नक्षलवाद्यांमुळे देशाची अखंडता धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
‘तरुण भारत‘ दिवाळी अंक प्रकाशनप्रसंगी किशोर शितोळे यांचे प्रतिपादन

 
 
धुळे, 3 नोव्हेंबर ः ‘तरुण भारत’च्या शहरी नक्षलवाद या दिवाळी अंकाचे प्रकाशन 3 नोव्हेंबर रोजी धुळे येथील जी.आर.सिटी हायस्कूल गीताई सभागृहात झाले.
 
दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रमुख वक्ते किशोर शितोळे, द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शेलार, धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, जिल्हा संघचालक संजय चौधरी, धुळे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव संतोष शेठ अग्रवाल, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदू नागराज यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
मान्यवरांचा सत्कार ‘तरुण भारत’तर्फे करण्यात आला तसेच दीपप्रज्वलन करून दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन झाले. सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
 
 
नक्षलवाद्यांमुळे देशातील अखंडता धोक्यात आली असून त्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी देशद्रोही कारवाया करणार्‍यांवर वचक बसवून त्यांना जामीन मिळू नये, असे प्रतिपादन किशोर शितोळे यांनी केले. ते जळगाव ‘तरुण भारत’च्या शहरी नक्षलवाद या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले की, नक्षलवादी जंगलाचा वापर करून देशद्रोही कार्य करीत असतात. मात्र, त्यांनी आता त्यांची शहराकडे वाटचाल सुरू केली आहे. चळवळीचे ध्येय म्हणजे मोर्चाचे नेतृत्व वाढवायचे, हिंसा घडवून आणायची, प्रशासनाने बळाचा वापर केला तर अत्याचार केला, या विकृत प्रवृत्तीचा विचार समाजमनात पसरवून जनतेकडून सहानुभूती मिळवावी, यातून नक्षलवाद्यांना देशाची सत्ता खिळखिळी करायची आहे.
 
 
नक्षलवादी आपले आर्थिक नियोजन शहरातून चालवतात. शैक्षणिक संस्थेतून युवकांना लक्ष्य केले जाते. त्यांना भडकविले जाते, त्यांना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी प्रवृत्त केले जाते, त्या माध्यमातून हिंसा घडवली जाते, नक्षलवादी चळवळीतील विद्वेष भडकावून समाजव्यवस्था पोखरण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
 
 
 
या संघटनेला आपली सत्ता निर्माण करायची आहे. देशाची अखंडता अबाधित राहण्यासाठी सुजाण नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे, आशा देशद्रोही कारवाया करणार्‍यांना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा संघचालक संजय चौधरी यांनी ‘तरुण भारत’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
 
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष द्वारकाधीश प्रतिष्ठानचे रवींद्र शेलार यांनी ‘तरुण भारत’च्या आगळ्या-वेगळ्या शहरी नक्षलवादी या विषयावर दिवाळी अंक काढल्याबद्दल आभार मानले.सूत्रसंचालन रामदास माळी यांनी केले तर परशुराम मापारी यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@