आरटीओला नकार झोंबला, चोपड्यात एसटीवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
जळगाव, 4 नोव्हेंबर - आरटीओने तपासणी मोहिमेत जप्त केलेली वाहने एसटी आगारात उभी करू देण्यास एसटीच्या स्थानिक अधिकार्‍यांनी नकार दिल्याने आरटीओने पाच ते सात एसटी बसेसवर चोपड्यात कारवाई केली आहे. या कारवाईविरोधात एसटीच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
 
 
आरटीओने गेल्या आठवड्यात चोपडा येथे वाहन तपासणी मोहीम राबविली. यात त्रुटी आढळलेली पण दंड न भरणार्‍या चालकांची खासगी वाहने जप्त केली गेली. नंतर ही वाहने एसटी आगारात उभी करण्यासाठी आरटीओचे अधिकारी घेऊन गेले असता, त्यांना एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी नकार दिला. आगारात पाच ते सात वर्षांपासून जप्त केलेल्या 12 ते 13 रिक्षा भंगार अवस्थेत उभ्या आहेत.
 
 यामुळे डास व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. आरटीओने आणलेल्या या वाहनांची जबाबदारी एसटी महामंडळाने का स्वीकारावी? आरटीओने लवकरात लवकर या रिक्षांचा लिलाव करावा. आगारात आधीपासूनच एसटी बसेस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नाही, त्यात बाहेरच्या वाहनांना जागा कशी द्यायची? असा प्रश्नही एसटीच्या अधिकार्‍यांनी केला. याच्या दुसर्‍या दिवसापासून आरटीओकडून एसटी बसेसवर कारवाईचे सत्र सुरू झाले. ओव्हरलोड, वायपर बंद असणे, रंग उडालेला असणे, सीट वाकडे असणे आदी कारणांसाठी एसटीला मेमो देण्यात आल्याचे समजते.या कारवाईबद्दल एसटीच्या स्थानिक अधिकार्‍यांनी आपल्या वरिष्ठांना कळविले.
 
त्यावर ‘एकच काय, अजून शंभर वाहनांवर कारवाई करू द्या. सर्वसामान्यांच्या परिवहन यंत्रणेला कसे वेठीस धरले जात आहे हेही जनतेला कळू द्या, असा सूर वरिष्ठांनी व्यक्त केला.
 
कारवाईच्या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारे कोणतीही कारवाई एसटीवर केली नसल्याची माहिती दिली. एसटीचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी संपर्क झाला नाही.
आरटीओने कोणती मर्दुमकी गाजवली ?
 
जिल्ह्यात खासगी अवैध वाहतूक अनिर्बंधपणे सर्रास सुरू आहे. त्याविषयी आरटीओ बोलायला तयार नाहीत, कठोर कारवाई करताना कधी दिसत नाही. खासगी बसेसच्या दुरवस्थेबाबत तर बोलायला नकोच. मात्र, सर्वसामान्यांचा आधार असलेल्या सरकारी एसटीला लक्ष्य करून आरटीओ कोणती मर्दुमकी गाजवत आहेत? असा प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@