संजय राऊत म्हणजे शिवसेना नव्हे : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |


मुंबई : शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे सध्या पुन्हा भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मात्र, या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ”संजय राऊत म्हणजे शिवसेना नव्हे,” असा टोला लगावत या टीकेची दखल आपण घेत नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. दीपावलीनिमित्त मंत्रालयीन पत्रकारांसाठी मुख्यमंत्र्यांतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे वर्षा निवासस्थानी अनौपचारिक वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. तसेच, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्यांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले असता फडणवीस उत्तरले की, ”संजय राऊत यांचे जे काही म्हणणे आहे, त्याबद्दल त्यांनाच विचारा. राऊत म्हणजे शिवसेना नव्हे,” असाही टोला त्यांनी लगावला.

 
 

गाणे म्हणायला वेळच मिळत नाही..

 

मुख्यमंत्री झाल्यापासून गाणी म्हणायला वेळच मिळत नसल्याची खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, लवकरच मी बहुधा गाणे म्हणणेच विसरेन की काय, असे मला वाटत असल्याचेही फडणवीस गमतीत म्हणाले. दीपावली साजरी करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ”मी लहानपणी खूप फटाके फोडायचो. मात्र अनेक वर्षांपूर्वी मी फटाके फोडणे बंद केले. आता कधी लहान मुलांसोबत फोडायचे असतील तर फुलबाज्यांसारखे साधे फटाके उडवतो. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एका वरिष्ठ पत्रकाराने ‘’तुम्ही तर रोजच राजकीय फटाके फोडत असता,” अशी टिप्पणी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.

 
 

अवनी मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार!

 

’टी-1’ अर्थात ’अवनी’ या वाघिणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ”वनविभाग अतिशय चांगले काम करीत आहे. तथापि, ’टी-१’ वाघिणीबाबत झालेल्या आरोपांची योग्य ती चौकशी करण्यात येईल,” अशीही घोषणा त्यांनी केली. ‘’वाघ जंटलमन असतात,” अशीही पुस्ती त्यांनी जोडली. यावर ‘’मग जंटलमॅन वाघ मोदींना पाठिंबा देतील काय?” असा प्रश्न एकाने विचारला असता ‘वाघ जंटलमॅन असतो म्हणूनच मोदींना पाठिंबा देईल!” असे मुख्यमंत्री तत्काळ उत्तरले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@