आवळ्या-भोपळ्याची मोट काही बांधली जाईना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018   
Total Views |



केवळ विरोधासाठी भाजपवर खोटेनाटे आरोप करणाऱ्या आणि भाजपमुळे देश धोक्यात आला असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांवर देशातील जनता विश्वास ठेवणार का? विरोधकांची आवळ्या-भोपळ्याची मोट बांधली जाण्याचे प्रयत्न चालू असले तरी ती मोट अजून काही दृष्टीपथात दिसत नाही.


 

सध्या देशातील वातावरण विविध मुद्द्यांवरून ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. एकीकडे पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे, तर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राम मंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अशी अत्यंत आग्रही भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे. गेल्या २९ ऑक्टोबरपासून रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भातील खटल्याची सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू होणार होती, ती त्या न्यायालयाने पुढे ढकलल्याबद्दल संघाने नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय असलेल्या राम मंदिरासंदर्भातील खटल्यापेक्षा अन्य महत्त्वाचे विषय आमच्यापुढे असल्याचे सांगून, आपणास हिंदू समाजाच्या भावनांची विशेष कदर नसल्याचे न्यायालयाच्या वक्तव्यावरून दिसून आले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशाराही संघाने दिला आहे. राम मंदिराप्रमाणे केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यावरून उलटसुलट चर्चा चालू आहे. मागील महिन्यात झालेल्या तीव्र विरोधामुळे, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असतानाही या मंदिराच्या कित्येक शतकांपासून चालत आलेल्या परंपरांचे उल्लंघन कोणालाही करता आले नव्हते. काल सोमवारी संध्याकाळी मंदिर पुन्हा उघडणार होते. ते लक्षात घेऊन मंदिर परिसर आणि मार्गावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शबरीमला देवस्थानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत केरळमधील हिंदू समाजात तीव्र नाराजी आहे. या सर्वांच्या जोडीनेच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका, तेथे चाललेली प्रचाराची धामधूम याकडेही देशाचे लक्ष आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यातील सत्ता भाजपच्या हातून हिरावून घेण्याचे विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत. त्यात यश मिळाले की, लोकसभा निवडणुका आपण जिंकल्याच, असे विरोधकांना वाटते. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विरोधी ऐक्य साधण्यासाठी आता तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. हे चंद्राबाबू नायडू काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमवेत होते, पण चंद्राबाबू नायडू यांना अचानक आपल्या पक्षावर मोदी सरकारकडून अन्याय होत असल्याचा साक्षात्कार झाला. त्या पक्षाने सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावही मांडला. पण प्रस्ताव मांडून हसे झाले ते विरोधकांचेच.

 

आता २०१९च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विरोधी ऐक्य साधण्याचे प्रयत्न चंद्राबाबू नायडू करीत आहेत. तेलगू देसम या पक्षाची स्थापनाच मुळी काँग्रेस विरोधातून झाली होती. काँग्रेसने तेलगू जनतेचा अपमान केला जात असल्याने एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेशातून काँग्रेसचे उच्चाटन केले होते. काँग्रेस आणि तेलगू देसम यांचे कित्येक वर्षांचे हाडवैर. पण, एन. टी. रामाराव यांचे जावई असलेले चंद्राबाबू यांनी हा सर्व भूतकाळ विसरून जाण्याचे ठरवून काँग्रेसपुढे विरोधी ऐक्याचा प्रस्ताव मांडला. आता भूतकाळ विसरायचा आणि केवळ भविष्याचा विचार करून एकत्रितपणे भाजपविरुद्ध संघर्ष करायचा, अशा आणाभाका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांनी घेतल्या. विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न तसे आधीपासूनच चालू आहेत. याहीवेळी चंद्राबाबू यांच्यासमवेत शरद पवार, फारुख अब्दुल्ला अशी मंडळी आहेतच. या विरोधकांचे एकच लक्ष्य आहे, भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून हटविणे. स्वत:चा असा कोणताच कार्यक्रम, ध्येयधोरणे त्यांच्यापुढे नाहीत. भाजपची सत्ता या सर्व विरोधकांच्या डोळ्यात सलत असल्याने खोटेनाटे आरोप करून त्या सरकारची बदनामी करण्याचे उद्योग या विरोधकांचे चालले आहेत. केंद्रातील भाजप सरकारमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. खरे म्हणजे भाजप सरकारपुढे विरोधकांची काही डाळ शिजत नसल्यानेच त्या पक्षावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपमुळे देशाचे भवितव्य संकटात आले आहे, देशात सगळा अनागोंदी कारभार चालू आहे, देशातील विविध प्रमुख संस्थांचे खच्चीकरण केले जात आहे, असे वाट्टेल ते खोटेनाटे आरोप करून सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. ‘लोकशाहीची अपरिहार्यता’ असल्याने आपण एकत्र येऊन भाजपचा सामना केला पाहिजे, असे चंद्राबाबू यांनी म्हटले आहे. आपल्याला हवे तसे मोदी सरकार वागत नसल्याच्या वैफल्यातून असे सर्व प्रयत्न चालू आहेत, हे न ओळखण्याएवढी देशातील जनता दूधखुळी नाही, हे या धुरिणांच्या लक्षात कधी येणार? देश वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे, असेही चंद्राबाबू यांनी म्हटले आहे. देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीय जनता पक्षावर असे आरोप करणे हास्यास्पदच!

 

भाजप सरकारमुळे निवडणूक आयोग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय, सर्वोच्च न्यायालय, आयकर विभाग अशा महत्त्वाच्या संस्थांचे खच्चीकरण होत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. आता त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचाही समावेश झाला आहे. खरे म्हणजे विरोधकांच्या अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही. केवळ भाजप सरकारविरुद्ध रान उठविण्यासाठी असे मुद्दे ओढूनताणून पुढे केले जात आहेत. भाजप सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे यावर आणि सरकारकडून महत्त्वाच्या संस्थांचे खच्चीकरण होत असल्याच्या आरोपांवर देशातील जनता मुळीच विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचे जे प्रयत्न चालू आहेत, ते कितपत यशस्वी होतील त्याबद्दल साशंकताच आहे. चंद्राबाबू नायडू यांना या भेटीगाठीच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. काँग्रेस पक्ष हा या देशातील एक महत्त्वाचा पक्ष असल्याचे आणि त्या पक्षाला बरोबर घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही, हे त्यांना मान्य करावे लागले. आपापले पक्ष त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, पण काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे, अशी कबुली चंद्राबाबू यांना द्यावी लागली. काँग्रेसने तेलगू जनतेचा अपमान केल्यावरून ज्या तेलगू देसम पक्षाची स्थापना एन. टी. रामाराव यांनी केली होती, त्या पक्षाचा विद्यमान नेता आणि रामाराव यांचा जावई काँग्रेसपुढे सपशेल लोटांगण घालत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडील काही दिवसांमध्ये शरद पवार, फारुख अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, शरद यादव, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, सीताराम येचुरी आदी नेत्यांची भेट घेऊन विरोधकांमध्ये ऐक्य साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. पण, काँग्रेसपासून काही अंतर राखण्याचे ठरविलेले अखिलेश यादव, मायावती यांच्यासारख्या नेत्यांचा या विरोधी आघाडीत मनापासून सहभाग राहील? राहुल गांधी, मायावती, ममता बॅनर्जी असे विरोधी नेते पंतप्रधानपदावर डोळा ठेऊन आहेत. ते तडजोड करण्यास तयार होतील का? मुख्य म्हणजे, केवळ विरोधासाठी भाजपवर खोटेनाटे आरोप करणाऱ्या आणि भाजपमुळे देश धोक्यात आला असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांवर देशातील जनता विश्वास ठेवणार का? विरोधकांची आवळ्या-भोपळ्याची मोट बांधली जाण्याचे प्रयत्न चालू असले तरी ती मोट अजून काही दृष्टीपथात दिसत नाही. समजा, कदाचित अशी मोट बांधली गेलीच तरी काही काळातच त्यातून आवळे आणि मोठे भोपळे बाहेर पडणार, हे अगदी उघडच आहे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@