किती सांगू, मी सांगू कुणाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018   
Total Views |



‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. महाराष्ट्रातील ढाण्या वाघांचा आणि शूरवीर मर्द मावळ्यांचा वगैरे पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांची सध्या बहुधा ही अशीच अवस्था झालेली दिसते. इतक्या व्यथा, इतकी दुःखं की, ती कुणाला सांगावित आणि किती सांगावित, यालाही काही सुमार राहिलेला दिसत नाही. म्हणूनच की काय, ऐन सणासुदीला आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी या शिवसेनेचे सैनिक भर व्यासपीठावर आपली दर्दभरी व्यथा सुनावू लागले आहेत. विशेष म्हणजे, चारचौघात उघडपणे सांगायचीही चोरी असल्याने मग, या व्यथा गाण्यांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न हे सैनिक करत आहेत. परंतु, ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीप्रमाणे आता इतकं सारं पाणी पुलाखालून समुद्रात वाहून गेल्यानंतर रोज रोज या दुःखाला सहानुभूती तरी कोण दाखवणार, हाही प्रश्न आता गांभीर्याने भेडसावू लागला आहे. तर या सगळ्याला निमित्त झाले ते, मुंबईच्या महापौर बंगल्यावर झालेल्या ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवाजी पार्कमागील भव्य महापौर बंगल्यातील शेवटची ‘दिवाळी संध्या’ साजरी केली. कारण, आता महापौरांचे निवासस्थान हे भायखळ्यात हलविण्यात येणार असून विद्यमान बंगल्याच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. त्यामुळे या वास्तूतील ही अखेरची ‘दिवाळी संध्या.’ वास्तविक, हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र, झालं उलटंच. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हणे, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गाणं म्हणण्यासाठी माईक हाती घेतला आणि आपल्या व्यथा सूचकपणे एका गाण्याच्या माध्यमातून मांडत सर्वांना चकित केलं. हे गाणं म्हणजे गदिमांनी लिहिलेलं आणि बाबुजींनी गायलेलं ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’ आता मुंबई महापालिकेच्या स्थायीचे अध्यक्ष जर अशी गाणी स्टेजवरून गाऊ लागले, तर तो खरा राज्यभरात चर्चेचा विषय व्हायला हवा. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांत शिवसेना मुळात सरकारमध्ये आहे की नाही, हेच पक्षनेतृत्वाच्या बोलण्यातून स्पष्ट होत नसल्याने सर्वसामान्य जनता आणि खुद्द शिवसैनिकही गोंधळलेले आहेत. त्यामुळे यशवंत जाधवांनी जरी ‘अजब तुझे सरकार’ म्हटलं असेल तरी, आधी मुळात सरकार आहे की नाही, हेच नक्की सांगता येणं अवघड असल्यामुळे आणि पुन्हा रोज तीच रडगाणी नव्याने ऐकावी लागत असल्याने जनतेने आणि शिवसैनिकांनीही हा विषय बहुधा सोडूनच दिला असावा.

 

‘अजब सरकारा’चे परिणाम

 

लोकांनी आणि सैनिकांनी विषय सोडला असला तरी, काही मंडळींनी मात्र तो सोडलेला नाही. उलट, स्वपक्षीयांच्या दुःखावर मीठ कसं चोळता येईल, याकडेच त्यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. एकीकडे कधी काळी पक्षप्रमुख उद्धवजी पुढील काळात भाजपशी युती करणार नसल्याचे जाहीर करून बसले आणि नंतर विसरूनही गेले. परंतु, त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मंडळींनी मात्र हे चांगलं लक्षात ठेवलं आहे. त्यामुळेच विधानसभेला निवडून येऊ न शकणारे आणि तरीही ‘मातोश्री’कृपेने थेट मंत्रिपदाची लॉटरी लागलेले अनेक मंत्री सध्या भाजपवर टीका करण्याच्या नादात स्वतःचा पक्ष सहभागी असलेल्या सरकारवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मंत्र्यांचं एकवेळ ठीक, ते तसेही राजीनामे खिशात घेऊनच फिरतात म्हणे. ते एव्हाना पावसाळ्यात भिजून गेले आहेत किंवा फाटले आहेत, अशाही अफवा आहेत; पण, किमान खिशात अजूनही आहेत असं मानायला हरकत नाही. परंतु, या शिवसेनेकडे काही अशीही विभूतिमत्व आहेत, ज्यांच्या पक्षातील स्थान आणि नेमक्या जबाबदारीबद्दल त्यांच्या स्वतःसकट कुणालाच निश्चित माहिती नाही. या मंडळींमध्येही आता रोज नव्याने भाजपविरोधाची आणि शिवसेना-भाजप सरकारवर दोषारोप करण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार, नेते, मुखपत्राचे कार्यकारी संपादक अशा अनेक महत्वाच्या(?) जबाबदाऱ्या सांभाळणारे संजय राऊत हे याच प्रकारात मोडतात. या महोदयांनी सध्या रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत भाजपवर टीका करणं, हे एकच काम हाती घेतलं आहे. किंबहुना तेच त्यांच्यावर सोपविण्यात आलं आहे. इंटरनेटवर ‘संजय राऊत’ नाव टाकून सर्च करा, ९० टक्के बातम्या या त्यांनी कशी भाजपवर टीका केली याबाबत असतात. या महोदयांचं दुर्दैव म्हणावं की, राज्यातील जनतेचं सुदैव ते ठाऊक नाही; परंतु, या राऊत महोदयांना ना राज्यातील सर्वसामान्य जनता गांभीर्याने घेते, ना भाजप नेते, ना खुद्द शिवसेना आणि शिवसैनिक! मध्यंतरी याच राऊत साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेण्याचा घाट घातला आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे कशी सपशेल नांगी टाकली, हे सर्वांनीच पाहिले. तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. परवा तर मुख्यमंत्र्यांना राऊत यांच्या वक्तव्यांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा राऊत म्हणजे शिवसेना नव्हेअसं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना साफ झाडूनच टाकलं. तरीही तरीही तेच. त्यामुळे कधी कधी तर ‘राऊत’ हेदेखील गदिमांनी लिहिलेल्या (आणि यशवंत जाधव यांनी गायलेल्या) गाण्याप्रमाणे पक्षप्रमुखांच्या ‘अजब सरकारा’चे बळी आहेत की काय, अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@