वरणगावात एकाच महिन्यात दुसरा खून ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

महामार्गाजवळ आढळला मृतदेह; नागरिक भयभीत



भुसावळ, 6 नोव्हेंबर - तालुक्यातील वरणगाव येथे मुक्ताईनगर रोडवरील लोककल्याण हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या कलीम गॅरेजच्या बाजूला एका 35 वर्षीय मूकबधिर इसमाचा चेहरा ठेचून खून करण्यात आला आहे.
 
मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आल्याने पुन्हा वरणगाव शहरात खळबळ उडाली आहे. एकाच महिन्यात दुसरा खून झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
 
याबाबत माहिती अशी की, वरणगावमध्ये 35 वर्षीय इसम हा मूकबधिर असल्याने मिळेल ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. तो वरणगावला चार ते पाच महिन्यांपासून बाहेरगावावरून आला होता.
 
मूकबधिर असल्याने तो कुठला आहे? त्याचे नाव काय? हे कोणालाही माहीत नाही. परंतु त्या मूकबधिर इसमाचा खून करण्यामागचा उद्देश काय? हा प्रश्नही तितकाच गुंता वाढविणारा आहे.
 
गेल्या 15 ऑक्टोबर रोजी साईनगरमध्ये सुनील चौधरी यांचा असाच चेहरा ठेचून खून करण्यात आला होता. त्याचाही तपास थंडबस्त्यात असून खून करणार्‍या आरोपींचा शोध पोलिसांकडून अजूनपर्यंत लागलेला नाही.
 
तसाच पुन्हा मंगळवार 6 रोजी दुसरा खून झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापेयांच्यासह पो.हे.कॉ.सुनील वाणी, राहुल येवले, दत्तात्रय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
 
या घटनेबाबत वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज पवार, रवींद्र पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांकडून पंचनाम्याला दिरंगाई

 
मुक्ताईनगर रोडवरील लोककल्याण दवाखान्याच्या बाहेर कलीम गॅरेजच्या बाजूला या अज्ञात मूकबधिर इसमाचा रात्री खून करून मृतदेहावर चादर टाकून झाकून ठेवला होता.
 
सकाळी मृतदेह झाकून ठेवल्याने नागरिकांना दिसताच खळबळ उडाली. सोमवारच्या मध्यरात्री खून करून दुसर्‍या दिवशी मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत मूकबधिर इसमाच्या मृतदेहाचा पंचनामा झालेला नव्हता.
 
मंगळवारी बाजाराचा दिवस असल्याने परिसरात प्रचंड गर्दी होत होती. मात्र, पोलीस यंत्रणा या खुनाची घटना गांभीर्याने घेत नसल्याने पोलिसांनी पंचनामा उशिराने केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली
 

अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा संशय 

 
मूकबधिर 35 वर्षीय इसमाला रात्री महामार्गावरून जात असताना कोणत्या तरी वाहनाने धडक दिली असावी. कारण मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर पुढील तपास होईल. खून केला असेल तर आरोपीचा शोध घेऊ.
-सुभाष नेवे,
डीवायएसपी, मुक्ताईनगर
@@AUTHORINFO_V1@@