अखेर अमेरिकेकडुन भारतासह आठ देशांना इराणचे तेल घेण्याची सवलत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : इराणविरोधात ५ नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांनंतरही भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची जागतिक बाजारपेठेत कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत. इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.

 

इराणकडून तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकतील. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे. भारतासह जपान व दक्षिण कोरिया आदी देशांचा यातून समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. चीनला तेल आयातीची सवलत मिळाली असली तरी अटींच्या मुद्यावर दोन्ही देशांत अजून चर्चा सुरू आहे. इतर चार देश कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ही सवलत तात्पुरती असणार आहे.

 

भारताकडून इराणी तेल आयातीत ३०% कपात

 

दरम्यान, भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३० टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली. त्याच आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे. रिलायन्ससारख्या काही कंपन्यांनी इराणचे तेल खरेदी करणे आधीच थांबविले आहे. एस्सार-नायरा ही खासगी कंपनी मात्र स्पॉट मार्केटमधून अजून इराणी तेल उचलत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@