त्यांचे वक्तव्य कोंडलेली वाफ आणि यांचे उद्गार न्यायालयाचा अवमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |



रा. स्व. संघाच्या विरोधकांनी चर्चा टाळली, तर चर्चा होणारच नाही. चर्चेचे बौद्धिक अवकाश त्यांनीच व्यापलेले आहे. चर्चा घडविण्याचे मंच त्यांच्याच ताब्यात आहेत. मात्र, रा. स्व. संघाला टाळून चर्चा करता येत नाही. हे त्यांच्या अवघड जागेचे दुखणे आहे.


दुटप्पीपणा भूमिका घेऊन वावरणं ही एक कला आहे. आपल्या परस्परविरोधी भूमिकेला तात्त्विक मुलामा देणे, हे कौशल्य आहे. अशा कला-कौशल्याच्या आधारे राष्ट्रीय मुद्द्यांभोवती संशय निर्माण करून गोंधळ उत्पन्न करणे, हे लिबरल असण्याचे लक्षण आहे. कथित शहरी नक्षलवाद्यांच्या खटल्याच्या सुनावणीबाबत प्रतिपादन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी त्या मानवतावाद्यांचे वक्तव्य किंवा व्यक्त होणे हा अपराध नसून तो डिसेंट आहे, असे प्रतिपादन केले होते. लोकशाहीत कोंडलेली वाफ बाहेर काढण्याचा त्यांना अधिकार असल्याचे ते द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले होते. त्यानुसार, ते शहरी कथित मानवतावादी, कवी, साहित्यिक शोषित-पीडित-वंचित-उपेक्षित अशा दबलेल्या घटकांची प्रातिनिधीक वाफ बाहेर काढत आहेत, असा अर्थ समस्त लिबरल गटाने काढला आहे. ते त्या दुर्बलांसाठी डिसेंट नोंदवत आहेत, असे लिबरल सांगत आहेत. राम मंदिर निर्मितीबाबत न्यायाला विलंब तो कोट्यवधी हिंदुंचा अपमान आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. हिंदू समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, असे आवाहन रा. स्व. संघाने केले आहे. संघाच्या या प्रतिपादनाला न्यायालयाचा अवमान, संविधान विरोधी अशी विशेषणे लावून आरोपी ठरविण्याची स्पर्धा लागली आहे. हाच लिबरल कावा आहे.

 

नक्षलींचे कळत-नकळत समर्थन केले जात आहे. मात्र, संघाचे म्हणणे हा लोकशाहीतील डिसेंट नाही, असे भासवले जात आहे. संघाचे व्यक्त होणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून चिथावणी आहे, असे वर्णन केले जात आहे. कोट्यवधी हिंदू म्हणजे संघाचे फक्त स्वयंसेवक अशी कुटाळकी केली जात आहे. यातून आपण हिंदू समाजाला संघाकडे ढकलत आहोत हे त्या ढकलणाऱ्यांच्या गावीही नाही. त्या कथित नक्षलींना अटक झाल्यावर ‘हो! मीसुद्धा नक्षलवादी’ असे म्हणण्याची टूम निघाली होती. तसा हॅशटॅगही चालवला गेला होता. आता पुन्हा संघाच्या वक्तव्यानंतर ‘मी दुखावलेला हिंदू नाही. मला राम मंदिर नको,’ असे सांगण्याचे फॅड सुरू झाले आहे. ‘त्या कोट्यवधी हिंदुंमध्ये मी नाही’ असा हॅशटॅग सुरू झाला आहे. संघ-भाजप विरोधक पुन्हा जुन्याच चुका नव्याने करून संघ-भाजपचे जनसमर्थन वाढावे, यासाठी हातभार लावत आहेत. राम मंदिराचा संपूर्ण लढा सांगण्याची संधी देत आहेत. हे प्रकरण किती वर्षे न्यायालयात प्रलंबित आहे, हेही नव्या पिढी समोर येत आहे. त्या तुलनेत काही निर्णय विनाविलंब कसे आले, याची चर्चा सुरू झाली आहे. १९८० ते १९९२ पर्यंत राम जन्मभूमी मुक्ती लढ्याचे विविध टप्पे, त्या आंदोलनाची झालेली येथे टिंगल आणि त्या चळवळीला देशभरातील हिंदू समाजाने दिलेला उस्फूर्त पाठिंबा याची उजळणी मंदिर विरोधकांच्यामुळे होणार आहे. स्युडो सेक्युलर ते स्युडो लिबरल हा रामविरोधकांचा प्रवास पुन्हा उलगडला जाणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू डॉक्ट्रिनने उभारलेले, डाव्यांनी पोसलेले, समाजवाद्यांनी तोंडी लावलेले अभारतीय विचारांच्या आधारे उभे केलेले भारत विरोधी कपोलकल्पित (Narrative) मांडणी, कथानक भारतीयांनी नाकारली आहेत. हे नाकारण्यात राम मंदिरच्या लढ्याचे मोठे योगदान आहे. स्वत्वाची जाणीव, आपल्या मुळांचा शोध यातून झाला होता.

 

हिंदुंचे एकत्र येणे, मंदिर चळवळीला पाठिंबा देणे हे संघ विस्तारासाठी नव्हते. भाजपच्या विजयासाठी नव्हते. संघवृद्धी आणि भाजप जिंकणे हे त्याचे बायप्रॉडक्ट आहेत. भारतीय समाज वैचारिक गोंधळात जिहादी दशतवादात आणि मिशनरींच्या धर्मांतराच्या चक्रव्युहातून आपली ओळख दृढ करू इच्छित होता. त्याला संघ भाजपने पाठबळ दिले. अन्य राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी संघ-भाजपवर टीका करत राहिले. राम अस्तित्वात नाही, असे सांगू लागले. जाग्या झालेल्या भारतीय समाजाला हिंदुत्वाची भीती घालत राहिले. २०१४ चा मोदी विजय हा पुन्हा न्यू लेफ्टच्या तंत्राने मांडल्या जाणाऱ्या विचारविश्वाचा परिणाम होता. आता पुन्हा टीम लिबरल नवे कथानक रचून (Narrative) राम मंदिर निर्णयाची दीर्घकाळाची प्रतीक्षा लक्षात न घेता हिंदुपणाला (Hinduness) म्हणजेच भारतीयतेला आव्हान देत आहेत. निर्णय का होत नाही? असा प्रश्न विचारण्याचे धाडस हा लिबरल समुदाय करणार नाही. अन्य बाबतीत त्वरेने निर्णय कसे होतात? याबाबत सोईस्कर मौन टीम लिबरल बाळगत आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय प्राथमिकता का नाही? असे विचारून यासाठी मेणबत्या पेटवण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही.

 

रा. स्व. संघाच्या विरोधकांनी चर्चा टाळली, तर चर्चा होणारच नाही. चर्चेचे बौद्धिक अवकाश त्यांनीच व्यापलेले आहे. चर्चा घडविण्याचे मंच त्यांच्याच ताब्यात आहेत. मात्र, रा. स्व. संघाला टाळून चर्चा करता येत नाही. हे त्यांच्या अवघड जागेचे दुखणे आहे. राम मंदिर मुक्ती चळवळीचे यश आणि निर्मितीचे यश राष्ट्रीय चर्चेत यापुढे भारतीयता टाळता येणार नाही हेच आहे. ज्या विचारांचे गोडवे गाण्यात धन्यता मानली, त्या विचारधारा केंद्रस्थानी नाहीत हे त्यांचे दुःख आहे. म्हणूनच ते संघ-भाजप पर्यायाने हिंदूविरोधी भूमिका घेत आहेत. रा. स्व. संघापेक्षा राम मंदिराचा मुद्दा अधिक वेगाने सर्वदूर नेण्यात छद्मी लिबरल अग्रेसर आहेत. आज न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या सडेतोड बाण्याचे कौतुक करणारे उद्या याच न्यायाधीश चंद्रचूड यांनी यांच्या भावविश्वाला जबर धक्का देणारा निर्णय दिला, तर त्यांना संघवाले ठरविण्यासाठी पुढाकार घेतील. दुटप्पीपणा असाच असतो.

 

- मकरंद मुळे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@