प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोदे येथे सहा.जिल्हा आरोग्य अधिकार्‍याची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |

 
पारोळा, 6 नोव्हेंबर - तालुक्यातील शिरसोदे येथे विविध समस्यांबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस.कमलापूरकर यांनी तत्काळ दखल घेऊन डॉ. समाधान वाघ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांना समस्या जाणून घेण्यासाठी पाठवून तत्काळ कारवाई व उपाययोजना सुचवल्या आहेत.
 
येत्या आठवडाभरात नूतन वैद्यकीय अधिकारी यांच्या नियुक्तीसह इतर कर्मचारी वर्ग देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती ही थेट आरोग्य संचालक मुंबई वा उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक यांच्याकडून होत असल्याने विलंब होत होता.
 
तरीही सातत्याने पाठपुरावा करून वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती व आरोग्य सहाय्यक, सेविका, शिपाई यांच्या आगामी पदोन्नतीतून प्राधान्याने शिरसोदे येथे कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
 
डॉ. समाधान वाघ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या.
 
सद्यःस्थितीत एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग केवळ सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंतच सुरू राहील. याबाबत सर्व उपलब्ध ग्रामस्थांना माहिती दिली. यासोबतच अत्यावश्यक सेवेसाठी 108 ची रुग्णवाहिका उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
प्रा.आ.केंद्र शिरसोदेअंतर्गत 39, 767 लोकसंख्येचा अंतर्भाव होत असून 6 उपकेंद्र व 29 गावांचा कारभार चालतो, यात प्रामुख्याने लसीकरण, साथरोग सर्वेक्षण इ. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा समावेश होतो.
 
 
जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रसूती करणार्‍या पहिल्या दहा आरोग्य केंद्रात प्रा.आ.केंद्र शिरसोदेचा क्रमांक लागतो. सोबतच कुटुंब नियोजन शस्रक्रिया, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना इ. राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यातदेखिल नेहमीच अव्वल स्थान राहिले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार मोरे यांनी दिली.
 
 
यावेळी जि.प. सदस्य रत्नाताई रोहिदास पाटील, शिरसोदेचे सरपंच मीराबाई रतन भील, बहादरपूरचे सरपंच मिलिंद मोरे, दीपक साबळे, दिलीप पाटील, शिवप्रतिष्ठान संघटनेचे तुषार पाटील, विजय पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
@@AUTHORINFO_V1@@