कोळसा घोटाळा : एच. सी. गुप्तांसह पाच दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह पाच जणांना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. पश्चिम बंगालमधील कोळसा खाणी वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

 

सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी गुप्ता यांच्या व्यतिरिक्त विकास मेटल्स अॅण्ड पॉवर्स लिमिटेड (व्हीएमपीएल), कोळसा मंत्रालयाचे माजी सहसचिव के. एस. कोरफा, कोळसा मंत्रालयातील सीए-१ विभागाचे तत्कालीन संचालक व अद्याप शासकीय सेवेत असलेले के. सी. सामरिया यांनाही दोषी धरले आहे. न्यायालयाने विकास मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास पाटनी आणि त्यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता आनंद मलिक यांनाही दोषी ठरवले आहे.

 

पश्चिम बंगालमधील मोइरा आणि मधुजोरे येथील खाणवापटपात भ्रष्टाचार करून त्या व्हीएमपीएल कंपनीला आवंटित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने सप्टेंबर २०१२ मध्ये एफआयआर दाखल केली होती. सीबीआयच्या न्यायालयाने निकाल जाहीर करताच पाचही दोषींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या शिक्षेवर ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दोषींना कमाल सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १९ ऑगस्ट २०१६ रोजी गुप्ता यांच्यासह पाचही आरोपींच्या विरोधात फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्याचा आरोप निश्चित केला होता. निकाल जाहीर होईपर्यंत सर्वच दोषी जामिनावर होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@