वन विभाग कोणत्याही चौकशीस तयार : मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |


'वाघिणीला जेरबंद करण्यास गेलेल्यांवर तिने केला हल्ला'


मुंबई : अवनी अर्थात, टी-१ या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचाच वन विभागाचा प्रयत्न होता. परंतु, तिला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर अवनीने उलटा हल्ला चढवल्याने त्यांनी तिला ठार केले, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही वन्य प्राण्याला जेरबंद करणे किंवा ठार करणे, याबाबतचा निर्णय मी किंवा वनसचिवांनी घेण्याचा अधिकारच नसून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच हे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

सोमवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी टी-१ वाघिण मृत्यू प्रकरणी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अवनीच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवरून काहीजण ज्याप्रकारे टीका करत आहेत, त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे. तसेच, या घटनेबाबत माहितीच्या अज्ञानातून प्रश्न उपस्थित केले असल्याची टीकाही त्यांनी केली. अवनी वाघिण नरभक्षक बनल्यानंतर आधी तिला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आणि ते न झाल्यास ठार करण्याचे आदेश या वन विभागाच्या संबंधित तज्ज्ञ समितीने दिले. एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्वांतच तशी तरतूद आहे. त्यानंतर वन्यजीवप्रेमींनी हा विषय उच्च न्यायालयात नेला, परंतु तिथेही निर्णयाला परवानगी मिळाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

प्रारंभी अवनीला जेरबंद करण्यासाठीच प्रयत्न करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी अवनी दिसल्याचे वन कर्मचाऱ्यांना कळवल्यावर तिला जेरबंद करण्यासाठी कर्मचारी गेले. त्यावेळी तिने उलटा हल्ला चढवल्याने वन कर्मचाऱ्यांना तिच्यावर गोळी झाडावी लागली, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. वनविभागाने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळल्याचा दावा करत ते म्हणाले की, गेले दीड-दोन महिने विभागाचे १५०-२०० कर्मचारी अवनीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील होते. अवनीने १३ माणसे मारल्यावर स्थानिक, आदिवासी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. स्थानिक आदिवासी, शेतकऱ्यांचा असंतोष समजून घेतला नाही तर काय होते, हे उत्तर प्रदेशमध्ये वाघिणीबाबत घडलेल्या घटनेतून दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, अवनीला जेरबंद करणे किंवा ठार करणे यातील काहीच केले नसते, तर जे लोक पर्यावरणाचे, वनांचे रक्षण करतात, संवर्धन करतात, ते आदिवासी बांधव वन्य प्राण्यांचे शत्रू बनण्याचा धोका होता. त्यामुळे स्थानिक असंतोष आणि वनसंवर्धन यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

 
 

टिकाकारांना प्रत्युत्तर

 

वनमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळात केवळ एकदाच, २०१७ मध्ये एका वाघाला जेरबंद करण्याचा आदेश दिला गेला. उलट, वाघांच्या संवर्धनासाठी वन विभागाने गेल्या चार वर्षांत सर्वाधिक काम केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना मी स्वतः पत्र लिहिणार असून त्याद्वारे गांधी यांनी कोणतीही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील चौकशी करावी, वन विभाग त्यासाठी तयार असल्याचे सांगणार आहे. आणि त्यांना हेही सांगणार आहे, की त्यांनी समाज माध्यमांद्वारे अशी हीन दर्जाची भाषा वापरून वन विभागाचे खच्चीकरण करू नये, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, टी-१ वाघिण मृत्यू प्रकरणात कोणालाही काहीही प्रश्न असल्यास वन विभागाचे अधिकारी किंवा मी स्वतः त्याचे उत्तर देण्यास तयार आहोत, परंतु अशा प्रकारे अपुऱ्या माहितीच्या आधारे अपप्रचार करणारे भाष्य करू नये, असेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

 

नवाब शहाफत अली खानविषयी..

 

या सर्व प्रकरणात टीकेच्या केंद्रस्थानी असलेला हैदराबादचा नवाब शहाफत अली खान हा कोण आहे, हे मला माहिती नाही. परंतु, विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो या विषयात अधिकृतरित्या काम करत असून कित्येक राज्यांनी त्याची या कामांसाठी नियुक्ती केली असल्याचे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच, जेव्हा अवनीला मारले, तेव्हा तो तिथे नव्हताच, तो बिहारमध्ये त्या राज्याच्या वन विभागाच्या बैठकीसाठी गेला होता, असाही खुलासा मुनगंटीवार यांनी केला. तसेच, याच व्यक्तीने २००९ मध्ये उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथे एका नरभक्षक वाघाला मारले होते. त्याच्या शासनातर्फे कौतुकही करण्यात आले होते. त्याच पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी खासदार आहेत, ही घटनादेखील त्यांनी यावेळी नमूद केली. तसेच, मनेका गांधी यांनी समाज माध्यमांऐवजी मला केवळ ५० पैसे खर्च करून फोन केला असता, तर मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले असते, असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@