
जळगाव : 
 
आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. यासाठी सर्व विभागांनी आपआपसात समन्वय साधून पूर्वतयारी करावी.
 
तसेच प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपविलेल्या कामांचे पूर्वनियोजन करुन अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. गुरूवारी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकार्‍यांची निवडणूकीची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
 
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे, महानगर पालिकेचे उपायुक्त चंद्रकांत खोसे, राज्य मार्ग परिवहन महामंडाळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी पंडीत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूण प्रकाश, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, महेश पत्की आदी अधिकारी उपस्थित होते.
 
 
बैठकीत जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी विविध विभागांना विभागवार जबाबदारी सोपविल्या. निवडणूक काळातं अवैध धंदे रोखणे, हद्दपारीच्या कार्यवाही करणे, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, अतिसंवेदनशिल व संवेदनशील केंद्र निश्चित करणे, प्लॉईंग स्कॉड तयार करणे, पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करणे, मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी बंदोबस्तासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, त्याची उपलब्धता कशी होईल आदिंचे नियोजन करणे, असेही सूचना त्यांनी दिल्या.
साहित्याची ने-आण करण्यासाठी 2 हजार 321 वाहनांची आवश्यकता
 
जिल्ह्यात रावेर व जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ असून एका मतदारसंघासाठी प्रत्येकी 5 असे एकूण दहा निवडणूक निरिक्षक येणार आहे.
 
जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी एकूण 3 हजार 646 मतदान केंद्र असून त्यानुसार प्रत्येक मतदार केंद्राला प्रत्येकी 5 व 20 टक्के राखीव कर्मचारी व इतर कामकाज याप्रमाणे अंदाजे 26 हजार अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ लागणार आहे.
 
या निवडणूकीसाठी जिल्ह्याला 4 हजार 354 कंट्रोल युनिट व 7 हजार 488 बॅलेट यूनिट प्राप्त झाले आहेत. निवडणूकीच्या कामासाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी व आवश्यक असणार्‍या साहित्याची ने-आण करण्यासाठी एकूण 2 हजार 321 वाहनांची आवश्यकता भासणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी बैठकीत दिली.
@@AUTHORINFO_V1@@