हायरोग्लिफ्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2018   
Total Views |



प्राचीन इजिप्तमधील देवालये आणि पिरॅमिडच्या थडग्यांवर, चिह्नलिपीचा वापर करून अनेक घटनांची चिरकाल टिकणारी नोंद केली गेली. अशा नोंदींसाठी चिह्न निवडणारे अभ्यासू वैज्ञानिक आणि ती चिह्न लिपी लिहिणारे लेखनकार अशी मांडणी केली गेली होती. अशा नोंदींना Hieroglyph म्हणजेच ‘हायरोग्लिफ्स’ असे संबोधन वापरले गेले.


चीन इजिप्तचा इतिहास ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपेक्षाही पुरातन आहे. तत्कालीन पद्धतीनुसार सिलिंडरसह अन्य साधने आणि माध्यमातून, समाजाच्या प्रगतीची नोंद नेमाने तत्कालीन रिवाज आणि पद्धतीनुसार होत राहिली, जी आज अभ्यासासाठी उपलब्ध आहे. या नोंदींमध्ये समाज व्यवस्था, शेती व्यवस्था आणि पद्धती, हवामान, धर्म, देव-देवता, राज्य आणि राज्यकर्ते अशा अनेक गोष्टींची नोंद विस्ताराने घेतली गेली होती. मात्र, या सर्व नोंदी चिह्न स्वरूपात नोंदविल्या गेल्या, हीच प्राचीन इजिप्तची अनोखी चिह्नसंस्कृती असे निश्चितपणे म्हणता येईल. या काही सहस्र वर्षांच्या प्रगतीमध्ये प्राचीन इजिप्तमधील अभ्यासू आणि विद्वान नागरिकांनी आपल्या सभोवतालच्या निसर्गाचा काळजीपूर्वक, सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केला होता. या अभ्यासात अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, त्यांचा जीवनक्रम, त्यांचे निसर्गातील वसतिस्थान, त्यांचे रूप आणि मानवाबरोबरचा संपर्क अशा अनेक गोष्टींची सूक्ष्म नोंद केली गेली होती. तत्कालीन समाजाच्या संकल्पनेतील देव-देवता, त्यांची गुणवत्ता आणि माहात्म्य, त्यांची कृपादृष्टी आणि कृपाप्रसाद, आराधना आणि उपासना पद्धती या सर्व गोष्टींशी साधर्म्य असलेल्या, प्राणी-पक्ष्यांच्या अनेक नैसर्गिक प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये अशा अभ्यासात नोंदवली गेली होती. यातूनच प्राणी आणि पक्ष्यांचा संदर्भ चिह्न-प्रतीके-रुपके या स्वरूपात देव-देवता-ईश्वर-धर्म आणि विविध मानवी प्रवृत्ती यासाठी दिला गेला.

 

इथे दोन प्रकारच्या चिह्न-प्रतीकांचा भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. फक्त प्राणी व फक्त पक्षी यांची चिह्ने हा एक प्रकार. प्राणी आणि पक्ष्यांची तोंडे लावलेल्या मानवाकृती अशा चिह्नांचा असा दुसरा प्रकार. याचा संदर्भ आत्मिक व आध्यात्मिक जाणीवा आणि वास्तव परिस्थितीच्या प्रबोधनासाठी केला गेला. फक्त एका प्राण्याचे चिह्न वापरून व्यक्त अशा चिह्नातून, त्या चिह्नातील संकल्पित गुणवत्ता आणि मूल्ये वैश्विक दर्जाची आहेत, असा संकेत दिला गेला. प्राणी-पक्ष्यांची तोंडे लावलेल्या मानवाकृती चिह्न-प्रतीके-रुपके म्हणून वापरल्या गेल्या, त्यावेळी एखादा गुणविशेष आणि मूल्य प्रत्येक मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असल्याचे संकेत समाजाला दिले गेले. व्यक्ती आणि समाजाच्या भौतिक प्रगतीसाठी आवश्यक अनेक गुणविशेष आणि मूल्यांचा परिचय दृश्य स्वरूपात करून देणारी, ‘शब्दाविण संवाद’ अशा स्वरूपाची ही चिह्न-प्रतीके-रुपके त्यांच्या नियोजित मांडणीत, संकल्पना सार्थ करणारी आणि अपार यशस्वी झाली. प्राचीन इजिप्तमधील देवालये आणि पिरॅमिडच्या थडग्यांवर, चिह्नलिपीचा वापर करून अनेक घटनांची चिरकाल टिकणारी नोंद केली गेली. अशा नोंदींसाठी चिह्न निवडणारे अभ्यासू वैज्ञानिक आणि ती चिह्न लिपी लिहिणारे लेखनकार अशी मांडणी केली गेली होती. अशा नोंदींना Hieroglyph म्हणजेच ‘हायरोग्लिफ्स’ असे संबोधन वापरले गेले. पुरातत्व संशोधकांनी आजपर्यंत अशा सात हजार हायरोग्लिफ्सची नोंद इजिप्तमधे केली आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीतील महाराष्ट्रातील रांगोळी, गुजरात-राजस्थानमधील रंगावली, बंगालमधील अल्पना, तामिळनाडूमधील कोलम यांच्याशी नाते सांगणारी सचित्र लिपी. फरक इतकाच की, इजिप्शियन हायरोग्लिफ्स दगडावर, धातूवर कोरले गेले, कागदावर चित्रित केले गेले, तर भारतीय रांगोळी सारवलेल्या नेटक्या जमिनीवर, अगदी अंगणापासून थेट देवघरापर्यंत हाताच्या बोटांनी रांगोळीची पूड वापरून रेखाटली जाते. या दोन्ही सचित्र लिपी आहेत आणि आजही नियमित वापरल्या जातात. शतकानुशतके संस्कृती संवर्धन आणि दस्तावेजाची नोंद निर्माण करतात.

 

प्राचीन इजिप्शियन समाजातील तत्कालीन श्रद्धेनुसार ‘थोठ’ नावाचा देव, मानवी बुद्धी आणि चातुर्य या मूल्यांसाठी आराध्यदैवत म्हणून मान्यताप्राप्त होता. सूर्यदेवाचा दूत, प्रतिनिधी, निरोप्या असा हा ‘थोठ.’ ही ज्ञान आणि विज्ञानाची देवता, लिपी आणि लेखनकलेचा निर्माता, स्वामी, वैज्ञानिक लेखक आणि लेखनकारांचा तारक-पालक-आश्रयदाता असे माहात्म्य ‘थोठ’ला प्राप्त झाले होते. आयबीस पक्षाचे तोंड असलेली मानवाकृती अथवा ‘बबून’ या मर्कट कुळातील प्राण्याचे तोंड असलेली मानवाकृती आणि त्याच्या डोक्यावर पूर्णचंद्राची प्रतिमा अशी ही चिह्न-प्रतीके होती. मूळ इजिप्शियन राजे आणि नंतर इजिप्तवर ग्रीक राजवट आल्यानंतरच्या काळातसुद्धा प्रत्येक पिरॅमिड म्हणजे थडग्यामधे तारक-पालक-रक्षक देवता म्हणून ‘बबून’ या प्राण्याच्या मूर्ती ठेवल्या गेल्या होत्या. एकेकाळी इजिप्तचे मूळ रहिवासी असलेला हा प्राणी आणि हा पक्षी, आजच्या काळांत विलुप्त झालेले आहेत. साधारण आठ ते दहा वर्षांचा जीवनकाल असलेल्या बबून या प्राण्याची काही वैशिष्ट्ये आणि नैसर्गिक गुणवत्ता त्याला देवत्व प्रदान करताना लक्षात घेतल्या गेल्या असाव्यात, ते पाहणे फार रंजक आहे. इजिप्तच्या आधुनिक पुरातत्व संशोधनातील निष्कर्षांमध्ये या संदर्भात व्यक्त अभ्यासात वैविध्य आणि भिन्नता आहे. हा प्राणी बराचसा आक्रमक आणि हिंस्त्र आहे आणि तो फार माणसाळत नाही. याची लहान बालकेसुद्धा फार चपळ, धीट आणि अंगाने धिप्पाड असतात. (चित्र क्र. १) अशा नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे कदाचित त्याला रक्षणकर्ता मानले गेले असावे. इतर प्राण्यांच्या तुलनेत याची प्रजनन क्षमता जास्त आहे म्हणून कदाचित सर्जनशील आणि निर्मितीतील सातत्यामुळे याला वैज्ञानिक लेखक आणि लेखनकारांचा तारक-पालक-आश्रयदाता असे रूपक दिले गेले असावे. एखाद्या मूल्यासाठी प्रतीकाची-रुपकाची निवड करताना ते चिह्न स्वरूपात व्यक्त करताना उपमेय आणि उपमान यात एकरूपता असायलाच हवी, असा दंडक किंवा असे बंधन इथे नसते. साधर्म्य, विरोधाभास, अन्योक्ती, पर्यायोक्ती-अतिशयोक्ती, अनन्वय, भ्रान्तिमान, ससंदेह, दृष्टांत, अर्थान्तरन्यास, स्वभावोक्ती, अनुप्रास, श्लेष, असंगती, सार, व्याजोक्ती, व्याजस्तुती आणि चेतनागुणोक्ती अशा कुठल्याही अलंकरणाने याची तुलना मांडली जाते.

 

‘आयबीस’ पक्षाचे डोके धारण केलेली मानवाकृती हे ‘थोठ’चे अन्य रूपक किंवा प्रतीक आहे. देवालये, लेणी, गुंफा यावरील हायरोग्लिफ्स आणि पिरॅमिड म्हणजे थडग्यामधील ममी स्वरूपात या प्रतीकाचे अस्तित्व चिरंतन झाले आहे. बबून या प्राण्याप्रमाणेच सूर्यदेवाचा दूत, प्रतिनिधी, निरोप्या असा हा ‘थोठ’ आयबीसच्या रूपाने अवतरला होता. (चित्र क्र. २) हा पक्षीसुद्धा ज्ञान आणि विज्ञानाची देवता म्हणून मान्यताप्राप्त होता, समाजाची घडी बसत असताना आणि शेती व्यवस्थेची निर्मिती होत असताना, नाईल नदीचा पूर हा इजिप्तमध्ये एक मोठा निसर्गक्षोभ होता. नैसर्गिक क्षमतेमुळे पाणथळ जागी वास्तव्य असलेला आयबीस भविष्यात येणाऱ्या पुराचा योग्य अंदाज घेत असे. कारण, त्या पुरामुळे त्याला विपुल खाद्य उपलब्ध होत असे. भविष्यात नदीला येणाऱ्या पुराचा खबऱ्या म्हणून या पक्षाची गुणवत्ता ही चतुर इजिप्शियन विद्वानांनी ओळखली होती. या पुराबरोबर भरपूर मासे मिळत असले तरी, त्या पाण्यातील विषारी गोगलगायी मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना घातक होत्या. या विषारी गोगलगायी आयबीस पक्षाचे खाद्य होते आणि त्यामुळे मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना तो आसपास हवासा वाटत असे. या आयबीस पक्षाची बाकदार चोच श्रद्धाळू नागरिकांना चंद्राची कोर वाटत असे. अशा उपयुक्ततेमुळे या आयबीस पक्षाला देवतेचा दर्जा प्राप्त झाला होता. प्राचीन इजिप्तच्या उत्क्रांती काळातील व्यक्ती आणि समाजाची प्रगती, त्यांची अभ्यासू वृत्ती, बुद्धिमत्ता, चातुर्य, विश्लेषण क्षमता आणि रूपके-प्रतीके-चिह्ने यांचा व्यक्त रचनेत वापर करून, चिह्नसंस्कृतीची अगदी प्राथमिक बांधणी अशी विलक्षण आहे आणि त्या इतिहासाची नोंद वाचणे रोमांचक आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@