तरुणांनी अधिक जागरूक राहावे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
‘तरुण भारत’ दिवाळी अंक प्रकाशनप्रसंगी रवींद्र पाटील यांचे आवाहन
 
 
नंदुरबार ,4 नोव्हेंबर - शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी तरुणांनी आसपासच्या लहान-सहान बाबींकडेही लक्ष ठेवून जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन रवींद्र पाटील यांनी जळगाव ‘तरुण भारत’ आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर मार्गदर्शन करताना केले. लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयातील सभागृहात रविवारी सकाळी 11 वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
मंचावर भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक दीपक पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, गिरीश बडगुजर उपस्थित होते.
 
दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते ‘शहरी नक्षलवाद’ या दिवाळी अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.प्रास्ताविकात दीपक पाटील यांनी ‘तरुण भारत’च्या वाटचालीचा आलेख मांडताना विविध उपक्रमांची माहिती दिली. या दिवाळी अंकामागील भूमिकासुद्धा सांगितली.
 
रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना नक्षलवाद म्हणजे काय? त्याचा उगम कसा झाला? याची माहिती दिली. संविधानाबद्दल प्रेम भासवून संविधानालाच विरोध करण्याचे कार्य नक्षलवादी करीत आहेत. नक्षली हे शोषित, आदिवासी, पीडितांचा केवळ वापर करत असून त्यांच्या माध्यमातून सशस्त्र चळवळ उभारली जाते. यात शोषित फक्त वापरले जातात, असे ते म्हणाले.
 
त्वरित प्रचार आणि तंत्रज्ञान वापरासाठी माओवादी ग्रामीण भागातून शहराकडे वळले आहेत. बुद्धिभेद करण्यात ते अग्रेसर झाले आहेत. त्यासाठी आपले सण, उत्सव आणि संस्कृतीला त्यांनी लक्ष्य केले आहे. मानवाधिकाराच्या नावाखाली माओवादी इतरांच्या अधिकारास धक्का पोहोचवता. 40 नक्षली मारले गेले त्याबाबतच्या सत्यशोधक समितीमध्ये 42 जण होते.
 
दुर्गम भागात माओवादी विकासकामे होऊ देत नाहीत. रस्ते होऊ देत नाहीत, झाले तर उखडून टाकतात. देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का देण्यासाठी माओवादी प्रयत्न करीत आहेत. माओवादी शहरात पोहोचले असून एल्गार परिषदेमुळे दंगल घडली. या परिषदेच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेले पत्रक देशातील अन्य भागातसुद्धा आढळले.
 
देशाला साम्यवाद आणि समाजवादापासून धोका असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच सांगितले आहे. बाबासाहेबांची तत्त्वे मानून जागरूक राहावे.
  
आपल्या आसपासच्या घटनांवर लक्ष ठेवावे. देणगी देताना ती कुठे आणि कशासाठी वापरली जाणार आहे, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.सूत्रसंचालन निलेश वाणी यांनी तर चंदुलाल नेवे यांनी आभार मानले.
 
 
देशात बौद्धिक बल असलेली शहरे ताब्यात घेण्याकडे कल
 
माओवादी देशातील बौद्धिक बलस्थान असलेली पुणे, नागपूर, मुंबई, कोलकाता अशी शहरे बुद्धिभेद करून ताब्यात घेऊन हा देश हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
माओवादी असल्याच्या संशयावरून काही व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर तथाकथित उच्चभ्रू मानवाधिकाराचा आश्रय घेत ‘मी शहरी नक्षलवादी’ असे फलक गळ्यात घालून फिरताना दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@