दिवाळीसाठी ग्राहकांमध्ये खरेदीचा अमाप उत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 5 नोव्हेंबर - दिवाळीनिमित्त सोमवारी बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करणार्‍या ग्राहकांची गर्दी उसळली होती. काही दुकानदारांनी विक्री मूल्यावर सवलती जाहीर केल्याने तेथे ग्राहकांची रांग लागल्याचेही दिसत होते.
 
लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज पुढील तीन दिवसात येऊ घातले आहे. नोकरदारांच्या हातात पगाराची रक्कम आली आहे. त्यामुळे आता बाजारात खरेदीला जोर चढला आहे.
 
सोमवारी फुले मार्केट, बळीरामपेठ व नवीपेठ भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती. लक्ष्मीपूजनसाठी मूर्ती, केरसुणी, फुले व पूजा साहित्याची खरेदी महिला ग्राहकांनी केली.
 
नवीपेठेतील एका दुकानदाराने 90 रुपयात शर्ट/टी-शर्ट विक्रीची आकर्षक सवलत जाहीर केल्यामुळे येथे ग्राहकांनी अक्षरशः रांग लावली होती. कापड, किराणा माल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने आदींच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली.
 
यंदा पाऊस नसला, तरी बाजारातील आजचा उत्साह पाहून दुकानदारही समाधान व्यक्त करीत आहे. पोलनपेठेत सुभाष चौक ते राजकमल टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या फटाके विक्रीच्या दुकानांमध्येही पालकांसह मुलांचीही गर्दी दिसत होते.
 
 
सोन्याचे दर प्रतितोळा 32 हजार रुपयांच्या पलीकडे असूनही सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. खरेदीचा हा ट्रेंड दोन दिवस टिकून राहील.
@@AUTHORINFO_V1@@