सकारात्मकतेचं संजीवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
दिवाळी प्रकाशाची वाट दाखवते. पण, ही वाट फक्त बहिर्मुख नाही, तर अंतर्मुखही आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिव्यांमुळे बाह्यरंग उजळत असताना अंतर्मनातही चैतन्याच्या ज्योती तेवायला हव्यात. प्रत्येकाने आपल्याला भावेल तसा दिवाळीचा आनंद लुटायला हवा. कारण, सुख अनुभवण्याची, आनंदाला सामोरं जाण्याची प्रत्येकाची पद्धत, धारणा वेगळी असू शकते. हा तेजाचा उत्सव प्रत्येकाने आनंदी आणि उत्साही मनाने साजरा करायला हवा...
 

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. दरवर्षी साजर्‍या होणार्‍या या प्रकाशोत्सवाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. जो तो आपापल्या पद्धतीने या प्रकाशपर्वाला सामोरं जात असतो. साजरीकरणाची प्रत्येकाची समीकरणं वेगळी असतात. पण काहीही असलं तरी हे दिवस मांगल्य, चैतन्य आणि सकारात्मकतेने भारलेले असतात. त्यामुळेच सकारात्मकता अंगी बाणवण्याची संधी घेऊन येणारा हा सण आहे, असं मी मानते. शेवटी आपल्या वैयक्तिक अथवा सामाजिक आयुष्यात सगळं काही मनाप्रमाणे अथवा आपल्याला हवं तसंच घडत नाही. मनाविरुद्ध घडल्यानंतर मन खट्टू होणंदेखील स्वाभाविक आहे पण, मनात त्याच भावनांचा काळिमा ठेवून उपयोग नसतो. आनंद अनुभवणं, मन प्रफुल्लित ठेवणंही अत्यंत गरजेचं असतं. झाकोळलेला आनंद अनुभवण्यात काहीच सुख नाही. म्हणूनच समोर येईल तो आनंद अनुभवणं आणि तो वाटून द्विगुणित करणं अधिक गरजेचं आहे. तुम्ही आनंद कसा मिळवता हे गरजेचं आहे. बाहेरची परिस्थिती नकारात्मक आहे, माहोल विषण्ण करणारा आहे, असं म्हणत कुढण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीवर मात करून आनंद मिळवण्यालाच जगणं असं म्हणतात. दिवाळी आपल्याला असं निखळ आणि आनंदमयी जगण्याचा मूलमंत्र सांगते.

 

दिवाळी ही सर्व सणांची महाराणी! हा सकारात्मक मनोवृत्तीचा प्रकाशमय आणि तेजोमय उत्सव. तो तेवढ्याच सकारात्मकतेने साजरा व्हायला हवा. आम्ही मोठ्या आनंदात दिवाळी साजरी करतो. माझी मुलगी आवाज करणारे फटाके उडवत नाही. भुईचक्र, भुईनळे हेच तिचे आवडीचे फटाके. ते ती आनंदाने उडवते पण, स्वत:साठी घेते तितकेच फटाके ती झोपडपट्टीत वाटण्यासाठी घेते. हा तिचा समजायला लागल्यापासूनचा रिवाज आहे. यातून तिला खूप आनंद मिळतो. प्रत्येक दिवाळीत मला लहानपणची दिवाळी आठवते. आपल्याकडे वर्षभर सणांचं सत्र सुरू असतं. त्यामुळेच मी आजीला विचारायचे, “आपल्याकडे एकसारखे कसे गं सण सुरू असतात? का साजरे करायचे इतके सगळे सण?” त्यावर नऊवारी नेसणारी, शाळेत कमी पण अनुभवाच्या शाळेत पारंगत झालेली माझी आजी सांगायची, “सगळ्यांना एकमेकांबरोबर आनंद वाटण्याची संधी मिळावी, या हेतूने आपल्या पूर्वजांनी या सगळ्या सणांचं नियोजन केलं आहे. सण म्हणजे स्वत:मधील सकारात्मक भावनांचं संजीवन.” तिचे हे शब्द आजही माझ्या कानात रुंजी घालतात. माझी आजी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ अनुभवलेली एक बाई. तिचा धाकटा भाऊ स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर काम करत असे. बराच काळ तो भूमिगतच असायचा. त्या वेळच्या आठवणी सांगताना “माझ्याकडे फक्त तीन सदरे होते,” असं आजोबा सांगायचे. कारण, त्या वेळी सगळ्यांचीच परिस्थिती सामान्य होती. गांधीजींच्या हत्येनंतर तर संपूर्ण ब्राह्मणआळी जाळण्यात आली होती. लोक रस्त्यावर आले होते. या पिढीने पारतंत्र्याची झळही सोसली होती. कमालीचं दारिद्य्र अनुभवलं होतं. असं असूनही तिचा सणांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता.

 

या पार्श्वभूमीवर आज तर आपण अनेक सुखांचा उपभोग घेत आहोत. एक स्वतंत्र आणि सुरक्षित आयुष्य जगत आहोत. त्यामुळे दिवाळीचा आनंद मनमुराद आणि भरभरून लुटायला हवा. दिवाळी प्रकाशाची वाट दाखवते. पण ही वाट फक्त बहिर्मुख नाही, तर अंतर्मुखही आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिव्यांमुळे बाह्यरंग उजळत असताना अंतर्मनातही चैतन्याच्या ज्योती तेवायला हव्यात. प्रत्येकाने आपल्याला भावेल तसा दिवाळीचा आनंद लुटायला हवा. कारण, सुख अनुभवण्याची, आनंदाला सामोरं जाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे मूलभूत नियमांचं पालन करत प्रत्येकाने कोणालाही साजरीकरणाच्या पद्धती न शिकवायला जाता आपापल्या पद्धतीने त्याकडे पाहायला हवं. मला आवडतं ते मी करावं, समोरच्याला आवडतं ते त्याने करावं. काही लोकांचा आनंद स्वार्थसुखाय असतो, काहींचा परमार्थात असतो. त्यातही आता आपण पुढचं पाऊल टाकलं आहे. आता आपण सगळे ‘ग्लोबल सिटीझन’ आहोत. पण, पुढची पिढी तर १०० टक्के ग्लोबल आहे. आपण १८० अंशाच्या कोनातून ग्लोबल असू, तर ते ३६० डिग्री ग्लोबल आहेत. हातातील गॅझेट्सच्या माध्यमातून ते सतत जगाच्या संपर्कात असतात. जगाच्या प्रांगणात वावरणार्‍या या पिढीला आपल्या सणांचं महत्त्व कळावं म्हणूनही घरोघरी ते साजरे व्हायला हवेत. यातूनच आपली संस्कृती काय आहे, आपले वाडवडील नेमक्या कुठल्या जाणिवेने आयुष्याकडे पाहायचे हे त्यांना समजेल. शेवटी सणांनीच संस्कारांना अधोरेखित केलं आहे. आपले रोजचे संस्कार वरणभाताचेच असतात. आपलं रोजचं जगणं अगदी साचेबद्ध पद्धतीचं असतं. आपण दररोज लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या, कडबोळी घरी करत नाही. म्हणूनच जमतील तितके हे फराळाचे पदार्थ करणं, ताटं वाटणं गरजेचं आहे.

 

आता दिवाळीचा पूर्वीइतका थाटमाट शक्य नाही. आता कोणीही अंगणात किल्ले तयार करत नाही. मी स्वत: अजूनही माझ्या लहानपणची किल्ल्यावरची खेळणी अगदी जपून ठेवली आहेत! ते मावळे, किल्लेदार, वाघ-सिंह, ससे, शिवाजी महाराज यांच्या मातीच्या मूर्ती आजही माझ्याकडे आहेत. पण, सध्या अगदी मोजक्या घरांमध्ये किल्ले तयार केले जातात. आता ही परंपरा एक प्रकारे मागे पडत आहे. त्यामुळे खट्टू होण्याचं काहीही कारण नाही. कारण जग बदलत असतं. या बदलाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे काही हातून सुटणार तर काही गवसणार, हे चक्र स्वीकारतच आपण सणांचं स्वागत करायला हवं. सध्या ध्वनी आणि वायूचं प्रचंड प्रदूषण आहे. त्याला आपला हातभार लागता कामा नये. इतकी सुजाणता आणि जागरूकता प्रत्येक नागरिकाकडे हवी. त्यानुरूपच सणांच्या उत्साहालाही आवर घालता यायला हवा. लहानपणी आम्ही बाटलीतून बाण उडवत असू. ते मोठा आवाज करत वर जायचे पण, तेव्हा ते धोकादायक नव्हतं. कारण, बहुतांश घरं बैठी असायची. इमारतींची उंचीदेखील आत्ताइतकी गगनचुंबी नसायची. आता सगळीकडे टॉवर्सचं राज्य आहे. त्यामुळे बाण सोडताना उंचावरील एखाद्या घरात शिरण्याची दाट शक्यता असते. यातूनच अपघाताची शक्यता बळावते. आता ध्वनिप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ठराविक काळातच फटाके उडवण्याविषयी न्यायालयाच्या सूचना आहेत. त्याचंही पालन व्हावं. हे सर्व बदल काळानुरूप गरजेचे आहेत. सण साजरे करावेत, गरज आहे ती थोड्या नियमन आणि नियंत्रणाची.

 

प्रत्येक सणाला आनंदाचीच तोरणं असतात. त्यामुळेचप्रत्येक सण वेगळी उमेद, ऊर्जा आणि आनंद घेऊन येतो. या निमित्ताने घरं एकत्र येतात, समाज एकत्र येतो. सध्याच्या नाती दुरावण्याच्या काळात अशा प्रकारे एकत्र येण्याची खरी गरज आहे. सध्या एक ‘हाय’चा मेसेज आणि एखादी इमोजी पाठवून तथाकथित संपर्क ठेवला जातो; पण, अशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात असणारे चेहरे कधीच एकमेकांसमोर येत नाहीत. एकमेकांची विचारपूस करत नाहीत. यामुळे स्पर्शाची भाषा मात्र हरवली आहे. नजरेचाही स्पर्श नाही आणि मायेचाही स्पर्श नाही. म्हणूनच ही भाषा टिकवून ठेवण्यासाठी आणि बोलण्यासाठी तरी सण साजरे करायला हवेत. पूर्वीचा समाज काटकसरी वृत्तीचा होता. ते सण साजरे करत असत; फक्त आत्ताइतकी पैशाची उधळण नसे. मात्र, आता पैशाची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे आता बाजाराचं प्रस्थही वाढलं आहे. आज सुखाचा संबंध बाजाराशी जोडला जात आहे. त्यामुळे सणावारीनिमित्त खरेदीला उधाण येतं. हा सगळा ‘इझी मनी’चा परिणाम आहे. पण खर्चाचं प्रमाण वाढलंय, असं आपण म्हणतो तेव्हा मिळकतीचं प्रमाण वाढलं आहे हेदेखील आपण लक्षात घ्यायला हवं. संधी, सवलत आणि आवक यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच आता लोक मनसोक्त खरेदी करून सण साजरे करतात. त्यात वावगं काहीच नाही. या पिढीला एका वेगाने पुढे जावं लागतं. हे ‘जेट युग’ आहे. त्यामुळे वेग कमी करणं त्यांना परवडण्यासारखं नाही. सणांसाठी या वेगाला अवरोध घाला, असं म्हणणंही अत्यंत मूर्खपणाचं आहे. पण, वेगाने पळताना आपल्या माणसांचे हातही हातात असायला हवेत. त्यासाठी नात्यांची वीण पक्की असायला हवी. एकटं पळताना प्रसंगी शिणवटा आणि एकाकीपणा जाणवू शकतो पण, सगळे सवे असतील तर वेगाचीही मजा घेता येईल आणि सगळे बरोबर असल्याचा आनंदही घेता येईल. या हेतूनेही सणांचं साजरीकरण महत्त्वाचं आहे. चला तर मग, या जाणिवेनेच दिवाळीला सामोरं जाऊ या... तेजोमय पर्वाचं स्वागत करूया...

 

- निशिगंधा वाड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@