रंगकर्मींमध्ये समन्वयाचा अभाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होणार रंगभूमी दिन, वाद संभाजीराजे नाट्यगृहाचा
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - जळगाव शहरात दरवर्षाप्रमाणे विष्णुदास भावे यांनी केलेल्या सीतास्वयंवर या 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या नाटकानिमित्ताने महाराष्ट्रात आणि जळगावात मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
 
मात्र, यावेळी जळगावातील काही संस्था या आपापल्या संस्थेत छोटेखानी कार्यक्रम साजरा करतील तर काही संस्था बालगंधर्व आणि संभाजीराजे नाट्यगृह या वेगवेगळ्या ठिकाणी रंगभूमी दिन साजरा करणार असल्याचे समजते.
 
मात्र, नाटक ही ज्याप्रमाणे एकसंध नाट्यकलाकृती आहे, त्याचप्रमाणे विविध संस्थांच्या नाट्यकर्मींनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करायला पाहिजे, असे मत काही उदयोन्मुख रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.
 
 
संभाजीराजे नाट्यगृहाचे भाडे परवडत नसल्याने काही रंगकर्मींनी या नाट्यगृहावर निषेध नोंदवत इतर ठिकाणी रंगभूमी दिन साजरा करण्याचे योजिले आहे तर काहींनी मात्र याच ठिकाणी रंगभूमी दिन साजरा करण्याचे मनात ठाम करत यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगितले आहे.
 
 
संभाजी राजे नाट्यगृहात मराठी हौशी नाट्यस्पर्धा व्हावी, ही जळगावसह बाहेरील रंगकर्मींची अपेक्षा होती. परंतु, जिल्हाधिकार्‍यांनी नाट्यगृहाचे लावलेले भाडे हे शासनालाच परवडत नसल्याने नाटक करण्यापासून हौशी रंगकर्मींना वंचित राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
 
 
यावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदअंतर्गत सुकाणू समिती, शाखा जळगाव यांनी आतोनात प्रयत्नदेखील केले होते. थेट जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मंत्रालयापर्यंत विनवणी करूनही जिल्हाधिकार्‍यांनी नाट्यगृहाचे भाडे कमी केले नसल्याने रंगभूमी दिन दुसर्‍या ठिकाणी होण्यासाठी हौशी संस्था प्रयत्न करत आहेत.
 
 
मुळात जळगावातील कलाकारांनी एकत्र येत जर या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर हे काम सहजशक्य आहे. परंतु, या विषयात श्रेयाचे राजकारण शिजतेय का? असा सवालही काही उदयोन्मुख रंगकर्मींकडून निघताना दिसून येत आहे.
 
 
जोपर्यंत शहरातील रंगकर्मी एकत्र येत नाही, तोपर्यंत कोणतेही कार्य साध्य होणार नाही, असा अलिखित नियम कसा विसरला जाणार. महाराष्ट्रात कुठेही आकारले जात नाही, एवढे भाडे जिल्हाधिकार्‍यांनी आकारले असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? असाही प्रश्न स्थानिक रंगकर्मींकडून उपस्थित होताना दिसत आहे. सर्वांनी एकत्र येत हा तिढा सोडवला पाहिजे, असा सूर निघत आहे.
समन्वयकाची आज होणार नियुक्ती ?
 
तत्कालीन समन्वयकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी स्थानिक रंगकर्मींकडून मात्र चढोआढ सुरू झाली असून यासाठी काहींनी सांस्कृतिक कार्य संचालनालय येथे अर्ज दाखल केले आहेत.
 
कदाचित आज समन्वयक पदासाठीचे नाव माहीत होईल, असे सूत्रांनी सांगितले. संभाजी नाट्यगृहाचा तिढा सुटलेला नसताना आता समन्वयकपदही जळगावात नसल्याने होणार्‍या मराठी हौशी स्पर्धेचे कसे होईल, असा सूरही आता स्थानिक रंगकर्मींकडून निघताना दिसून येत आहे.
‘बालगंधर्व’ नाट्यगृहात रंगभूमी दिन
 
 
अखिल भारतीय नाट्य परिषद, सुकाणू समिती जळगाव शाखेतर्फे या वर्षीचा रंगभूमी दिन सोमवारी, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता बालगंधर्व नाट्यगृह येथे साजरा करण्यात येणार आहे.
 
जळगाव शहरातील नागरिकांनी, नाट्य कलावंत, नाट्य रसिक व नाट्य संस्थांशी निगडित सर्व नाट्य रसिकांनी यावेळी उपस्थित राहावे. यावेळी नटराज पूजन होऊन पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे समितीचे रमेश भोळे, अरिंवंद देशपांडे यांनी सांगितले आहे.
 
 
’संभाजीराजे’ नाट्यगृहातही रंगभूमी दिन
 
 
संभाजीराजे नाट्यगृह येथे जळगावातील काही रंगकर्मी जमून रंगभूमी दिन साजरा करणार आहेत. यावेळी मराठी हौशी नाट्य स्पर्धेसाठी संभाजीराजे नाट्यगृह मिळावे, यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांचीही उपस्थिती राहणार आहे.
 
यावेळी स्थानिक रंगकर्मींनी नाट्यगृहात जमून मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहात होण्यासाठी महापौर सीमा भोळे, आ. सुरेश भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी थेट संवाद साधून आपल्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. समस्त रंगकर्मींनी सकाळी 10 वाजता यावे, असे आवाहन हर्षल पाटील व रंगकर्मींनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@