जळगावातील शैक्षणिक संस्थांमध्येही शहरी नक्षली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - माओच्या रक्तरंजित क्रांतीवर विश्वास ठेवणार्‍या शहरी नक्षलवाद्यांनी जळगावातील काही शैक्षणिक संस्थांमध्येही आपले हातपाय पसरवले असून, शिक्षक व विद्यार्थ्यांचा मोठा गट माओवाद्यांच्या गळाला लागला असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.
 
 
आतापर्यंत दुर्गम जंगलांमध्ये असलेला नक्षलवाद लहान-मोठ्या शहरांमध्येही येऊन पोहोचला आहे. यासाठी माओवादी संघटनांनी आपल्या रणनीतीत बदल केला असून, शहरात राहून सशस्त्र संघर्षात भाग घेण्यासाठी बुद्धीभेद केलेल्या व्यक्तींचा वापर करण्याचे तंत्र त्यांनी वापरात आणले आहे. अशा व्यक्तींची जळगाव व अमळनेर शहरातील काही नामांकित शिक्षण संस्थांमध्ये पेरणी करण्यात आली असल्याचा संशय आहे.
 
 
ऑगस्ट 2016 मध्ये जळगाव आणि अन्य जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जवळीक सांगणारी संघटना स्थापन केली होती. परंतु, त्यांचा छुपा अजेंडा हा माओच्या विचारांशी मिळता-जुळता होता.
 
रोहित वेमुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम घेण्याचा प्रयत्नही या विद्यार्थ्यांनी केला होता, अशी माहिती सांगितली जाते. शैक्षणिक संस्थाचालकांच्या पदाधिकार्‍यांमध्ये नक्षली चळवळी, शहरी नक्षलवाद याविषयी अज्ञान आहे किंवा त्या वाटेला जाऊन नसती कटकट अंगावर ओढवून घेण्यास संस्थांचे पदाधिकारी तयार नाहीत.
 
 
पण आपल्या संस्थांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे ते कमालीचे अस्वस्थ असल्याचे वास्तव तेही नाकारत नाहीत. यातूनच वसतिगृहातील हालचालींवर लक्ष ठेवण्याची सूचना काही शिक्षकांना देण्यात आल्याची समजते.
 
 
देशात विचार व्यक्त करण्यावर बंधने नाहीत, त्याचा गैरफायदा माओवादी विचारसरणीचे समर्थक उचलत आहे. त्यांनी पातळी ओलांडली तरच त्यांच्याविरोधात कारवाई करणे संस्थाचालक व तपास यंत्रणांना शक्य होणार आहे. शिवाय समाजात दुही पेरणारे ते हेच म्हणून त्यांच्यावर उघडपणे आरोपही करू शकत नाहीत. याचाच गैरफायदा ही मंडळी घेत आहेत.
मराठवाडा, विदर्भ कनेक्शनवर लक्ष केंद्रित
 
माओच्या विचारांनी प्रेरित झालेल्या काही शिक्षकांनी आपल्यासोबत किती सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचा गट जोडला आहे? यात चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ तसेच मराठवाडा आणि विदर्भाशी कनेक्शन असलेल्या व्यक्तींचा कितपत सहभाग आहे ? यावर काही जण लक्ष ठेवून आहेत.
 
 
जळगावच्या एका शिक्षण संस्थेतील 20 ते 22 आणि अमळनेरातील पाच ते सहा विद्यार्थी कळत-नकळत माओवादाशी अर्थातच शहरी नक्षलवाद्यांशी जोडले गेले असल्याचा संशय आहे.
@@AUTHORINFO_V1@@