वाहतूक कोंडीमुळे मुलांचे जीवित धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |
पोलिसांना ‘मामा’ बनवण्याचे प्रकार वाढले, अधीक्षकांनी लक्ष घालावे

 
 
 
जळगाव : 
 
शहरातील ला.ना. शाळा आणि आर.आर.महाविद्यालय रस्त्यावर नो-पार्किंग असूनही या रस्त्याने सर्रास चारचाकी आणि दुचाकीचालक आपली वाहने चालवत असतात.
 
हा शाळेचा परिसत असल्याने याठिकाणी वाहतूक पोलीस असणे आवश्यक असतानाही याठिकाणी कोणीही पोलीस नाही. शाळेतील मुले शाळा भरताना आणि सुटताना या परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी करत असतात. त्यामुळे येथे रोज काही वेळ वाहतुकीची कोंडी होत असते.
 
काही कालीपिलीचालक, सायकलस्वार विद्यार्थी, दुचाकीधारक नागरिक, रिक्षाधारक आणि चारचाकीचालकांमुळे याठिकाणी सायंकाळी आणि सकाळी भयंकर त्रेधा उडत असते.
 
मात्र, तरीही याठिकाणी कोणीही वाहतूक पोलीस नसल्याने किरकोळ वाद नित्याचेच झाले आहे. दरम्यान, याठिकाणी काही दुर्घटना घडण्यासाठी तर वाहतूक पोलीस वाट पाहत नाही ना? असाही सवाल आता पालकांकडून उपस्थित होताना दिसत आहे.
यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी काही पालकांनी ‘तरुण भारत’कडे केली आहे.
 
 
शहरात वाहतुकीची समस्या नागरिकांच्या बोकांडी बसलेली असतानाही पोलीस मात्र आपल्या तंत्रित असल्याचे दिसून येत आहे. आधीच रस्त्यांची दैना झालेली असताना वाढत्या वाहतुकीचं भूत आता जळगाववासीयांच्या मानगुटीवर बसलंय.
 
 
यासाठी कुठलीही उपाययोजना वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याने आता खरंच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काही नागरिक सिग्नल तोडून पोलिसांना ‘मामा’ बनवत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
 
कुठल्यातरी कानाकोपर्‍यात वाहतूक पोलीस उभे राहून आपली सेवा बजावत असल्याचे आज निदर्शनास आले. पण कानाकोपर्‍यात काय आहे? यात काही चिरिमिरीचा प्रकार तर लपलेला नाही ना तसेच सिग्नल तोडून काही वाहनचालक आपली वाहने पळवत असताना वाहतूक पोलिसांचे कोपर्‍यात काय काम आणि सिग्नल तोडणार्‍यांवर कोणी का कारवाई करत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
एकंदरीत जळगाव पोलिसांनी ज्याप्रमाणे अवैध धंदे करणार्‍यांवर वचक बसवला आहे तसाच वाहतुकीचा प्रश्नही सोडवावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, शालेय परिसरातील रस्त्यावर चारचाकींनाही प्रवेश नाकारला तरी यातील बरीच वाहतूक कमी होऊन चिमुरड्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल.
 

अधीक्षक साहेब, आता तरी लक्ष द्या !
 
ला.ना. शाळा परिसरात ‘तरुण भारत’ने सर्वेक्षण केले असता पालकांनी अधीक्षक दत्ता शिंदे साहेब आता तरी लक्ष द्या. आमच्या मुलांचे जीवन अनमोल आहे, त्या चिमुरड्यांवर का अन्याय करताय अशी विनवणी केली आहे.
 
 
शाळा परिसरात वाहतुकीने थैमान घातले आहे, याठिकाणी नो-पार्किंगचा बोर्ड केवळ नावालाच आहे. याठिकाणी कोणीही पोलीस नसतो. आता तरी अधीक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
 
 
रोडरोमिओंचा वाढलाय वावर
 
शाळा परिसरात कुणाचाही वचक नसल्याने या परिसरात रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. एका गाडीवर तीन रोमिओ बसून धूमस्टाईलने ते आपली वाहने चालवतात. दरम्यान, यावेळी मुलींकडे बघून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करतात.
 
 
यामुळे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागण्याच्या आत वाहतूक पोलिसांनी किमान प्रामाणिकपणे याठिकाणी शाळा सुटणे आणि भरणे यावेळेत थांबणे गरजेचे बनेल आहे, असे मत काही मुलींनी निर्भीडपणे ‘तरुण भारत’कडे व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@