योगींची ‘दिवाळी भेट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |


राममंदिराचा मुद्दा देशाच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी आलेला असताना अयोध्येला योगी आदित्यनाथांनी घेलेलेले हे निर्णय हिंदू समाजाला सुखावणारे तर आहेतच पण, त्याचबरोबर काही शुभसंकेतांचे प्रतीकही मानले पाहिजेत.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरातील हिंदुंना अनोखी भेट दिली आहे. प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीच्या जिल्ह्याचे नाव फैजपूरवरून अयोध्या असे करण्यात आले आहे. विकास आणि श्रद्धांचा सन्मान एकत्र करता येऊ शकतो, याची साक्षात प्रचिती देण्याचे काम योगींच्या कालच्या भाषणाने उपस्थितांनी दिली. गेल्या चार वर्षांत हिंदुंच्या श्रद्धांची ठिकाणे असलेल्या काशी, अयोध्या यासारख्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांना एक राष्ट्रीय महत्त्व आले आहे. सणावाराला याठिकाणी काय चालते, यावर सार्‍या जगाचे लक्ष लागलेले असते. पंतप्रधान मोदींनी वाराणसी हा मतदारसंघ लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी निवडला आणि जगभरात जो काही संदेश द्यायचा होता तो दिला गेला. ‘गंगेची आरती’ हा त्यांनीच सुरू केलेला उपक्रम देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख या पूजनाला उपस्थित राहिले आहेत. हिंदू असणे, श्रद्धा बाळगणे, त्याची सक्षम अभिव्यक्ती करणे हे जणूकाही पापच असल्यासारखे या देशात वागले जात होते. भेट दिल्या जाणार्‍या ताजमहालच्या ठिकाणी पंतप्रधानांनी गीता आणली तेव्हाच या बदलांची नांदी दिसायला लागली होती. योगींनी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून अयोध्या दिव्यांनी उजळवून द्यायची पद्धत सुरू केली होती. यावर्षीदेखील तब्बल साडेतीन लाख दिवे लावून शरयूचा घाट तेजाळून टाकला होता. ही आनंदाची गोष्ट अशासाठी की, याच शरयूच्या प्रवाहात याच देशात, याच अयोध्या नगरीत राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍या कारसेवकांचे रक्ताळलेले मृतदेह तरंगताना पाहिले गेले होते. कारसेवेच्या बाबतीत जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा कारसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयूच्या पाण्याची कथा आपण ऐकली आहे. हा आस्था आणि श्रद्धेचा विषय. मात्र, या देशातील डाव्या विचारांनी प्रभावित पत्रकारांनी आणि विचारवंतानी याला राजकीय रंग दिला. या रंगाचा पोत इतका पक्का आहे की, योगींनी अयोध्येचा कार्यक्रम सुरू केल्यांनतर राम मंदिर बांधण्याची घोषणा होणार असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्या. या मंडळींनी याचेही भान नव्हते की, संपूर्ण देश या सोहळ्याकडे मोठ्या भक्तिभावाने पाहत होता आणि अशा स्थितीत मंदिर निर्माणाची घोषणा होण्याची वाट पाहाण्याचे काम हे लोक बिनडोकपणे पाहत होते. पण दोष यांचा नाही. प्रत्येक विषयात राजकारण करण्याची सवय असलेल्या आणि चटपटीत बातम्या पेश करायची सवय लागलेल्या माध्यमांना इथेही काही मिळेल, असे शेवटपर्यंत वाटतच होते.

 
 

ज्या फैजाबादचे नाव बदलून योगींनी अयोध्या केले त्यावर या दोन दिवसांत बराच काथ्याकूट झाला आहे. मूळात ‘साकेत’ हे या शहराचे नाव. साकेत या शब्दाचा अर्थ स्वर्ग. आता हा संदर्भ पार रामायणाकडे घेऊन जातो. प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथाचे हे शहर. १७७२ साली मुघलांनी सादत अली खान या सरदाराला इथला नवाब म्हणून घोषित केले. सादत अली खानाने या शहरावर राज्य केले, काही गोष्टी घडवूनही आणल्या आणि अयोध्येचे नामोनिशाण मिटविण्याच्या प्रयत्नांत हातभारही लावला. यापूर्वी पानिपताच्या तिसर्‍या लढ्यात मराठ्यांनीही फैजाबादवर हल्ला केला होता. मराठे अयोध्येत लढले, त्या लढाईमागे रामजन्मभूमीवरील परकीय आक्रमकांच्या ताब्याचाही संदर्भ आहे. नावे बदलण्याचा खरा इतिहास हा असा असताना आपल्याकडे मात्र वेगळेच सूर आळवले जात आहेत. औरंगजेब रोडचे नाव बदलल्यानंतरही अशाच प्रकारची रडारड ऐकायला मिळाली होती. नावे बदल्याने विकास होतो का, अशी जी काही आरडाओरड केली जात होती; त्यांनीही योगी आदित्यनाथांनी काहीच न बोलता उत्तर देऊन ठेवले. जेव्हा या जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले गेले त्याचवेळी याठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाने एक विमानतळ उभे करण्याची घोषणादेखील त्यांनी करून टाकली. राजा दशरथाच्या नावाने एक वैद्यकीय महाविद्यालयही उभे करणार असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक नगरीच्या इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार ठरलेला देश म्हणजे दक्षिण कोरिया. कोरियाच्या प्रथम नागरिकही या कार्यक्रमाला भारतीय वेश परिधान करून उपस्थित राहिल्या होत्या. यामागचे वास्तव मोठे रोमहर्षक आणि तितकेच हळवे आहे. हियो हांग ओके या कोरियन इतिहासातील सर्वात प्रभावी सम्राज्ञी. या कोरियन लोक मानतात की, त्या अयोध्येची राजपुत्री होत्या. विवाहापश्चात ती त्यावेळच्या कोरियात पोहोचली आज ६० लाखांहून अधिक कोरियन नागरिक स्वत:ला या राणीचे वंशज मानातात. ही बाब मानणार्‍या आजच्या महापौरही अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. सांस्कृतिक देवणाघेवाणीच्या नावाखाली फुकटचे परदेश दौर्‍या मिळविलेल्या डाव्या विचारवंतांना यात सांस्कृतिक देवाणघेवाण दिसणार नाही. याचे मुख्य कारण इथे हिंदू-मुसलमान ऐक्य वगैरे असे काहीच नाही. यातून सर्वधर्मसमभावाचा दिखाऊ भंपकपणा करता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या हिंदूमान्यता आहेत. आज अयोध्येची राजकन्या मान्य केली, तर उद्या अयोध्या मान्य करावी लागले. अयोध्या मान्य केली, तर रामाचे अस्तित्व मान्य करावे लागेल. एकदा ते मान्य केले की, मग रामजन्मभूमीचा प्रश्न आहेच. त्यापेक्षा या सगळ्या भावनिक आणि श्रद्धेच्या मुद्द्याला राजकारणाचा मुलामा देत हे सगळे २०१९ साठी चालले आहे, असे ओरडायचे म्हणजे आपले बुद्धिभेद करायचे हेतू सिद्ध होतात

 
 

अयोध्या म्हटली की, रामजन्मभूमीचा मुद्दा येतोच. न्यायालयांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक बाबतीत एक एक निर्णय देऊन हस्तक्षेप केला आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण कुणीही नाकारू शकत नाही परंतु, जेव्हा मशिदीवरचे भोंगे वाजतच राहतात आणि फटाक्यांवर मात्र बंदी येते, तेव्हा मात्र या सगळ्याविषयी चीड व्यक्त होणे, साहजिकच असते. राममंदिराचा मुद्दा देशाच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी आलेला असताना अयोध्येला योगी आदित्यनाथांनी घेलेलेले हे निर्णय हिंदू समाजाला सुखावणारे तर आहेतच पण, त्याचबरोबर काही शुभसंकेतांचे प्रतीकही मानले पाहिजेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@