भटक्या, विमुक्त,आदिवासी मुलींच्या जीवनाला दिशा देणारे वसतिगृह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

वावडद्यातील वनवासी कल्याण समिती संचलित कै.इंदिरा माधव वसतीगृह: समाजाच्या दातृत्वावर आश्वासक, प्रेरक वाटचाल


 
जळगाव : 
 
शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांपासून वंचित आणि बिकट परिस्थितीत हलाखीचे जीवन जगणार्‍या वनावासी व भटक्या-विमुक्त जाती जमाती, आदिवासी, वनवासी, उपेक्षित समाजबांधवांचे सर्वांगिण उन्नयन करायचे असेल तर त्यांच्या उगवत्या पिढीला विशेषत: मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणायला हवे, यासाठी माधवराव पाटणकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आणि रा.स्व.संघ परिवारातील वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने वावडदा गाव शिवारात 8 एकर क्षेत्रात ‘ कै.इंदिरा माधव वसतीगृह’ आणि सोबतच जिल्हा बालकल्याण समिती या सेवाभावी संस्थेतर्फे ‘अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र’ चालवले जाते.
 
निसर्गरम्य वनश्रीने नटलेल्या परिसरातील वसतीगृहात सध्या 21 विद्यार्थिनी आणि केंद्रात 35 अंगणवाडी सेविका आहेत. हे केंद्र 21 फेब्रुवारी1982ला धर्मदाय आयुक्तांकडे नोंदले गेले. ‘दर्पण’ पोर्टलवरही ते आहे.
 
मू.जे.महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापिका लताताई पाटणकर यांच्या विरक्त , सेवाभावी, शांत, सोज्वळ, निरलस कार्यकर्तीचे हे जणू कार्य व स्मृतिस्थळ. 21 फेब्रुवारी 2018 ला त्यांचे निधन झाले.
 
केंद्राच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी जळगावच्या अ‍ॅड.उज्ज्वला कुुलकर्णी आणि सचिवपदी ला.ना.विद्यालयातील निवृत्त शिक्षक रमाकांत वैद्य हे आहेत. प्राचार्यपदाची जबाबदारी सौ.मंजुषा प्रदीप तळवेलकर(जळगाव) या सांभाळतात. स्वयंपाकगृहाची जबाबदारी शीला वळवी यांच्याकङे आहे.
 
 
वसतीगृहाचे संचालन सौ. मंजुषाताईंसह 7 संचालकांकडे आहे. एकूण 8 सेवक-सहकारी दोन्ही सेवाप्रकल्पांचे सर्व व्यवस्थापन सांभाळतात.व्यवस्थापनासह विविध आरोग्यशिबिरे, प्रशिक्षण यासह सर्व माता-भगिनींच्या अडचणींचे निराकरण या दोघी आणि सेवक मायेने करतात.
 
 
विशेषत: अनेक मान्यवर, दानशूर संस्था व सहृदयी माता-भगिनी पालक यांचा विविध उत्सव, सणवारात सहभाग असतो. समरसतेच्या भावनेने या मुलींवर सदैव प्रेमादराची पखरण होते.
 
 
जलसंधारण कामे व्हावीत
 
केंद्राच्या विहिरीची जलपातळी 65 फूट खोल गेली आहे. अपुरा पाऊस आणि दोन्ही संस्थांच्या लाभार्थ्याची संख्या लक्षात घेता भविष्यात टँकरची गरज पडेल, अशी चिंताजनक स्थिती आहे.
 
लताताईंना याची जाणीव असल्याने त्यांनी यापूर्वीच आवारातील सर्व वास्तूंच्या छतावरील पावसाचे पाणी जिरवण्यासाठी विहिरनजिक मोठ्ठा शोषखड्डा आणि पाणी पुनर्भरण व शिवाय शेततळेही केलेले आहे.पण यंदा पाऊसच पुरेसा झलेला नाही.
 
पाण्याची ददात पडू नये, शेतीत पिकं आणि परसबागेत पाले व फळभाज्या पिकवता याव्यात, यासाठी भविष्यात आणखी एक शेततळे करण्याचा संस्था चालकांचा संकल्प आहे. समाजाचे दातृत्त्वही वाढते रहावे, अशी अपेक्षा आहे.
 
संपर्क -सौ. मंजुषा प्रदीप तळवेलकर 94203-84002
 
विनामूल्य प्रवेश व रहिवास
 
भटक्या, विमुक्त, जाती-जमातीच्या वनवासी आदिवासी परिवारातील शिक्षणापासून वंचित, अतिशय गरजू मुलींना येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो. नाममात्र 300 रु. अनामत त्यांच्याच खाजगी खर्चासाठी आकारली जाते, नंतर ती परतही केली जाते.
 
सध्या 21 विद्यार्थिनी आहेत.त्यांना संस्कारयुक्त शिक्षण व व्यवहारज्ञान तसेच कापडी, कागदी पिशव्या शिवणे, शिवणकाम, जुन्या साड्यांपासून पायपोस बनवणे इ. कला कौशल्यपर आत्मविश्वास वाढविणारे प्रशिक्षणही दिले जाते.
 
 
 
शारिरीक, बौध्दिक विकास करणारी दिनचर्या
 
विद्यार्थिंनींची दिनचर्या त्यांचा प्राकृतिक, बौध्दिक व भावनिक विकासाला पूरक अशी आहे. सकाळी 5 ला उठणे, प्रातर्विधी इ., सकाळी 6 ला प्रार्थना, व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार आणि विविध खेळ ,नंतर पोषणमूल्य असलेला रोजचा वेगळा अल्पोहार, अभ्यास नंतर शाळा/ हायस्कूल आणि तेथे पोषण आहार,सायंकाळी शक्य तर स्वयंपाक घरात मदत, परसबागेत कामे, प्रार्थना, गीताध्यायाचे पठण, रात्री सहभोजन, विद्यार्थिनीना उपलब्ध वेळेत पाढे, गणित, संस्कारक्षम बोधकथा, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@