भारतीय प्रजेचे तंत्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
.
प्रसिद्ध गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘तत्त्वमसि’ ही कादंबरी, त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारी आहे. श्री. भट्ट यांचा संपूर्ण जीवन व लेखनप्रवास दोन प्रश्नांची उत्तरे शोधणारा आहे. ध्रुव भट्ट आपल्या मनोगतात म्हणतात- लहानपणापासून दोन प्रश्न मला नेहमी कोड्यात टाकत आले आहेत. एक म्हणजे, जी माणसं शाळेत किंवा गुरूकडे कधी गेलेलीच नाहीत, अशा माणसांकडूनच किंवा त्यांच्या प्रभावानंच, भारतीय ज्ञानाला आधाररूप म्हणता येईल, असं लेखन झालं आहे आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यातही सिंहाचा वाटा त्यांचाच आहे, असं मला का वाटतं?
दुसरं म्हणजे, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे रीतिरिवाज, वेगळे संप्रदाय आणि अशा अनेक भिन्नता असतानाही, या देशाच्या तर्हेतर्हेच्या रहिवाशांमध्ये असं काहीतरी आहे, जे प्रत्येक भारतीयामध्ये आहेच. ते काय आहे? कदाचित माझ्या लेखनाला ही जिज्ञासाच कारणीभूत झाली असेल!
 
 
 
श्री. ध्रुव भट्ट यांची ‘तत्त्वमसि’ ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. त्यात आपल्या मनातील अनेक प्रश्नांची, शंकांची उत्तरे मिळू शकतात. या कादंबरीत प्रोफेसर रुडॉल्फ नावाचे पात्र आहे. इंग्लंडमधील हे प्रोफेसर मानवी समूह, मानवी सभ्यता यांचे अभ्यासक आहेत. अभ्यासासाठी ते भारतात बरेचदा येऊन गेले असतात. भारतीय सभ्यतेचा अभ्यास करणार्यांना मार्गदर्शक ठरेल असा त्यांचा भारतातील एक अनुभव त्यांनी आपल्या शिष्यांना कथन केला. ते सांगतात- सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला आलो होतो. तिथल्या एका बँकेत मी गेलो आणि सही करून चेक दिला.
बँकेच्या कारकुनानं चेक मला परत देत म्हटलं, ‘‘बॉलपेननं केलेली सही चालत नाही. तुम्हाला शाईनं सही करावी लागेल.’’ ते ऐकून मला आनंद झाला. जगातील एकतरी प्रजा अशी आहे, की जे काही नवं येईल, ते डोळे मिटून स्वीकारत नाही. सुरवातीला विरोध करेल, मग पारखून बघेल, विचारपूर्वक समजून घेईल आणि मग स्वीकारण्यायोग्य वाटलं, तर आवडीनं स्वीकारेल. आज पुन्हा इथं आलो आहे, तेव्हा बघतो तर सगळे भारतीय बॉलपेन वापरायला लागले आहेत. पूर्ण विचारान्ती आता त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे. इथल्या प्रजेच्या या गुणानं मला नतमस्तक करून विचारात टाकलं आहे. अशा प्रजेचीच संस्कृती हजारो वर्षांची असू शकते. ती स्वत:ची परंपरा टिकवून धरू शकते. इथून पुढे मात्र संपूर्ण जगामध्ये खूप वेगानं परिवर्तन होत जाईल. संस्कृतीचा लोप होण्याची भीती फक्त येथेच उभी होईल असं नाही, सर्वत्रच तसं होणार आहे.
 
 
 
प्रोफेसर रुडॉल्फ यांचे भारतीय संस्कृतीविषयीचे हे विचार ऐकून अभिमान वाटला आणि दुसर्याच क्षणी शरमेने मान खाली गेली. त्यांच्या या निरीक्षणाला आजचे आम्ही, लायक आहोत काय, असा प्रश्न मनात उभा झाला. हळूहळू मनात घोळत असलेल्या बर्याच प्रश्नांची, शंकांची उत्तरे उघड होऊ लागली. काही परंपरांबाबतचे धुकेही निवळू लागले.
मला आठवला, भारतीय मजदूर संघाने संगणकीकरणाला केलेला विरोध. या विरोधाची उडविली गेलेली खिल्ली, करण्यात आलेली टवाळी, भामसंला मूर्खात काढणं... सर्व काही आठवलं. त्यानंतर काही वर्षांनी भामसंच्या कार्यालयाचेच संगणकीकरण झाल्याचे आढळून आले. आधी वाटायचं, असा कसा हा आंधळा विरोध?
टीव्हीलाही असाच विरोध झाला होता. विशेषत: वेगवेगळ्या आणि असंख्य चॅनेल्सला झालेला विरोध, भारतीय संस्कृतीला धोका म्हणून होत होता. हळूहळू तो विरोध पातळ होत गेला आणि आता तसा कुठलाच विरोध राहिला नाही.
 
पाश्चात्त्यांचे अनुकरण आम्हाला नवीन नाही. हे अनुकरण आजही आमच्या समाजात प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे मानले जाते. पूर्वी पश्चिमेकडचे वारे प्रथम महानगरात येत. तिथून ते उपमहानगरात जात. नंतर जिल्हास्थानी आणि नंतर संपूर्ण समाजाला व्यापत. या संपूर्ण प्रवासाला जो काळ लागत असे, त्या काळात पाश्चात्त्य आचार-विचारांना नीट पारखण्याची, योग्यायोग्य ओळखण्याची आणि त्यानंतरच ते स्वीकारायचे की नाही, हे ठरविण्यासाठी पुरेशी संधी मिळत असे. या प्रदीर्घ काळात, त्या आचारविचारांचे पुरेसे भारतीयीकरणही झालेले असायचे.
 
 
आज मात्र तसे नाही. तिकडील आचारविचारांचे वारे आमच्या घरात टीव्हीच्या माध्यमातून थेट शिरतात. ज्या क्षणी ते मुंबईसारख्या महानगरात शिरतात, त्या क्षणी ते भारतातल्या कुठल्याही खेड्यात शिरलेले असतात. यामुळे भारतीय समाजात भांबावलेपण आले आहे. तो समाज ‘नीरक्षीरविवेक’ गमवून बसला आहे, असे मला वाटते. जागतिकीकरणाच्या वेळीही असेच झाले. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) अटी स्वीकारण्याची काहींना खूपच घाई झाली होती. ती व्यवस्था भारतीय मातीत मुरू देण्याचीही सवड द्यायला कुणी तयार नव्हते. आज 25 वर्षांनंतर डब्ल्यूटीओ कुठे आहे, ते भिंग घेऊन शोधावे लागेल.
 
 
आमच्या परंपरांवरचे, रीतिरिवाजावरचे आघात आम्ही निमूटपणे बघत बसतो. लोक काय म्हणतील, म्हणून ते स्वीकारतो. याने आमची हास्यास्पद स्थिती होत आहे, याचेही भान आम्हाला उरत नाही. आमच्या येथील वैचारिक क्षेत्राचा ताबा कम्युनिस्ट विचारांनी घेतल्यापासून तर हा प्रकार अति झाला आहे. आजही आम्ही वाहवतच जात आहोत. शाईच्या पेनवरून बॉलपेनवर यायला दहा वर्षे लागली असतील, तर दुसर्या महत्त्वाच्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आम्ही किती वेळ घ्यायला हवा?
 
भारतातील सर्वाधिक सुशिक्षित आणि कम्युनिस्ट व कॉंग्रेस यांचेच आलटूनपालटून सरकार असलेल्या केरळ राज्यात शबरीमलै मंदिरप्रवेश प्रकरणी एवढा जनक्षोभ उसळेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. सुमारे 800 वर्षांपासूनची एक प्राचीन परंपरा टिकवून ठेवण्यासाठी केरळच्या लोकांमध्ये ही जिद्द आणि तळमळ कुणी भरली असावी? कम्युनिस्ट व कॉंग्रेसच्या निधर्मी राजवटीनंतरही, तसेच इतिहास व पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय परंपरांची यथेच्छ निंदानालस्ती केली असतानाही, या लोकांच्या मनातील, आपल्या संस्कृतीशी, परंपरांशी जुळून राहण्याचा चिवटपणा, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला लावणारा आहे.
 
 
 
आम्ही पंढरपूरला जाणार्या वारीत, गैरसोय होईल म्हणून जाण्याचे टाळतो. घरी धड खायला मिळत नाही म्हणून लोक वारीत जातात, असे म्हणून त्यांची टर उडवितो. गर्दीमुळे कुंभमेळ्यात जात नाही. विशिष्ट पर्वाच्या दिवशी नदीस्नान करत नाही. परराज्यातील लोक इथे येऊन निष्ठेने छटपूजा करतात, तर त्याला नाके मुरडतो. पर्यावरणाचा र्हास होईल म्हणून टाहो फोडतो. दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाने आजकाल आमच्या कानांना त्रास होतो. चैत्रगौरीचं हळदीकुंकू, संक्रांतीचं वाण विसरून गेलो आहोत. त्याऐवजी भिशी, किटी पार्टी, मुला-मुलींचे वाढदिवस, त्या मेणबत्त्या विझवणं, ख्रिसमस, न्यू इअर सेलिब्रेशन... गंमतच आहे. शेकडो वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतातील हजारो मजूर, जहाजात जनावरे कोंबावी तशी इतर देशात शेती करण्यासाठी नेलीत. अत्यंत हलाखीच्या स्थितीतील या मजुरांनी सोबत रामचरितमानसची प्रत नेली होती. केवळ त्या रामचरितमानसाच्या आधारे त्यांनी अपरिचित देशात, अनन्वित छळांत आपली संस्कृती कायम ठेवली. भारताशी असलेली नाळ तुटू दिली नाही.
ध्रुव भट्ट म्हणतात- या देशातल्या प्रत्येकाला जीवनाबद्दलची एक आगळीच दृष्टी जन्मत:च वारशात मिळते. रामायण-महाभारतासारख्या कथा न वाचताही त्याबद्दल सगळी माहिती या मातीत जन्मून मोठ्या होणार्या माणसाला असते. कुठलीही भाषा बोलणारा, कोणत्याही वयाचा, कुठल्याही जातीचा किंवा प्रदेशातला असो, प्रत्येक भारतवासीयाला ही कथा ज्याच्या त्याच्या परीनं कमी जास्त प्रमाणात, पण माहीत असते. या कथेतील पात्रांच्या वेदना, हर्ष, विषाद, उल्हास यांचा तो मनोमन अनुभव घेत असतो. कारण?... कारण या फक्त कथा नाहीत, जीवन आणि जीवनाच्या परंपरा आहेत.
खरेच आम्ही असे आहोत, की प्रो. रुडॉल्फ आणि ध्रुव भट्ट यांना खोटे पाडण्याचा आम्ही वसा घेतला आहे?
@@AUTHORINFO_V1@@