शहर कचरामुक्त करताना... संगम प्रतिष्ठान, ठाणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018   
Total Views |



कचरा ही शहराचीच नव्हे, तर देशाची मोठी समस्या आहे. जिथे तिथे कचरा प्रश्न पेटत आहे. कचरा ही समस्या आहेच. पण या कचऱ्यातूनही माणसाच्या जगण्यासाठी काही सकारात्मक निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. जगभरात त्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. त्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या कचराप्रश्नावर, स्वच्छता अभियानावर सर्वांगिण अभ्यास करून आपल्या स्तरावर कचराप्रश्न मार्गी लावणारी संगम प्रतिष्ठान संस्था.

 


कचऱ्याचा प्रश्न मोठा

नाही घाणीला तोटा

 

ही उक्ती सार्थ ठरावी असे वातावरण शहरभर आहे. पण कचरा समस्येवर मात करण्यासाठी विविध गट, संस्था स्वत:हून पुढे येत आहेत. त्यापैकी एक संगम प्रतिष्ठान होय. ठाणे शहरामध्ये सुरू झालेली ही संस्था पुढे मुंबईमध्येही काम करू लागली. या संस्थेची सचिव कोमल घाग. अतिशय संवेदनशिल युवती. संगम प्रतिष्ठान कसे सुरू झाले सांगताना तिने आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी बसमध्ये बसले होते. बस एका हॉलसमोर थांबली. हॉलमध्ये कसला तरी मंगल समारंभ पार पडला असावा. हॉलबाहेरही झगझगीत कपडे घातलेल्या, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणाऱ्या लोकांची लगबग मन प्रसन्न करून गेली. इतक्यात हॉलच्या एका बाजूला असलेल्या कचराकुंडीकडे नजर गेली. नुकतीच जेवणावळ उठली असावी. कारण, कचराकुंडीच्या इतस्तत: विविध अन्नपदार्थ पडलेले होते. खरकट्या प्लेट्सनी ती कचराकुंडी भरून गेली होती. मूर्तिमंत दारिद्र्याची प्रतिक असलेली एक स्त्री त्या कचराकुंडीमधील उष्टे-खरकटे मोठ्या आनंदाने उचलत होती. तिच्या चेहऱ्यावरही अपार आनंद होता. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदापेक्षाही तिच्या कडेवर असलेल्या त्या लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. आईने कचराकुंडीतून उचललेल्या प्रत्येक अन्नपदार्थावर ती लहानगी खूश होत होती. ती एक घटना आणि मी अंतर्बाह्य बदलले. आपल्या इथे लहानमुलांना कचराकुंडी तर दूरच राहिली, कचऱ्यासाठीच्या झाडूलाही हात लावू देत नाहीत. कारण, का तर अॅलर्जी होईल. पण मी इथे पाहिले होते की, ती मुलगीही लहानच होती पण, तिची आई तिला त्या कचऱ्याने भरलेल्या कचराकुंडीजवळ घेऊन उभी होती. या हॉलबाहेरच्या कचराकुंडीमध्ये नक्कीच लोकांनी टाकलेले अन्न खायला मिळेल, या आशेने ती तिथे आली होती. ते टाकलेले अन्न तिला अमूल्य वाटत होते. मला आठवले की, घरी आईने कितीही मनापासून चविष्ट अन्नपदार्थ बनवले तरी, कित्येकदा मी ते मूड नाही म्हणून चाखलेही नव्हते. इथे तर त्या लहानग्या मुलीला आणि तिच्या आईला चॉईसही नव्हती. हे कोणते जगणे? मला त्याक्षणी वाटले की, कचरा वेचणाऱ्या लोकांसाठी आपल्यापरीने काही तरी केले पाहिजे आणि त्यातूनच ‘संगम प्रतिष्ठान’ची निर्मिती झाली,”

 

समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या कोमलने संशोधनही केले आहे. कोमलचे वडील तानाजी घाग हे मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये कार्यरत आहेत. तानाजी घाग यांनी मुंबईतील कचरा समस्येचे इत्यंभूत वास्तव अनुभवलेले. ते स्वत: ऑफिसर असले तरी, महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याचा त्यांना अनुभवांतून अभ्यास आहे. त्यांना वाटे की, मुंबई काय किंवा इतर कोणतेही शहर असू दे, तेथील प्रशासकीय यंत्रणेने नियुक्त केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे शहर स्वच्छ होण्यास हातभार लागेल. पण शहर स्वच्छ व्हायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेची जबाबदारी ही आपली जबाबदारी मानायला हवी. हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. सुरुवात करायलाच हवी. या उद्देशाने त्यांनी स्वत:च्या राहत्या घरापासून सुरुवात केली. ठाण्याला ते ज्या इमारतीमध्ये राहतात, तिथे प्रत्येकाची घरे स्वच्छ, गॅलरी स्वच्छ. पण इमारतीमधून बाहेर पडले की, आजूबाजूचा परिसर म्हणजे अस्वच्छतेचा कळस. तानाजी यांनी हा परिसर स्वच्छ करायचे ठरवले. दर आठवड्याला दोन तास परिसर स्वच्छता, असा त्यांनी स्वत:पुरता अलिखित नियम घातला. त्यांच्या सोबत त्यांची कन्या कोमलही या स्वच्छतेमध्ये उतरली. ते वर्ष होते २००९. कोमल तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. वडील आणि मुलगी यांना काय झाले आहे? चांगले सुशिक्षित आहेत, उच्चभ्रू समाजाचे आणि सधन आहेत. मग हे दोघे कचराबिचरा साफ का करतात? याचे कुतूहल लोकांना वाटू लागले. खूप लोक चौकशी करू लागले. परिसर स्वच्छता झाली की, तानाजी मग या चौकशी करणाऱ्या लोकांशी स्वच्छता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, याबाबत रंजक आणि सखोल चर्चा करत. या माध्यमातून कितीतरी लोकं या सफाईमध्ये जोडली गेली. दुसरीकडे कोमलही आपल्या वर्गातील सहध्यायींना या परिसर स्वच्छतेबद्दल माहिती देत असे. त्याचा परिणाम असा झाला की, समाजासाठी काही तरी केले पाहिजे, असा उत्साह आणि आत्मविश्वास असलेले विद्यार्थीही ही संकल्पना आपापल्या परिसरात राबवू लागले.

 

बिजाचा बहारदार वृक्ष व्हावा, त्याप्रमाणे सफाई अभियानाचा पुढे ‘संगम प्रतिष्ठान’ संस्था झाली. २००९ ते २०१२ पर्यंत परिसर स्वच्छता माध्यमातून विद्यार्थी, लोकं एकत्रित झाले होते. नेमके त्याचवेळी कोमलने ती ‘कचराकुंडीची घटना’ पाहिली. त्यामुळे परिसर स्वच्छतेसोबतच कचरावेचकांसाठी काही करायलाच हवे, या विचारांनी ‘संगम प्रतिष्ठान’ने महानगरपालिकेशी संपर्क संवाद साधला. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करणे आणि त्या सुक्या कचऱ्यातून कचरावेचकांना अर्थप्राप्ती व्हावी, हा प्रस्ताव महानगरपालिकेकडे मांडला. २०१२ साली प्रतिष्ठानने महानगरपालिकेशी सातत्याने पाठपुरावा केला. सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करावे आणि कचरावेचकांना त्यातून अर्थाजन मिळावे, हा त्यातील हेतू. हेतू शुद्ध होता आणि मुख्य म्हणजे कचरा वेचताना कचऱ्यासारखे आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात थोडातरी बदल करणारा हा हेतू होता. त्यामुळे विविध नियमांच्या काटेकोर पालनानंतर ‘संगम प्रतिष्ठान’ला मुंबईमध्ये शीव, अॅण्टॉप हिल आणि कुलाबा या तीन ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्रे मिळाली. या केंद्रांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. कचरा वर्गीकरण करणाऱ्यांना त्याचे पैसे मिळतात. पुढे ‘संगम प्रतिष्ठान’ने ‘कचरा’ या विषयावर जनजागृती करण्याचे काम हाती घेतले. यामध्ये निवासी सोसायटी, वस्त्या, महाविद्यालये, शाळांमध्ये कचरा समस्या आणि त्यांचे एका मर्यादेपर्यंत आपण या समस्येचे निराकरण कसे करू शकतो, यावर ‘संगम प्रतिष्ठान’ने व्याख्यान, चर्चासत्राचे आयोजन केले. समाजाशी नाळ असलेल्या ‘संगम प्रतिष्ठान’चा वस्तीपातळीवर सुसंवाद आहे. प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीमध्येही त्यांचा सहभाग असायचा. 

 

प्रतिष्ठानला जाणवले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे, हे कर्तव्य आहेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे गड-किल्ले हे या शूरवीर राष्ट्राचा जिताजागता इतिहास आहे. यांची सध्या अवस्था काय आहे? अस्वच्छता, घाण यांचे या किल्ल्यांवर साम्राज्य आहे. काही किल्ल्यांवर तर अतिक्रमणांचा कहर झाला आहे. काहींवर गर्दुल्ले चर्सुल्लेंनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रभरच्या गड-किल्ल्यांचे जाऊ दे पण, मुंबईमधील किल्ल्यांची काय अवस्था आहे? मग तो शीवचा किल्ला असू दे की, धारावी किल्ला असू दे. या किल्ल्यांची सफाई करण्याचे उद्दिष्ट ‘संगम प्रतिष्ठान’ने ठेवले. त्यानुसार, पुरातत्व खात्याशी संपर्क केला. परवानगी मिळाल्यानंतर शीव किल्ला सफाईचे अभियान हाती घेण्यात आले. तब्बल २६ आठवडे प्रत्येक रविवारी या किल्ल्याची सफाई करण्यात आली. या सफाईमध्ये खूप आव्हाने होती. किल्ल्याची सफाई करताना दोन टन बाटल्या निघाल्या, यातच सर्व काही आले. किल्ले साफ केल्यानंतर ‘संगम प्रतिष्ठान’च्या प्रत्येकाच्या मनात आनंद आणि समाधान होते. ‘संगम प्रतिष्ठानपर्यावरण आणि समाजजागृती या दोन संगमाद्वारे काम करते. कचरा ही मोठी समस्या आहे. पण कचरा निर्माण कुठून होतो? तो आपणच निर्माण करतो. समाजाला सोबत घेऊन ‘स्वच्छ परिसर स्वच्छ समाजा’ची संकल्पना वास्तवात निर्माण करण्यासाठी ‘संगम प्रतिष्ठान’ कार्यरत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@