अवैध पाणी उपसा आढळून आल्यासअधिकार्‍यांवर गुन्हा : मिसाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |
धुळे, 5 नोव्हेंबर - जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता धरण, मध्यम प्रकल्प, तलावातून अवैध पाणी उपसा आढळून आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे.
 
उपविभागीय अधिकारी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईबाबत आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी नितीन दुसाने, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एन. डी. पाटील, धुळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विवेक महाले, मंडळ अधिकारी डी. आर. ठाकूर, के. एस. भोगे, तलाठी एम. एल. पाटील आदी उपस्थित होते.
 
उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी सांगितले, ज्या विभागाचे धरण असेल त्या विभागाच्या अधिकार्‍यांनी अवैध पाणी उपसाबाबत तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा संबंधित उपसा करणार्‍या शेतकर्‍यांसह संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच वीज पंप जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येईल.
 
यापूर्वी तीन वेळा धुळे व साक्री उपविभागातील 22 महसूल मंडळांच्या मंडळाधिकारी बैठका घेऊन सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अधिनस्त संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत.
 
यापूर्वी मंडळाधिकार्‍यांतर्फे पथकाने कुळथे, धाडरी, पुरमेपाडा येथे मोटारी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@