राहुल गांधींचे मतलबी हिंदुत्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018   
Total Views |

 
 
‘‘मी हिंदुवादी नेता नाही, तर राष्ट्रवादी नेता आहे. मी प्रत्येक धर्माचा, जातीचा, भाषेचा आणि प्रत्येक वर्गाचा नेता आहे. मंदिरात जाण्यासाठी मला भाजपाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. हिंदुधर्म मला त्यांच्यापेक्षा जास्त समजतो त्यामुळे भाजपाने मला हिंदुधर्म शिकवू नये...’’-इति राहुल गांधी.
काय पण मिजाज आहे बघा! इतकी वर्षे ज्या पक्षाने हिंदूंना कस्पटासमान वागविण्याचेच फक्त राजकारण केले. ज्यांच्या पणजोबांना, आपण केवळ जन्माने आणि म्हणून अपघाताने हिंदू असल्याचे, इतर बाबतीत आणि कोणत्याच संदर्भात हिंदू नसल्याचे सांगण्यात कोण अभिमान वाटायचा, त्या ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ नामक राजकीय पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षांना ते हिंदू असल्याचा असा दुरभिमान वाटावा, हे वैचारिक परिवर्तन मानायचे, की सध्याची राजकीय निकड, एवढेच फक्त निश्चित व्हायचे आहे. बाकी, निवडणुकीच्या मुहूर्तावर मंदिरांचे उंबरठे झिजविण्याची त्यांची नौटंकी, वाखाणण्याजोगीच! हो! नाटकं नाही तर काय आहेत? कालपर्यंत मशिदीतून जारी होणार्या फतव्यांबाबत चकार शब्द न काढणारे लोक आता चक्क भगवी वस्त्रं धारण करणार्या संतांच्या चरणी लोटांगण घालू लागले आहेत. याला दुसरं काय म्हणायचं?
 
 
बहुधा, राहुल गांधी अलीकडेच राजकारणात आले असल्याने आणि पक्षाचे अध्यक्षपदही त्यांच्या पदरी वारशाने पडले असल्याने, इतिहास तितकासा ध्यानात राहिलेला नसावा त्यांच्या. नाहीतर, पंडित नेहरूंपासून त्यांच्या एकूणएक पूर्वजांनी या देशातल्या हिंदूंची अवहेलना करण्याची एकही संधी कशी कधीच दवडली नव्हती, याचे स्मरण झाले असते त्यांना.
शाहबानो प्रकरणात मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी त्यांच्या पिताश्रींनी संसदेतील बहुमताचा कसा गैरवापर करून घेतला होता अन् निवडणुकीसाठी उमेदवारी बहाल करताना दरवेळी जातिपातीची गणितं मांडून कोण राजकारणाच्या सारिपाटावरचे डाव खेळत राहिले होते, याचाही आठव झाला असता त्यांना कदाचित! सोमनाथ मंदिराच्या उद्धाराला विरोध करण्यापासून, तर काश्मीरसमस्येचे घोंगडे भिजत घालण्यापर्यंत... कुणाची वैयक्तिक धोरणं आडवी आली होती? कधी गांधीहत्येचे निमित्त करून, तर कधी अयोध्येत बाबरी ढाचा पाडला गेल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचे मनसुबे कुणी अंमलात आणले होते? हिंदुत्ववादी शिवसेनेशी युती केली म्हणून भाजपाला जातीयवादी ठरवत, स्वत: मात्र केरळात मुस्लिम लीगशी शय्यासोबत करताना कोणता ‘राष्ट्रवाद’ जोपासला होता कॉंग्रेसने? पण, हेटाळणी मात्र जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांची करण्यात आली. जातीयवादाचा शिक्का त्यांच्या कपाळावर मारण्यात आला. देशाचा सत्ताशकट आपल्या ताब्यात ठेवण्याच्या इराद्याने लादण्यात आलेल्या आणिबाणीदरम्यान आपल्या आजीनेही छळवाद नेमका कुणाच्या संदर्भात मांडला होता, बंदी नेमकी कोणत्या संघटनांवर घातली होती, संघटना कोणत्या गोत्यात आणल्या होत्या, याचाही तपशील जरा तपासून बघावा ना राहुल गांधींनी?
 
 
 
इंदिरा नेहरू यांनी फिरोज यांच्याशी लग्न करणे आवडले नव्हते म्हणतात जवाहरलाल नेहरूंना. का? ते तर उदारमतवादी म्हणवून घेत स्वत:ला. तसेही या लग्नाच्या निमित्ताने, त्यांच्या मनात प्रचंड तिरस्कार असलेल्या हिंदुधर्मातून बाहेर पडणार होत्या इंदिराजी. मग का आवडले नव्हते पंडितजींना इंदिराजींनी फिरोज यांच्याशी लग्न केलेले? या हिंदुबहुल राष्ट्रात नेहरू घराण्यातील कुणी अन्यधर्मीय व्यक्तीशी विवाहबद्ध होणे म्हणजे मतांच्या राजकारणावर आलेले भारी संकट असल्याच्या भावनेतून तर हा विरोध नव्हता ना? इंदिरा, फिरोज यांच्याशी लग्न करूनही ‘गांधी’ असतात अन् प्रियंका, रॉबर्ट वढेरा यांच्याशी लग्न केल्यावरही ‘गांधी’ आडनाव सोडत नाहीत, याचा अर्थ काय समजायचा राहुलजी? आणि हो! तुम्हाला तरी मंदिरांमागून मंदिरांत पोहोचावेसे का वाटू लागले आहे हो अलीकडे? आपण ब्राह्मण असल्याचे जगाला ओरडून सांगण्याची गरज तर ‘पंडितजी’ म्हणून ओळखल्या जाणार्या जवाहरलालांनाही पडली नव्हती कधी, तेवढी ती तुम्हाला जाणवू लागली असेल आताशा, तर त्याचे कारण केवळ आणि केवळ राजकारणात दडले आहे, हे न समजण्याइतका इथला मतदार आता दूधखुळा राहिलेला नाही, हे ध्यानात घ्या एकदातरी!
 
 
तुम्हाला हिंदुधर्म इतर कुणी शिकवण्याची गरज नाही, हे खरेच. कारण त्याचा राजकारणासाठी कॉंग्रेसएवढा ‘वापर’ इतर कुणी केला असेल सांगा? हा समाजही दावणीला बांधल्यागत फरफटत राहिला. भक्कमपणे पाठीशी उभा राहिला कॉंग्रेसच्या. आणि या पक्षाचे नेतेही गृहीत धरून वागवत राहिले या समाजाला. पण, कालांतराने या परिस्थितीचा विचार झाला, सखोल चिंतन झाले, जनजागृती झाली. लोकही कॉंग्रस पक्षाने दिलेल्या वागणुकीबाबत विचार करू लागले. मशीद अन् मंदिरांसाठी तिथे असलेला वेगळा न्याय ध्यानात येऊ लागला सर्वांच्याच. त्याबाबतच्या संतापाची धग हळूहळू व्यक्त होऊ लागली वागण्या-बोलण्यातून. मतपेटीतूनही त्याचे प्रतिध्वनी उमटू लागलेत. एक क्षण असा आला की, हा समाज पेटून उठला. चवताळून उठला. कालपर्यंत त्यांनी मुस्लिमांचे लांगूलचालन केले तरी, हिंदुत्ववादी संघटनांना वार्यावर उडवले तरी, कॉंग्रेसचीच पाठराखण करणारा समाज आता त्या पक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त करू लागला. इतका की, देशाच्या कानाकोपर्यात असलेली त्या पक्षाची मक्तेदारी टप्प्याटप्प्याने संपुष्टात येऊ लागली. राज्याराज्यांतल्या सत्तेतून ते हद्दपार होऊ लागले. इतकेच काय, देशाच्या सत्तेवरची त्यांची सद्दीही आता क्षीण होऊ लागली.
 
हिंदूंचं काय मनावर घ्यायचं, ते तर मतं देतातच, सांभाळलं पाहिजे ते मुस्लिमांना. दखल घेतली पाहिजे ती अन्य अल्पसंख्यकांची. त्यांची मतं महत्त्वाची. ते नकोत नाराज व्हायला... अशा विचारांतून चाललेल्या यांच्या राजकारणाच्या तर्हेची जागृत हिंदू समाजाने मतदानाच्या प्रक्रियेतून वाट लावली, तेव्हा कुठे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मंदिरात जाण्याची गरज भासू लागली आहे. आपण ‘जानवेधारी ब्राह्मण’ असल्याचे जनतेला ठासून सांगण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे...
ही उपरती, हा साक्षात्कार अचानक झालेला नाही. हा, या रागावलेल्या समूहाला साकडे घालण्यासाठी आणि त्यायोगे हातून गेलेली सत्ता पुन्हा बळकावण्यासाठी चाललेला सारा अव्यापारेषु व्यापार आहे...
 
‘‘मी शिक्षणाने इंग्लिश, संस्कृतीने मुस्लिम आणि केवळ जन्माने, म्हणून अपघाताने हिंदू आहे,’’ हे प्रसिद्ध विधान, नव्हे ठाम मत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा पणतू आपण हिंदू असल्याचा अभिमान बाळगतो, यात संशयाचे धुके धुंडाळण्याइतकी भारतीय जनता नक्कीच हुशार आहे. निदान आतातरी झाली आहे- फसवणुकीचे कित्येक अनुभव गाठीशी बांधल्यानंतर. या समूहाला पूर्वीसारखं मूर्ख बनवणं आता तितकेसे शक्य नाही. सोपं तर नाहीच नाही.
आपण केवळ हिंदूंचे नाही, तर सर्व धर्माचे नेते आहोत, हे विधान तुमच्या पूर्वजांनी पूर्वीपासून प्रत्यक्षात अंमलात आणले असते ना, तरीही चित्र वेगळे राहिले असते आज या देशातले. पण, धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंना लाथाडणे, एवढाच त्याचा अर्थ काढला गेला अन् सारे गणितच बिघडले. काही लोक अकारण मुजोर होऊन बसलेत, तर काहींना लाचारांसारखी वागणूक मिळाली. हिंदू समाजाने, इतरांवर अन्याय करून स्वत:साठी न्यायाची मागणी कधीही केली नव्हती. उलट तो आचरणाने ‘सर्वधर्मसमभाववादी’ असल्याचे कित्येक प्रसंगांमधून सिद्ध झाले आहे. पूरग्रस्त काश्मिरात मुस्लिमांच्या मदतीला धावून जाताना असेल किंवा केरळातला पूर ओसरल्यावर हातात झाडू घेऊन चर्चची स्वच्छता करताना असेल, आपल्या वागणुकीतून त्याने सर्व धर्मांचा आदर राखण्याचीच उदाहरणे घालून दिली आहेत. या परंपरेला छेद तर कॉंग्रेस नेत्यांनी, डाव्यांनी दिला. हिंदुत्ववाद म्हणजे जातीयवाद असल्याची ‘अफवा’ त्यांनी पसरवली जाणीवपूर्वक, स्वत:च्या राजकीय सोयीसाठी. आता तेच स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याच्या शर्यतीत उतरले आहेत...
 
 
सुनील कुहीकर
9881717833
 
@@AUTHORINFO_V1@@