ठाणे-कल्याणकरांसाठी दिवाळीची खुशखबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |



डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे होणार जेट्टी

 

ठाणे: ऐन सणाच्या दिवसांत कल्याण आणि ठाणेकरांचा जलवाहतुकीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण, ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी या जेट्टींचे बांधकाम करणार आहे. ठाणे-कल्याण-वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे.
 

ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला होता. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करून त्याचे सादरीकरण केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले. कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प होणार असून पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई हा ६४५ कोटी रुपयांचा जलमार्ग विकसित करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आता या प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येत असून त्याअंतर्गत डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होत आहे.

 

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेएनपीटी ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने हे काम करणार आहे. जसजसे काम पुढे सरकेल, तसतसा केंद्राकडून निधी प्राप्त होणार असल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी सांगितले. या प्रकल्पामुळे ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वेव्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत तो दाखल व्हावा, यासाठी पाठपुरावा करत राहाणार असल्याचे खा. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आयुक्त जयस्वाल यांनी पुढाकार घेतल्यामुळे या कामाला सुरवात झाली. त्यामुळे नागरिकांकडून आयुक्त जयस्वाल यांचे आभार मानले जात आहेत. या जलमार्गामुळे प्रवाशांना रस्ते आणि रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे, यामुळे कल्याण आणि ठाणे शहरातील वाहतुककोंडीही काही अंशी कमी होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तवली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@