खातगाव, श्रावणी परिसरात‘जलयुक्त’मुळे भूजलपातळीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |
कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभागातर्फे पत्रकारांचा पाहणी दौरा
 
 
नंदुरबार, 3 नोव्हेंबर - जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती असताना नवापूर तालुक्यातील खातगाव, श्रावणी व निंबोणी या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यामुळे या गाव परिसरात अनेक बंधार्‍यात पाणी दिसून येत आहे.
 
 
परिसरातील दहा गावांतील विहिरींमध्ये जल पुनर्रभरणाचाही फायदा शेतकर्‍यांना होत असून परिसरातील भूजल पातळीत सुमारे दीड मीटरने वाढ झाल्याचे आशादायक चित्र दिसत असून परिसरात 184 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
 
 
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेल्या विविध कामांची पहाणी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, कृषी विभाग व मृद व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पत्रकार दौरा आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी संदीप वळवी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील, नवापूर तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी, मृद व जलसंधारण अधिकारी एम. वाय. शेख, मंडळ कृषी अधिकारी पुरुषोत्तम धनगर, कृषी पर्यवेक्षक पी.एम. पाटील, कृषी सहाय्यक पी.बी. पाटील, ग्रामसेवक डी. आर. गावीत उपस्थित होते.
 
 
या दौर्‍यात नवापूर तालुक्यातील श्रावणी, निंबोणी व खातगाव येथे शासनाच्या विविध विभागामार्फत करण्यांत आलेल्या विविध कामांची पहाणी करण्यात आली. नवापूर तालुक्यात श्रावणी गावात भात, गहू, सिताफळ, साग व कडीपत्ताची लागवड करण्यात आली आहे.
 
 
श्रावणी येथे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 15 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नाल्यावर नऊ ठिकाणी वीस मीटर बाय दीड मीटर उंचीचे गॅबियन बंधारा बांधल्यामुळे परिसरातील किमान 10 विहिरींचे पुनर्रभरण करण्यात आले असल्याचे मृद व जलसंधारण अधिकारी एम. वाय. शेख व कृषी सहाय्यक प्रशांत पाटील यांनी सांगितले.
 
 
खातगांव येथील विहिरी पुनर्रभरण झाल्यामुळे या परिसरात किमान 112 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@