महाराष्ट्राचे आरोग्यदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग या दाम्पत्याला यावर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आणि पुन्हा एकदा या ‘महाराष्ट्राच्या आरोग्यदूतां’चे सामाजिक कार्य चर्चेच्या केंद्रस्थानी आले

जे का रंजले गांजले,

त्यासी म्हणे जो आपुलें,

तोचि साधु ओळखावा,

देव तेथेंची जाणावा।

संत तुकारामांनी या अभंगात खरं तर माणसाने कसं असावं, याचं वर्णन केलं आहे. पण, आजच्या कलियुगाला जेव्हा विनोदाने ‘घोर कलियुग’ असं जे आपण म्हणतो, ते मात्र आता सत्य वाटू लागले आहे. हल्ली माणुसकी, समाजकार्य यांच्या मागे माणसाचा आपलाच काहीतरी स्वार्थ दडला आहे की काय, असा प्रश्न सतावत असतो. अशात जेव्हा कोणीतरी दूत बनून लोकांसाठी काम करतं तेव्हा अशा मंडळींना तुकारामांनी सांगितलेली लोकं पूजनीय आणि वंदनीय असतात. असेच एक पूजनीय दाम्पत्य म्हणजे डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग. बंग दाम्पत्याला यावर्षीचा ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला आणि लोकांमध्ये त्यांच्या कामाच्या चर्चा रंगल्या. अभय बंग गांधीवादी आहेत, म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली. पण, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मुलांना जगवण्याचं काम करणार्‍या या डॉक्टर दाम्पत्याला लोकांच्या कौतुकापेक्षा गडचिरोलीतील मुलांच्या भविष्याची हमी हवी होती.

बंग दाम्पत्याच्या या सामाजिक प्रवासाची सुरुवात झाली ती, १९७८ मध्ये. वर्धा जिल्ह्यातील एक महिला तिच्या नवजात बालकाला न्युमोनिया झाल्यामुळे डॉ. राणी बंग यांच्याकडे घेऊन आली होती. परंतु, त्या नवजात बालकाचीं अवस्था फारच खराब होती. म्हणून डॉ. राणी बंग यांनी त्यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यावर “मी विधवा आहे आणि मजूरही. मला रुग्णालयाचा खर्च परवडणार नाही,” असं सांगून ती महिला निघून गेली. दोन दिवसांनी ती महिला परत बंग यांच्या चिकित्सालयात आली आणि राणी बंग यांच्या समोरच त्या नवजात बालकाने आपले प्राण सोडले. या घटनेने राणी बंग पुरत्या हादरून गेल्या. त्यांना कळलं की, केवळ लोकांची सेवा करणं एवढंच डॉक्टरचं काम नाही, तर लोकांच्या प्रती संवेदनशीलता असणं, त्यांच्या गरजा समजून घेणं हेसुद्धा डॉक्टरचं काम आहे. खरंतर बंग दाम्पत्य भारतात किंवा परदेशातही मोठ्या रुग्णालयामध्ये रुजू होऊन बक्कळ पैसे कमवू शकले असते. कारण, नागपूरच्या आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठाचे दोघंही टॉपर होते. एवढंच नाही, तर अभय बंग यांना तीन, तर राणी बंग यांना स्त्रीरोगशास्त्रात एक सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये जाऊन मोफत लोकांना आरोग्य सेवा दिली. या सहा वर्षांत त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली की, आपल्या देशात लोकांना खायला पैसे असणं, ही पहिला गरज आहे. त्यांच्यालेखी आजचा माणूस उद्या मेला तर त्यात काय? अशा परिस्थितीत लोकांना आरोग्याचं महत्त्व कसं समजवायचं, ही चिंता बंग दाम्पत्यापुढे होती. “एवढ्या वर्षात आम्हाला एका गोष्टीची जाणीव झाली की, इथे लोकांना प्राथमिक उपचारही माहीत नव्हते. त्यांना आरोग्याचं महत्त्व समजावणं गरजेच होतं. याचा पद्धतशीर अभ्यास करायचे आम्ही ठरविले,” असे बंग दाम्पत्य म्हणतात. याकरिता सार्वजनिक पातळीवरील आरोग्यसेवा कशी करावी, हे शिकण्यासाठी त्यांनी ‘फोर्ड फेलोशिप’ अंतर्गत 1983 साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एम.पीएचचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हाच मुद्दा गावातील लोकांना समजावण्यास आणि शिकविण्यास सुरुवात केली. आपल्या पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांना तिथे डॉ. डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन दिग्गज गुरू लाभले. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले तेव्हा परिस्थिती काही विशेष बदललेली नव्हती. हे पाहून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग गडचिरोलीतील स्त्रिया व वनवासींच्या निरोगी आरोग्यासाठी केला.

या दरम्यान, त्यांनी गावातील दारू व तंबाखूच्या व्यसनात वाया जाणारी तरुण मुलं पाहिली आणि त्यांना कोणत्या तरी कामात गुंतवण्यासाठी म्हणून ‘निर्माण’ नावाचा उपक्रम सुरू केला. राणी बंग यांनी १९७८ साली सुरुवातीला आलेल्या ‘त्या’ अनुभवाचा विचार करून ‘बालमृत्यू’ हा गडचिरोलीसारख्या गावातील गहन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी निर्माण केलेला ‘घरोघरी नवजात बालसेवा’ हा प्रकल्प जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात नऊ लाख आशांद्वारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरला जातो. त्यांच्या संपूर्ण प्रवासावर त्यांनी ‘कानोसा’ नावाचे पुस्तकही लिहिले. आजवर लाखो मुलांना चांगले आरोग्य देणार्‍या या दाम्पत्याचा गौरव केवळ भारतातच नाही, तर जगभरात झाला आहे. भारताने 2018 साली त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ दिला, त्याआधी २०१३ साली त्यांनी शिक्षण घेतलेल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ‘सोसायटी ऑफ स्कॉलर्स’ या सर्वोच्च पुरस्काराने, तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे देण्यात येणार्‍या पहिल्या ‘अॅलुम्नस’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. आजवरच्या त्यांच्या या प्रवासवर हे दाम्पत्य, “हा देश आपला, हे राज्य आपले, हा निसर्ग आपला आणि त्याला आपलं मानून काम केलं की, फळं ही आपल्याला मिळतातच,” असाचा मोलाचा सल्ला दिसतात.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@