तरुणांनो, रोजगार संधीचा लाभ घेऊन प्रगती साधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
‘अनुलोम’च्या रोजगार मेळाव्यात प्रांत राजेंद्र कचरे यांचे युवकांना नियुक्तीपत्र
 
पाचोरा, 3 नोव्हेंबर - युवकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेवून मिळालेल्या संधीचे सोने करावे तसेच दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची संख्या वाढत असून रोजगाराच्या संधी मर्यादित होत चालल्या असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले.
 
अनुलोम संस्था आणि पाचोरा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण युवकांना नोकरीसाठी नियुक्ती पत्राचेही वाटप करण्यात आले.
 
 
प्रांताधिकारी कचरे पुढे म्हणाले की, कोणतेही काम सकारात्मकपणे केल्यास जीवनात नक्कीच यश प्राप्त होते. जीवनात शिक्षण तसेच नोकरी याबाबत वेळीच निर्णय घेऊन चांगले काम निवडणे व एकाग्रपणे त्यावर परिश्रम घेणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. संयमाने आपण चांगले काम करत राहिलो तर एक दिवस नक्कीच मोठे होत असतो.
 
 
मात्र आपण निराशावादी जर राहिलो तर जीवनात प्रगती ऐवजी अधोगती येऊन गुन्हेगारी कृत्याकडे वाटचाल होत असते. त्यामुळे उद्यमशील व सकारात्मक राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. येथील पोलीस कवायत मैदानावर अनुलोम आणि पाचोरा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
भारत सरकारच्या कौशल विकास योजनेअंतर्गत निम या संस्थेच्या वतीने हा रोजगार मेळावा घेण्यात आला. दहावी तसेच बारावी उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मेळाव्याच्या निमित्ताने मान्यताप्राप्त कंपन्यांमध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
 
 
व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, प्रकल्पप्रमुख सुनील अहिरे अनुलोम जिल्हाप्रमुख दत्ता नाईक, पाचोरा भाग सेवक विकास लोहार, सुनील पाटील विनोद देशपांडे, ऋषिकेश करंगे आधी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड यांनीही उपस्थित सुशिक्षित तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.
मेळाव्यात 460 उमेदवारांच्या मुलाखती
 
मेळाव्यामध्ये 460 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यातील 270 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आल्याने त्यांना नाशिक तसेच पुणे येथील बॉस्को व तत्सम मान्यताप्राप्त कंपन्यांमध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
 
मुलाखतीसाठी पाचोरा तसेच चाळीसगाव, सोयगामव, धुळे भडगाव, मलकापूर कन्नड या तालुक्यांमधून असंख्य सुशिक्षित तरुण मुलाखतीसाठी आले होते. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखतीचे सत्र सुरू होते.
 
यशस्वितेसाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे व कर्मचारी प्रकाश पाटील, किरण पाटील ,गजानन काळे गुप्तवार्ता विभागाचे प्रकाश पाटील यासह वस्तिमित्र रमेश मोरे, समाधान पाटील, गणेश शिंदे,मयूर पाटील, समीर शिंदे, सागर पाटील, अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@