‘गं साजणी’चे रिक्रेएशन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |




 
मुंबई : बहुचर्चित सिनेमा मुंबई पुणे मुंबई-३ लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सिनेमातील नायक आणि नायिका गौरी आणि गौतमच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलणार आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या या तिसऱ्या भागात दोघे आईबाबा होणार आहेत. एव्हाना ही बातमी प्रेक्षकांना या सिनेमाचा ट्रेलर पाहून कळलीच असेल. बाळाच्या स्वागतासाठी ‘कुणी येणार गं!’ हे गाणे गाताना गौरी आणि गौतमच्या कुटुंबियांना प्रेक्षकांनी पाहिले आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहताना ‘गं साजणे’ अशी साद बॅकग्राऊंडला ऐकू येते. ‘आली ठुमकत नार’ या गाण्यावर ढोल वाजवताना पारंपारिक वेशातील स्वप्नील आणि मुक्ताची झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे.
 

१९७२ साली प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम यांच्या पिंजरा या अजरामर सिनेमातील हे गाणे आहे. मुंबई पुणे मुंबई-३ या सिनेमाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा रसिकांच्या ओठी आले आहे. विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे ढोल ताशांच्या गजरात हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्याला स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे अशी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते व एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) यांच्या हस्ते या गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले. पिंजरा सिनेमातील या गाण्याच्या समावेश मुंबई पुणे मुंबई-३ सिनेमात झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

 
 
 

गं साजणीया गाण्याच्या रिक्रेएशनला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. आदर्श शिंदे यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे होते. विश्वजित जोशी यांनी भर घातली आणि गाण्याला एक नवे रुप दिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर हे गाणे चित्रित झाले असून गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना लाभलेल्या लोकप्रियतेमुळे गौतम आणि गौरी अर्थात स्वप्नील-मुक्ताच्या जोडीने रसिकांच्या मनात घर केले. सिनेमाच्या दुसऱ्या भागात दोघांचे लग्न दाखवले होते. लग्नानंतर या दोघांच्या जीवनात पुढे काय होते, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

 

आजपासून तब्बल आठ वर्षांपूर्वी मुंबई पुणे मुंबईहा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिट ठरला होता. तीन वर्षांपूर्वी या सिनेमाचा पुढचा भाग मुंबई पुणे मुंबई-२ प्रदर्शित झाला. हा भागही पहिल्या भागाप्रमाणे सुपरहिट ठरला. आता सिनेमाचा तिसरा भागही प्रेक्षक उचलून धरतील असा विश्वास मुंबई पुणे मुंबई ३च्या टीमला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@