निवृत्त शिक्षकाच्या दातृत्वामुळे उभा राहतोय गरजूंसाठी दवाखाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |
रेडक्रॉस स्वीकारणार जबाबदारी, पुढील वर्षी होणार लोकार्पण
 
 
जळगाव, 4 नोव्हेंबर - मू. जे. कनिष्ठ महाविद्यालयातील निवृत्त शिक्षक शालिग्राम (शा. ना. पाटील) व जिजाबाई पाटील यांच्या दातृत्वामुळे गिरणा पंपिंग रस्त्यावर लवकर गरजू रुग्णांसाठी दवाखाना सुरू होणार असून, त्याची जबाबदारी रेडक्रॉस घेणार आहे. पुढील वर्षात हा सामाजिक उपक्रम कार्यान्वित झालेला असेल.
 
 
रेडक्रॉसच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, मानद कोषाध्यक्ष सतीश चरखा, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहकोषाध्यक्ष जी. टी. महाजन, कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय चौधरी, प्रा. शेखर सोनाळकर, पुष्पाताई भंडारी, अ‍ॅड. हेमंत मुदलियार, रेडक्रॉस स्थापनेवेळी प्रथम रक्तदाते असल्याचा बहुमान मिळविलेले डॉ.सतीश चित्रे हेही उपस्थित होते.
 
 
संस्थेचे सदस्य प्रा. नीळकंठ गायकवाड, विजय रामदास पाटील, धनंजय जकातदार, मुकुंद गोसावी, डॉ. जे. बी. राजपूत, अ‍ॅड. मंजूळा मुंदडा यांनी रेडक्रॉसच्या सुरू असलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक करून कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
 
 
शालिग्राम नवलराम पाटील व जिजाबाई शालिग्राम पाटील हे दाम्पत्य मौजे पिंप्राळा परिसरातील त्यांच्या मालकीच्या जागेवर स्व:खर्चाने बांधकाम करून देणगी स्वरुपात रेडक्रॉसला देणार आहेत.
 
या जागी गरजू रुग्णांसाठी दवाखाना सुरू केला जाणार असून, याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार आहे. या सत्कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पाटील यांचा संपूर्ण परिवारासह वार्षिक सभेत सत्कार केला.
 
या उपक्रमासाठी डॉ.जे.बी.राजपूत यांनी 10,000 रुपये, राघव सतरा यांनी 2500 रुपये, विजय रामदास पाटील यांनी 1100 रुपये देणगी दिली. सूत्रसंचालन राजेश यावलकर यांनी केले. आभार डॉ. रेखा महाजन यांनी मानले.
 
साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव
 
 
साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असलेले शा. ना. पाटील ठरवून शिक्षक झाले. महात्मा गांधीजींच्या विश्वस्त संकल्पनेवर त्यांचा दृढ विश्वास आहे. पाटील यांना निवृत्तीवेतन मिळते मात्र, ते आपल्या गरजेपेक्षा जास्त असून, उर्वरित पैसे समाजासाठी दिले पाहिजेत, ही त्यांची भावना आहे.
 
यातूनच त्यांनी पिंप्राळा शिवारातील त्यांचा 25 लाख रुपये किमतीचा प्लॉट रेडक्रॉसला देणगी स्वरुपात दिला असून, त्यावर ते दवाखान्यासाठी इमारत बांधून देत आहेत. हा दवाखाना रेडक्रॉस चालविणार असून, तेथे डॉक्टर व कर्मचारी नेमणार आहे. दवाखाना चालविण्यासाठी महिन्याला एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पाटील यांचे स्नेही प्रा. शेखर सोनाळकर यांनी दिली.
 
रामानंदनगरचा घाट उतरून खाली आल्यावर हरिविठ्ठलनगरजवळ हा दवाखाना असेल. तेथे पुढील वर्षी ओपीडी सुरू होईल. यामुळे गरजू रुग्णांची सोय होणार असल्याची माहिती रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@