संभवगाथा - सामान्य माणूस ते महामानवाचा प्रवास...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |

राज्यनाट्य स्पर्धा समीक्षण

 
 
 
गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेत परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचे अ‍ॅड. सुशील अत्रेलिखित बळवंत गायकवाड दिग्दर्शित संभवगाथा ही नाट्यकृती सादर झाली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात केव्हा काय होईल आणि त्याच्या जगण्याचे, मरणाचे, दैनंदिन जीवनाचे भांडवल करून राजकीय पुढारी सत्तेसाठी करीत असलेले कुटील कट कारस्थानाची संहिता असलेले संभवगाथा हे नाटक होते.
 
नाटकाची सुरुवात सूत्रधाराच्या नांदीने झाल्याने सभागृहात आवश्यक ते वातावरण निर्माण झाले. सूत्रधार आणि सामान्य माणूस यांच्या माध्यमातून कथानक पुढे सरकत जाते. हा माणूस सामान्य परिस्थितीतील असून तो आर्थिक विवंचनेत अडकला आहे.
 
तो आपल्या अवघ्या साडेदहा हजार रुपयांच्या पगारात रोजच्या दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण करीत जीवन रेटत असतो. मात्र, एका पुढार्‍याच्या गाडीखाली तो चिरडला जाऊन मृत होतो आणि त्याच्या या मरणाचे भांडवल ग्रामीण आणि शहरी पुढारी त्याच्या बायकोला पोकळ सांत्वन देऊन करतात.
 
तसेच तिच्यावर पोलीस यंत्रणा दबाव आणतेय म्हणून उपोषण करून आपापली पोळी भाजत असतात. शेवटी कूटनीतीने दोन्ही एकत्र येऊन त्याचा मरणोत्तर पुतळा बांधतात आणि सत्ता काबीज करतात. पुतळ्यानंतर ते त्यांनी दिलेले आश्वासने साफ विसरतात. ते कुटुंब पुन्हा आहे, त्याच दीन परिस्थितीत येते. अशी या नाटकाची थोडक्यात कथा.
 
संहितेत सामान्य माणसाच्या आयुष्यात बेरजेपेक्षा वजाबाक्याच कशा आणि किती येतात व तो तक्रारी किती आणि कोणाकडे करेल याविषयी माणूस, आत्मा, नवरा, बायको, यांच्या पात्रातून समोर येतात. सत्तेच्या खुर्चीला प्रसन्न करण्यासाठी वापरलेली सत्तासुंदरी देवीची आरती प्रेक्षकांना हसवून गेली. एकूणच आधुनिक भ्रष्ट राजकारण आणि भावनाशून्य पुढार्‍यांचे चित्रण नाटकात होते.
 
 
 

 
 
 
माणसाचा महामानव कसा होत जातो, हा प्रवास उलगडणार्‍या संहितेला गरज होती, ती आवश्यक त्या नेपथ्याची. हौशी कलाकारांची आर्थिक चणचण लक्षात घेता ठरावीक लेव्हलने नाटकाची गरज भागत असली तरी त्याला पूरक किमान घर, पोलीस चौकी यांच्या तरी संभाव्य चौकटी आवश्यक होत्या.
 
लेखराज जोशींनी तो विचार करायला हवा होता. सूत्रधार अमोल ठाकूर याचा कायिक, वाचिक अभिनय अप्रतिमच. उच्चारावरील त्यांचे प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते. नेहा पवार यांनी साकारलेली बायको, भेदरलेली, भांबावलेली विधवा, भावनाशील आई अप्रतिम आणि माणूस, आत्मा, नवरा या तिहेरी भूमिकेतील दीपक भट यांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला.
 
बळवंत गायकवाड यांनी वठवलेला ग्रामीण पुढारी पात्राला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केलेले प्रासंगिक विनोद हवा तो इम्पॅक्ट तयार करीत नव्हता. ते विनोद उगाच घुसवटल्यासारखे वाटत होते.
 
अ‍ॅड. पद्मनाभ देशपांडे यांचे पार्श्वसंगीत प्रसंगानुरूप ठीक. पण सादरीकरणात संवादादरम्यान असलेली भयाण म्युझिकविरहीत शांतता खटकत होती. आजच्या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य वाढलेली प्रेक्षक संख्या होती.
 
अ‍ॅड. सुशील अत्रेंची सुंदर संहिता आणि सर्व पारंगत गुणी कलाकार सोबत असताना नाटक दोन्ही सत्रात काहीसे रेंगाळले. नाटकाला आरती गोळीवाले यांची प्रकाशयोजना तर उदय पाठक यांची वेशभूषा आणि कविता गवळी यांची रंगभूषा काही प्रसंगात वेळेआधी होणारी प्रकाशयोजना आणि संगीत या सूक्ष्म त्रुटी.
 
हौशी कलाकारांसाठी असलेली ही स्पर्धा नवनवीन विषय घेऊन नवे कलाकार घडवत आहे. येथील नाट्यसंस्कृती वारसा जपतेय, हा फार मोठा दिलासा आहे.
 
आजच्या नाटकास अमळनेर येथील साने गुरुजी माध्यमिक शाळेचे 20, 25 शालेय विद्यार्थी नाटक कसे सादर होते, हे पाहण्यासाठी खास आले होते. यासाठी त्या शाळेचे आणि शिक्षकांचे करावे तितके कौतुक कमीच. नाटकास भावी निकालासाठी शुभेच्छा...
@@AUTHORINFO_V1@@