दिमाखदार सोहळ्यात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |

मुंबई : दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे शनिवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी विलेपार्ल येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता सुबोध भावे, अभिनेता सुमित राघवन, उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
संपादक किरण शेलार आणि रविराज बावडेकर यांनी सर्व अतिथींचे पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण शेलार यांनी केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या विचारधारेच्या मूल्यांची ओळख त्यांनी करून दिली. उपस्थित मान्यवर आणि प्रमुख अतिथी हे अशा प्रकारच्याच मूल्यांची जपणूक करून संघर्षातून पुढे आल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. खा. पूनम महाजन आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे फीचर्सचे मुख्य उपसंपादक विजय कुलकर्णी यांचा यशस्वीरित्या दिवाळी अंकाचे संपादन केल्याबाबत सन्मान करण्यात आला.
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त मूल्यांची जपणूक आणि विचारधारा जपण्याच्या चर्चेची सुरुवात झाली. अभिनेता सुबोध भावे यांनी राज्यातील नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीबाबत निराशाजनक परिस्थितीविषयक परखडमत मांडले. महाराष्ट्रातील परंपरा आणि वारसा जपण्यामध्ये आपण कमी पडत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. जातीपातीमध्ये भांडण्याशिवाय आपल्या परंपरा जगाला अभिमानाने सांगण्यास सुरुवात करायला हवे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दिवाळीनिमित्त आपली हजारो वर्षांची परंपरा जपण्याची सुरुवात करण्याचा दीप आपण तेवत ठेवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील वारसा, धर्म, परंपरा हे प्राणपणाने जपायला शिकेल तोच आणि मूल्यजपणूक करेल, तोच खरा भारतीय असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 
खा. पूनम महाजन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंक प्रकाशनानिमित्त मनोगत व्यक्त करताना साहित्याविषयीची भूक केवळ महाराष्ट्र आणि इथल्यावाचकांमध्येच असल्याचे सांगितले. साहित्य कलेच्या अनेकविध पैलूंतून प्रकाशित होणारे दिवाळी अंक आज मराठी माणसाच्या वाचनाच्या भुकेमुळे टिकून असल्याचे त्या म्हणाल्या. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे दर्जेदार आशयामुळे प्रसारमाध्यमांमध्ये वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “मूल्य निर्मिती ही केवळ सहभागातून शक्य आहे. मराठी माणसात संघर्ष करण्याची ताकद असून महाराष्ट्राची मूल्यसंस्कृती जपण्याचे काम समाज निश्चित करेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांनीही यानिमित्त कलेकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा पैलू उलगडून दाखवला. ते म्हणाले की, “प्रत्येक व्यक्ती ही जन्मतःच चित्रकार असते. लहानपणापासूनच आपण काही ना काही रेखाटत असतो. मात्र, कालांतराने मोठे झाल्यावर कलेविषयक काही कळत नाही, असे सांगून मोकळे होतो. मुक्तछंद चित्र काढणारे आपण काळानुसार, मनाप्रमाणे जगायलाही विसरून जातो. त्यामुळे किमान आपल्या मुलांमध्ये तरी चित्रकला जोपासून त्यांच्यातील कला जोपासायला हवी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद ­­­­­चितळे म्हणाले की, “आयुष्यात जे स्वतःच्या मनाला पटेल ते करताना दुसरा दुखावणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ज्याला स्वतःशिवाय समाजाचा विचार करण्यासाठी वेळ आहे, अशा माणसांनी पुढे यायला हवे.”
 
‘आणि काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या निमित्ताने बोलताना अभिनेते सुमित राघवन म्हणाले की, “या सिनेमाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीला रुपेरी पडदा मिळत आहे. त्यामुळे ऊर भरून आले आहे. आम्ही रंगभूमीवर पाहिलेली पात्रे प्रत्यक्षात साकारायला मिळाली, हा एक वेगळा अनुभव आहे.”
 
मी पाहिलेले काशिनाथ घाणेकर साकारण्याचा प्रयत्न : सुबोध भावे
 
येत्या दि. 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘...आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे यांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले की, “या भूमिकेसाठी वेगळा असा अभ्यास किंवा वाचन करावे लागले नाही. एखाद्या शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये एखादे पात्र जेव्हा उभे करतो, त्या प्रमाणे हे पात्र मी उभे केले. मला कळलेले काशिनाथ घाणेकर मी या सिनेमातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. घाणेकरांसारखी शरीरयष्टी कमी करण्याचा प्रयत्नही केला,” असेही त्यांनी सांगितले. “हा चित्रपट नाकारण्याचीही वेळ आली होती. कारण इतकेच की, मला काशिनाथ घाणेकर यांच्या निळ्या डोळ्यांसाठी घालावे लागणारे लेन्स. मला त्याचा फोबिया असल्याने मी भूमिका नाकारली. मात्र, अखेर माझे मित्र आणि चित्रपटाचे वेशभूषाकार विक्रम गायकवाड यांनी समजूत काढल्यानंतर लेन्स घालण्यासाठी मी तयार झालो.”
 

खा. पूनम महाजन यांची फटकेबाजी
 
खा. पूनम महाजन यांनी यानिमित्त राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. राजकारणात सक्रीय असतानाही मराठी चित्रपट, नाटक, नेटफ्लिक्सवरील मालिका पाहत असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. बालपणी ‘भस्म’ या चित्रपटात एका मुलीची भूमिका साकारल्याचाही अनुभव त्यांनी कथन केला. अभिनयाचा राजकारणातही पुरेसा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या शाळेपासून सुरू झालेल्या अभिनयाचा प्रवासही त्यांनी यावेळी उलगडून दाखवला.
@@AUTHORINFO_V1@@