राज्य नाट्य स्पर्धा बालगंधर्व नाट्यगृहात घ्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

रंगभूमीदिनी शहरातील नाट्यकर्मींची मागणी, सुकाणू समितीचा दुजोरा

 
जळगाव, 5 नोव्हेंबर - शहरात बालगंधर्व खुले नाट्यगृहात सायंकाळी मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील समस्त ज्येष्ठ व उदयोन्मुख नाट्यकर्मींची उपस्थिती लाभली.
 
यावेळी शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात 58वी राज्य नाट्य स्पर्धा व्हावी, असा सूर निघाला असल्याने यावर समस्त रंगकर्मींनी दुजोरा देत याचा पाठपुरावा करण्यासाठी सुकाणू समिती तयार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
 
 
दरम्यान, यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी काशिनाथ सोनार आणि ओमप्रकाश शर्मा यांनी दीपप्रज्वलन करून नटराज पूजन केले. रंगकर्मींनी शिस्तीत नटराज गीत गाऊन नटराजाला नमनही केले.
 
मुळात रंगभूमीदिनी ज्येष्ठ नाट्यकर्मींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सांगण्यात आले की, बालगंधर्व नाट्यगृहाला खूप मोठी परंपरा लाभलेली असून आजही त्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. नारायण राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी स्वतः याठिकाणी आपली हजेरी लावली असल्याचेही सांगण्यात आले.
 
 
बालगंधर्व नाट्यगृहाने जळगाव शहराला चांगले कलावंत दिले असून आजही ते मुंबई आणि पुण्यात आपल्या शहराचे लौकिक वाढवत आहेत. भोग सम्राट नावाच्या नाटकाने बालगंधर्व खुले नाट्यगृहात सलग आठ दिवस प्रयोग करून त्याकाळी एक विक्रमच केला असल्याचेही सांगण्यात आले.
 
आधी जळगाव शहरात नाटके होत नव्हती. परंतु, शहरी आणि ग्रामीण असे भाग पडल्यानंतर मात्र पहिल्यांदा ग्रामीण नाटकासाठी जळगाव केंद्र मिळाले असल्याचीही आठवण काढण्यात आली.
 
 
संभाजीराजे नाट्यगृहाचे भाडे परवडत नसल्याने तसेच जिल्हाधिकार्‍यांनी अग्रीम सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडे मागितल्यामुळे हौशी नाट्य स्पर्धा तेथे होत नसल्याने नाराजीचा सूरही निघाला.
 
त्यामुळे ज्याठिकाणी आमची किंमत नाही, त्याठिकाणी रंगभूमी दिन आम्ही का साजरा करावा, असा सूरही निघाला. यावेळी केवळ जिल्हाधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे हा सगळा गोंधळ होत असल्याने नाट्यकर्मी आपल्या हक्कापासून वंचित राहत असल्याने यावर्षीची 58वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा बालगंधर्व खुले नाट्यगृहात घ्यावी, असे रंगकर्मींकडून सांगण्यात आले.
 
यावेळी काशिनाथ सोनार यांनी राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला या नाटकातील एक प्रवेश आपल्या अभिनयातून दाखवून समस्त नाट्यकर्मींची मने जिंकली. दरम्यान, पुढच्या वर्षी रंगभूमीदिनी एक नाटक आणि ऑक्रेस्ट्रा आपण पदरमोड करून करणार असल्याचे मोहन तायडे यांनी सांगितले.
 
 
रंगभूमी दिनानिमित्त सुकाणू समितीचे रमेश भोळे, अरविंद देशपांडे, ओमप्रकाश शर्मा, विनोद ढगे, मोहन तायडे, राजेंद्र देशमुख, होनाजी चव्हाण, अनिल मोरे, अविनाश चव्हाण, मोरेश्वर सोनार, सचिन महाजन, वैशाली पाटील, प्रवीण पांडे, अजय राखुंडे, दीपक पाटील, अरुण सानप, नाना सोनवणे, मनपाचे सुभाष मराठे, विजय पाठक, पीयूष रावळ आदी नाट्यकर्मी उपस्थित होते.
 
बालगंधर्व नाट्यगृह सुकाणू समितीला द्यावे
 
 
बालगंधर्व नाट्यगृह जर मनपाला सांभाळता येत नसेल तर ते नाट्यगृह सुकाणू समितीला द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काही कार्यक्रम घेण्यात आले तर त्याचा सगळा लेखाजोखा मनपाला देण्यात येईल, असेही यावेळी सुकाणू समितीकडून सांगण्यात आले. जेणेकरून हे बंदावस्थेतील वास्तु पुन्हा नाटकांच्या तालमीसाठी वापरात येईल आणि त्याचे जतनही समिती आपल्या पदरातून करेल, असे रमेश भोळे यांनी सांगितले.
बालगंधर्व की मनापाचे गोडावून ?
 
बालगंधर्व नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून हे नाट्यगृह आहे की मनपाचे गोडावून, असा प्रश्न निर्माण होत आहे. बालगंधर्वला जे सुवर्ण दिवस प्राप्त झाले होते, ते केवळ मनपाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मातीमोल होत आहे.
 
प्रेक्षकांना येण्यासाठी जे दरवाजे होते तेेथे आता मनपाने अतिक्रमणमध्ये जप्त केलेल्या लोटगाड्या ठेवल्या आहेत. दरम्यान, रंगकर्मींनी रंगभूमीदिनी यामुळे नाराजी व्यक्त केली. रंगमंचाची फरशी उखडलेली असून दर्शनी आणि मागचा पडदा गायब करण्यात आला आहे.
 
झालरी आणि विंगांचा तर नामोनिशाण नाही. तिकीट खिडक्यांवर धूळच धूळ जमली असून मनपाने जर या नाट्यगृहाचे मनावर नाही घेतले तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या करू, असे रंगकर्मींनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@