एका कलाकाराची कुचंबणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
 
 
 

मोदींच्या सत्ताकाळात देशाची अवस्था वाईटातून उत्तमाकडेच होताना दिसते. पण, बारामतीतल्या काकांच्या सांगण्यावरून पोपटपंची करणाऱ्यांना हे कसे कळणार? आपल्या व्यंगचित्रांतून खरेतर राज ठाकरे खूप मोठा परिणाम आजही साधू शकतात आणि नको त्या लोकांशी हातमिळवणी केल्याने चांगल्या कलाकाराचीही माती होऊ शकते. राज ठाकरेंच्या मनातल्या कलाकाराची इथेच कुचंबणा झाली आणि होतेय.

 
 

शरद पवारांनी चाटवलेल्या मात्रेमुळे सुदृढ झाल्याच्या कैफात वावरणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरेंना आता अवघा देशच आयसीयूत गेल्याचे वाटते. दीपावली म्हणजे आनंदाचा, तेजाचा उत्सव, पण या पर्वाचा आपल्या राजकारणासाठी वापर करत राज ठाकरेंनी मोदींवर टीका करण्याची एक नामी शक्कल लढवली आणि दिवाळीनिमित्त व्यंगचित्रांची खास मालिका सादर करणार असल्याचे ट्विट केले. याच मालिकेतील धनत्रयोदशीला काढलेल्या पहिल्या व्यंगचित्रातून त्यांनी आपली जळजळ जाहीरपणे व्यक्त केली. अर्थात केवळ मनोरंजनासाठी भोवती जमा होणाऱ्या जनतेने मतांचे दान पारड्यात टाकल्याने कफल्लक झालेल्या राज ठाकरेंना ब्रशचे फटकारे मारण्याशिवाय दुसरे काही काम उरलेले नाही, हेही खरेच म्हणा. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीची इथून-तिथून-सगळीकडून झळ बसल्याने धंदे मंदावलेल्या लोकांनी भाजपविरोधात कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली होती. अशीकुई... कुई...’ करणारी मंडळी आजही निरनिराळ्या व्यासपीठांवरून अधूनमधून आपले रडगाणे गाण्याचे काम नेमाने करतच असतात. अशा मोदींविरोधात बोलणाऱ्या लोकांमध्ये राज ठाकरेंचा वरचा क्रमांक लागतो. कदाचित नुकसानाची व्याप्ती मोठी असल्यानेही असे असू शकते. म्हणूनच राज ठाकरेंनी प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राळ उडवून देण्याची संधी शोधण्याचा प्रयत्न केला आणि आज चितारलेले व्यंगचित्र त्याच प्रयत्नांचा एक भाग. पण आदेश दिला की, बेछूट होणाऱ्या मूठभर पाठीराख्यांशिवाय अन्य कोणी कधी पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचे मुसळ केरात गेले. व्यंगचित्र पाहून टाळ्या पिटणाऱ्यांना राज ठाकरे आणि मनसे कधी मनापासून भावलेच नाही.

 
 

७०च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी परप्रांतीयांमुळे मुंबईतल्या मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र समिती असेल, काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष वा कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनीच मुंबईसह महाराष्ट्र राज्य आकाराला आल्याच्या खुशीत इथल्या मराठी माणसांच्या दबत चाललेल्या आवाजाच्या आणि पुसल्या जाणाऱ्या अस्तित्वाच्या प्रश्नाला वाऱ्यावर सोडले. याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी मराठीजनांच्या मनात धुमसणाऱ्या असंतोषाला आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. ‘मार्मिकमधून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी मुंबईच्या उरावर आपटणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधात आणि राज्यासह देशपातळीवरील नेत्यांविरोधात आघाडी उघडली. यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म झाला त्यानंतर मुंबई महापालिकेची सत्ताही शिवसेनेने हस्तगत केली. बाळासाहेबांनी एकेकाळी व्यंगचित्रांतून सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न मांडले, तर आज बाळासाहेबांबरोबरच कधीकाळी वावरलेल्या राज ठाकरेंनी त्याचा वापर फक्त स्वार्थासाठी केल्याचे दिसते. एकटे मोदी तेवढे चोर आणि इतर सगळेच साव, अशी वृत्ती त्यांच्या व्यंगचित्रातून नेहमीच प्रकट झाली. पण, अलिबाबा आणि चाळीस चोरांसारख्या राजकारण्यांच्या कळपात मोदींसारखे खणखणीत नाणे जनतेनेच सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसवल्याचे राज ठाकरे विसरले. जर मोदी आणि भाजप वाईटच असतील तर गेल्या साडेचार वर्षांतल्या जवळपास सर्वच निवडणुकीत विरोधकांचा विजय झाला असता. मात्र, तसे घडले नाही. कारण, जनता शुद्धीवर आहे आणि तिला बेशुद्धीत जगणाऱ्यांच्या हाकाट्यांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. राज ठाकरेंनी हे समजून घेतले तर त्यांचे तारु कुठेतरी हेलकावे खाण्याऐवजी नक्कीच सुखरुप इच्छितस्थळी पोहोचू शकते. अर्थात, शरद पवारांनी कळ फिरवली की कठपुतळीप्रमाणे नाचणाऱ्या राज ठाकरेंच्या डोक्यात हे घुसेलच याची कसलीही शाश्वती नाही.

 
 

शिवसेनेतून फुटून निघाल्यापासून राज ठाकरेंची वाटचाल पाहिली तरी आपल्याला दोन्ही पक्षांची अवस्था नेमकी काय हे लक्षात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी एका खटक्यात १३ आमदार निवडून आणले. यावरच त्यांची ती फेमस डायलॉगबाजीही झाली, पुढे फिल्मी डायलॉगबाजीने तुम्ही जनतेच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवू शकत नाहीत, याचा प्रत्ययही राज ठाकरेंना लवकरच आला. दरम्यानच्या काळात नाशिक महापालिकेवर मनसेचा रंगीबेरंगी झेंडा फडकावल्याने राज ठाकरेंना गगन ठेंगणे वाटू लागले. मात्र, महाराष्ट्राच्या विकासाचीब्लू प्रिंटआपल्याकडे असल्याच्या बाता मारणाऱ्यांना जिथे शक्य होते तिथेही विकासाची, प्रगतीची ठिणगीसुद्धा शिलगावता आली नाही. सोबतच निवडणुका आल्या की, झोपेतून जाग्या होणाऱ्या राज ठाकरेंना कार्यकर्ते आणि पाठीराखेही सोडून जाऊ लागले. निवडणुका जिंकण्यासाठी कष्ट करण्याची तयारी नसल्याने गेल्या १२ वर्षांत उरलो केवळ एका आमदारापुरता म्हणण्याची वेळ राज ठाकरेंवर आली. आता तर पक्षस्थापनेपासून सातत्याने अधोगती होत गेलेल्या पक्षाचे सेनापती म्हणूनच राज ठाकरेंकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. दुसऱ्या बाजूला मराठी माणसाच्याच नावावर मतांचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेची स्थिती चढत्या कमानीसारखीच राहिली. बाळासाहेबांमागे उरलेल्या सेनेने मुंबई महापालिकेसह राज्याच्या सत्तेतही वाटा मिळवला. सोबतच एकाच विचारांवर चालणाऱ्या दोन पक्षांतला विरोधाभास सामान्य मतदारालाही दिसला आणि मनसेची धूळधाण होत गेली. त्यामुळे राज ठाकरेंनी देशाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या आयसीयूत नव्हे, तर व्हेंटिलेटरवर गेलेल्या पक्षाची काळजी करणेच, त्यांच्या हिताचे ठरेल.

 
 

आता राज ठाकरेंनी व्यंगचित्रात वापरलेल्या भाषेबद्दल- काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने देश गलितगात्र झाल्याने जनतेनेच निष्णात शल्यचिकित्सक असलेल्या नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता सोपवली. ज्या लोकांनी आयुष्यभर देश विकून खाल्ला, त्यांच्या हातून देशाची सत्ता स्वीकारल्यावर तात्काळ मोदींनी इलाज करायला सुरुवात केली. याच इलाजांतर्गत नोटाबंदी, लाभार्थ्यांच्या खात्यांत थेट अनुदान, जीएसटी आदींचा समावेश होतो. मोदींनी खंगलेल्या देशाला सावरण्यासाठी केलेल्या उपायांमुळेच आजइझ ऑफ डुईंगच्या यादीत भारताचे स्थान वधारून १०० वरून ७७ वर पोहोचले. म्हणजेच, मोदींच्या सत्ताकाळात देशाची अवस्था वाईटातून उत्तमाकडेच होताना दिसते. पण, बारामतीतल्या काकांच्या सांगण्यावरून पोपटपंची करणाऱ्यांना ही गोष्ट कशी कळणार? आपल्या व्यंगचित्रांतून खरेतर राज ठाकरे खूप मोठा परिणाम आजही साधू शकतात आणि नको त्या लोकांशी हातमिळवणी केल्याने चांगल्या कलाकाराचीही माती होऊ शकते. राज ठाकरेंच्या मनातल्या कलाकाराची इथेच कुचंबणा झाली आणि होतेय. ती त्यांनी लवकर लक्षात घेतली तर ठीक, नाही तर आहेच अपयशाचे स्वामित्व!

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@