चौपदरीकरण 18 महिन्यात पूर्ण करू : खा.पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

समस्या जाणून घेतल्या; आ.उन्मेश पाटील, जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे यांची उपस्थिती


 
 
चाळीसगाव, 5 नोव्हेंबर - नव्याने होणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. जळगाव ते पहाण 210 कोटी तर पहाण ते खडकी 267 कोटी या कामाचे बाजूला असलेल्या गावालगतच्या नागरिकांची मागणी व अडचणी तसेच काम करताना व बांधकामाला येणार्‍या अडचणी या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी सोमवारी खा. ए.टी.पाटील यांच्यासह आ. उन्मेश पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली.
 
जळगावातील रायसोनी महाविद्यालयापासून रस्त्यांची पाहणी करण्यात आली. दरम्यान, जागोजागी शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या व मागण्या या पुढील कामात विचारात घेऊन हा रस्ता येत्या 18 महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा. ए.टी.पाटील यांनी बुधवारी चाळीसगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
 
साडेसातशे कोटीच्या नवीन राष्ट्रीय महामार्ग 753 या रस्त्याचे काम गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात होणार्‍या कामाचा पाहणीदौरा बुधवारी खा. ए. टी. पाटील यांनी केला.
 
त्यांच्यासोबत चाळीसगावचे आ. उन्मेश पाटील, जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, चाळीसगावच्या नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, भाजपाचेे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, ठेकेदार अशोका बिल्डकॉनचे अधिकारी अरुण पाटील, भडगावचे भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
ते पुढे म्हणाले की, महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावालगत शेतकर्‍यांच्या काही अडीअडचणी समजून घेण्याच्या उद्देशाने आ. उन्मेश पाटील, आ. सुरेश भोळे यांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला आहे.
 
 
रामदेववाडी तालुका जळगाव येथे अडीच किलोमीटरचा रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आ. सुरेश भोळे यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन येथे हा रस्ता कमी रुंदीचा राहू नये, याकरिता भेट घेणार असल्याचे सांगितले.
 
 
त्याचप्रमाणे ज्या तालुक्यातील गावे या रस्त्याच्या दुतर्फा आहेत, येथे दुर्घटना होऊ नये याकरिता ठिकठिकाणी पास-वे मंजूर करण्यात आले असून नवीन डीपीआर मंजुरी घेऊन हे पास-वे निर्माण केले जाणार आहे. वाघळीजवळ असलेल्या मुधाई माता मंदिराजवळचा रस्ता पुरातत्व खात्याकडून परवानगी घेऊन तोदेखील चौपदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
 
 
वाहतुकीचा भार होईल हलका-आ. उन्मेश पाटील
 
नॅशनल हायवे क्रमांक 753 अंतर्गत तयार होणारा चौपदरीकरण रस्ता शहरातून जाणार आहे. त्यामुळे ओझर ते सदानंद पॅलेस तसेच सिग्नल चौक ते रावी कॉलेज, त्याचप्रमाणे गणेश मंगल कार्यालयापासून ते शहराच्या हद्दीतील हा रस्ता शहराच्या हद्दीत येतो. मात्र हा रस्तादेखील चौपदरीकरणाच्या ठेकेदाराकडून करण्यात येणार असून शहराच्या वर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे.
 
रस्ता तयार झाल्यानंतर शहराच्या वाहतुकीला मदत होणार आहे तसेच हे चौपदरीकरण तयार झाल्याने चौकाचे सौंदर्य खुलणार असल्याने लवकरच हा महामार्ग व्हावा, याची उत्सुकता शहरवासीयांसह मलादेखील असल्याची भावना आ. उन्मेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
सुशोभिकरण पूर्ण करून होणार चौपदरीकरण
 
 
शहरातून जाणारा चौपदरी महामार्ग हादेखील विनाअडचणीने पूर्ण व्हावा, याकरिता राष्ट्रीय महाविद्यालयापर्यंतचा रस्तादेखील चौपदरी केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या शोभेत वाढ होणार आहे.
 
ओझर ते खडकी या चौपदरीकरणामुळे शहराच्या वाहतुकीला बळकटी मिळणार असून वाहतुकीच्या अडचणींना पूर्णविराम मिळणार आहे. त्याचप्रमाणे तितूर व बहुळा नदीवर या चौपदरीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन पूल तयार करण्यात येणार आहे.
 
संपादित जागेतच रस्त्याची मागणी
 
सध्या राष्ट्रीय महामार्गासाठी जी जागा उपलब्ध आहे, त्याच जागेत महामार्ग व्हावा. कुठल्याही परिस्थितीत शेतकर्‍यांच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.
 
शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्गांसाठी जमीन देण्याला तीव्र विरोध केला आहे. सध्याच्या उपलब्ध असलेल्या जागेतच रस्ता व्हावा, त्याव्यतिरिक्त कुठल्याही शेतकर्‍यांच्या जागेवर रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, अशा व्यथा शेतकर्‍यांनी मांडल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@