सावधान...'असहिष्णुता' येत आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |
 


असहिष्णुतेच्या नाट्यातील प्रवेशाच्या अंकाचे नायक म्हणून सध्या रामचंद्र गुहा यांचं नाव चर्चेतआहे. अर्थात, प्रसिद्ध इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा. निमित्त ठरलं, ते गुजरातमधील अहमदाबाद विद्यापीठामध्ये गुहा यांची होणार असलेली आणि ‘अभाविप’च्या कथित ‘दबावामुळे’ रद्द झालेली नियुक्ती.

 

साधारण २०१६ची अखेर आणि २०१७च्या सुरुवातीच्या काही महिन्यांचा तो काळ होता. त्यापूर्वी २०१५च्या सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाख अहमद नामक इसमाची जमावाने सामूहिकरीत्या हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घडल्यापासून ते २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत देशातील काही ठराविक लेखक, प्राध्यापक, इतिहासकार, कलाकार, पत्रकार आदींच्या वर्तुळामध्ये एकच वादळ निर्माण झालं. ते वादळ होतं, देशभरात निर्माण झालेल्या कथित असहिष्णुतेचं. दादरीतील दुःखद घटनेनंतर हे वादळ देशभरात अशा रीतीने पेटवण्यात आलं की, जणू देशातील प्रत्येक गावागावात, गल्लीत राजरोज कत्तली होत आहेत, यादवी पेटली आहे. पुढे उत्तर प्रदेशची निवडणूक झाली... आणि मग काय... हे वादळ अचानकपणे शांत झालं. त्यावेळी परवलीचे बनलेले ‘असहिष्णुता’ वगैरे शब्द गेल्या वर्ष-दीड वर्षात लोकांच्या शब्दभांडारातून गायबच झाले. गतकाळातील या सर्व घटनांचं आज स्मरण करण्याचं कारण म्हणजे, या असहिष्णुतेच्या महानाट्याचा पुढील भाग आता येऊ घातला आहे. कारण एकच. पुढील चार-पाच महिन्यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि तोपर्यंत या महानाट्याचा प्रयोग सार्‍या देशभरात गाजणार असल्याचं स्पष्ट दिसतं आहे.

 
 

असहिष्णुतेच्या नाट्यातील प्रवेशाच्या अंकाचे नायक म्हणून सध्या रामचंद्र गुहा यांचं नाव चर्चेत आहे. अर्थात, प्रसिद्ध इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा. निमित्त ठरलं, ते गुजरातमधील अहमदाबाद विद्यापीठामध्ये गुहा यांची होणार असलेली आणि ‘अभाविप’च्या कथित ‘दबावामुळे’ रद्द झालेली नियुक्ती. या प्रकरणातील घटनाक्रम अभ्यासण्यासारखा आहे. विद्यापीठाच्या मानवता विभागामध्ये रामचंद्र गुहा यांची नियुक्ती होणार होती. परंतु, या नियुक्तीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला. परिषदेने आपलं म्हणणं विद्यापीठापुढे मांडलं. त्यानंतर गुहा यांनी ट्विटरवरून ट्विट करत आपण विद्यापीठात रूजू होऊ शकत नसल्याचे जाहीर केले आणि लगेचच ‘अभाविप’ने गुहांना देशद्रोही आणि शहरी माओवादी म्हटलं असल्याचे आरोपदेखील झाले. मागच्या वेळची सर्व ‘गँग’ पुन्हा एकत्र आली आणि मग ‘लोकशाहीचा गळा घोटणे,’ ‘दबावतंत्र,’ ‘हुकूमशाही,’ ‘असहिष्णुता’ आदी गोष्टी वाढत असल्याची एकच ओरड सुरू झाली. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य. त्यामुळे ही ओरड आता अधिकाधिक वेगाने वाढणार आणि निवडणूक होईपर्यंत लोकांच्या कानठळ्या बसवणार, हे स्पष्टच आहे. देशातील बुद्धिवादी, उदारमतवादी, पुरोगामी (आणि तरीही डावे!), विचारवंत वगैरे म्हणवणार्‍या या ठराविक मंडळींनी साकारलेला यावेळचा हा अंक गेल्या वेळेसारखाच मनोरंजनाने परिपूर्ण असेल, यात काही शंका नाही. परंतु, मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन हे सर्व का आणि कशासाठी होत आहे, हे असंच चालू राहिलं तर काय धोके संभवतात, याचाही विचार करणं गरजेचं ठरतं. वरून उदारमतवादी आणि आतून डावे असणार्‍या या मंडळींची सारी मांडणी खोटेपणावर आधारित असते आणि लोकांचा बुद्धिभेद करून, राष्ट्रीय अस्मितेचा तेजोभंग करून आपला डाव साधणारी असते, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे. या प्रकरणातही याची झलक दिसेल.

 
 

‘अभाविप’ नेमकं काय म्हणाली? तर, गुहा यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं आणि लेखन केलं आहे, त्यांची मांडणी विभाजनवादी आहे आणि त्यामुळे गुहांची नियुक्ती अहमदाबाद विद्यापीठात होऊ नये, अशी ती मागणी होती. ही मागणी ‘अभाविप’ने घटनात्मक मार्गाने, शांततामयरीत्या केली. परंतु, प्रतिमा काय रंगवण्यात आली, तर हुकूमशाहीची, दबावाची. आता एखाद्याला काही मत असेल, त्याची काही मागणी असेल आणि ती त्याने घटनात्मक मार्गाने मांडली, तर यात चूक ते काय? त्यात चूक बहुधा ही असावी की, ही मागणी त्यांनी लोकशाही मार्गाने मांडली. कारण, लोकशाही, घटना आदींवर मक्तेदारी ही या डाव्यांची आणि कथित बुद्धिवाद्यांची, असा समज त्यांनी कित्येक दशकांपूर्वीपासूनच करून घेतलेला. तो वास्तवाला धरून नाही, हे आजवरच्या हजारो घटनांवरून सिद्ध झालं असलं तरी; राहता राहिला प्रश्न तो रामचंद्र गुहा देशद्रोही आणि शहरी माओवादी असण्याचा. ‘गुहा नकोत’ ही मागणी करत असताना अभाविपच्या कोणत्याही नेत्याने वा कार्यकर्त्याने गुहा देशद्रोही किंवा शहरी माओवादी असल्याचं म्हटलेलं नाही. अभाविपला झोडू पाहणार्यांच्या या दाव्याला कोणत्याही पुराव्याचा आधार नाही. परंतु, पुरोगामी म्हणतात ना की, अभाविप त्यांना माओवादी म्हणाली, तर मग म्हणाली. कारण, ते म्हणतात तेच तर सत्य असतं.

 

त्यांनी लिहिलेला इतिहास हाच खरा असतो. त्यांना समजलेली राज्यघटना, त्यांना समजलेले महात्मा गांधी, त्यांना समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे असतात. त्यांनाच काय तो वर्तमान कळतो आणि भविष्यदेखील. त्यांची तशी धारणाच आहे. आता या रामचंद्र गुहांनीदेखील शोध लावलाच की, भारताच्या तिरंग्यातील हिरवा रंग हा मुसलमानांचा, पांढरा ख्रिश्चनांचा, भगवा हिंदुंचा. आम्ही अज्ञानी लोक तर हिरवा हा सुजलाम-सुफलाम समृद्धतेचा, भगवा त्यागाचा, समर्पणाचा वगैरे काहीतरी वेडसर कल्पना डोक्यात घेऊन बसलो होतो. गुहा हे जे काही बोलले ते आजचं नव्हे, तर गेल्या सात-आठ दशकांपासून देशातील विविध विद्यापीठं, सरकारी संस्था, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारी असंख्य माणसं हेच सांगत आहेत. देशाचा इतिहासही असाच तर मांडला गेला आणि पिढ्यान्पिढ्या इथे शिकवला गेला. जे जे इथलं, मूळ आहे, ते ते चुकीचं आणि जे जे बाहेरून आलं, ते ते चांगलं, हे या मांडणीचं मूलभूत तत्त्व. हे सारं कशासाठी तर हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी. त्यामुळे मग घोरी, खिलजीपासून मुघलांपर्यंत शेकडो वर्षं देशाची झालेली लूट आणि अत्याचार या इतिहासाचा भाग नसतात. फाळणीच्या वेळी सिंध, पंजाब, बंगालमध्ये झालेला रक्तपात यात नसतो. मौर्यापासून ते चोल, सातवाहन, देवगिरीपर्यंतच्या साम्राज्यांनी पाहिलेला सुवर्णकाळ नसतो. ते सारं ‘हिंदुत्ववाद्यांचं कारस्थान’ असतं आणि ‘औरंगजेब हा अत्यंत न्यायी, शूर, उदारमतवादी, कर्तव्यदक्ष राजा होता’ हे मात्र देशाची धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी असतं. या देशाची अस्मिता, इथल्या लोकांचं स्वत्व आणि सत्व नाकारण्याचा, त्यांचा तेजोभंग करण्याचा कुटीलोद्योग इथे ‘विचारवंत’ म्हणून नावाजलेल्या भामट्यांकडून कित्येक दशकं राजरोसपणे सुरू आहे. त्याचसाठी त्यांना आजवर पुरस्कार मिळाले, संस्थांमध्ये पदं मिळाली, घरं मिळाली, त्यांच्या संस्थांना देणग्या मिळाल्या. गेल्या चार वर्षांत मात्र हा ओघ अचानक आटला आणि मग त्यातून जन्मली ती ही यांची ‘असहिष्णुता!’ हे रामचंद्र गुहा असतील किंवा रोमिला थापर असतील किंवा आणखी असंख्य; या सार्‍यांचा कांगावा गेल्या चार वर्षांत आपण नित्यनेमाने पाहतो आहोत. माध्यमांमध्येदेखील यांना पाठबळ देणारे आहेतच. एक राष्ट्रीय पत्रकार आणि एक आपल्या महाराष्ट्रातील पत्रकार प्रसिद्ध आहेत, ज्यांची कुठे काही ‘सोय’ लागली नाही, कुठे नाव झळकलं नाही की, देशात असहिष्णुता आणि हुकूमशाही वाढत असल्याचा साक्षात्कार होत असतो. आता २०१९ जवळ आलं असताना पुन्हा नव्याने असे साक्षात्कार होत आहेत, पुढेही होत राहणार आहेत. यातून मनोरंजन जरी होत असलं तरी, यामागची ही छुपी दांभिक प्रवृत्ती वेळीच ओळखणं आणि तिला तिची योग्य ती जागा दाखवणं, देशहिताच्या-समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक बनलं आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@