जिल्हाधिकार्‍यांनी हौशी रंगकर्मींच्या भावना समजाव्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - नाटक क्षेत्रात दोन प्रकार असतात एक व्यावसायिक तर दुसरे हौशी. मात्र, सध्या जिल्हाधिकार्‍यांनी जे दर संभाजीराजे नाट्यगृहाला लावले आहेत, ते व्यावसायिकचे असल्याचा सूर स्थानिक रंगकर्मींमधून निघताना दिसून येत आहे.
 
 
जळगावात 58 व्या राज्य नाट्य मराठी हौशी स्पर्धेसाठी जिल्हाधिकार्‍यांनी शुल्काबाबत आपली भूमिका मवाळ केल्यास स्थानिक रंगकर्मींनाही संभाजीराजे नाट्यगृहात आपली कला सादर करता येऊन जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवता येईल, असे मत व्यक्त होत आहे.
 
 
जळगाव शहराचे सांस्कृतिक वैभव जतन करण्यासाठी संभाजीराजे नाट्यगृहाचे निर्माण करण्यात आले आहे. मात्र, याच ठिकाणी केवळ शुल्काबाबत जर हौशी रंगकर्मी मागे राहत असतील, तर यात जळगाव शहराचेच आतोनात नुकसान आहे, असा सूर सध्या स्थानिक रंगकर्मींमधून निघताना दिसत आहे.
 
 
राज्य शासनाच्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 25 हजार डिपॉझिट, 30 हजार भाडे आणि 30 रुपये प्रतियुनिटप्रमाणे जर वीजदर आकारणी होत असेल तर कोणीही या नाट्यगृहात नाटक किंवा इतर कार्यक्रम करताना विचार करेल. जिल्हाधिकार्‍यांनी हौशी आणि व्यावसायिक हे दोन गट समजावून घेऊन मवाळ धोरण अवलंबवून जर याकडे पाहिले, तर नक्की यावर तोडगा निघेल, यात शंका नाही.
 
 
जळगाव शहराला खूप मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, यात भर टाकण्यासाठी स्थानिक रंगमकर्मीही काही कमी नाही. परंतु, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकार्‍यांच्या झगड्यात मात्र स्थानिक हौशी रंगकर्मींची कुचंबणा होत असल्याने यावर उपाययोजना करायला अथवा मधला मार्ग काढण्याला काय हरकत आहे? असा सवालही यावेळी उपस्थित होताना दिसून येत आहे.
 
 
दरम्यान कुठल्याच ठिकाणी हौशी कलाकारांसाठी एवढी भाडे आकारणी होत नसल्याचेही ‘तरुण भारत’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे. तरी ही शुल्क आकारणी कमी होऊन स्थानिक रंगकर्मींनाही संभाजी राजे नाट्यगृहात आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, असा सूर आता निघत आहे.
 
 
चर्चेतूनच मार्ग निघेल
अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा जळगाव यांनी जिल्हाधिकार्‍यांना हौशी नाट्य स्पर्धा ही संभाजीराजे नाट्यगृहात व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, तरी स्थानिक संस्थांनी पुन्हा एकदा आपले गार्‍हाणे जर जिल्हाधिकार्‍यांकडे मांडले, तर यावर नक्कीच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
 
 
यावर जळगावातील सर्व संस्थांनी आपल्या नाट्य सादरीकरणासाठी संभाजीराजे नाट्यगृह मिळण्यासाठीचे मागणी पत्र जर जिल्हाधिकार्‍यांना दिले तर यावर ते नक्कीच आशावादी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
 
 
समन्वयकपदावरून चढाओढ
तत्कालीन समन्वयकांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या कारणावरून सध्या सोशल मीडियावर समन्वयकपदासाठी चढाओढ सुरू झाल्याचे समोर आले आहे. यावेळी ‘मी’ हे काम उत्तम करू शकतो, यावर सध्या खल चालू असल्याचे समजले.
यावेळी काही नावेही चर्चेत असल्याने नेमकं कोण ही जबाबदारी स्वीकारेल व सांस्कृतिक कार्य संचालनालय कोण्याच्या गळ्यात समन्वयकपदाची माळ घालेल, हा तर येणारा काळच सांगेल.
 
 
नाकापेक्षा मोती जड
नाट्यगृहात प्रवेश केल्याबरोबर आपण नक्कीच नाट्य परिसरात आल्याचा भास होत असला तरी शुल्कामुळे याठिकाणी नाटक होईल की नाही, यात शंका आहे.
दरम्यान, या नाट्यगृहात तालीम हॉल हा 100 रुपये प्रतितासाने दिला जात असला तरी 30 रुपये प्रतियुनिटप्रमाणे तासाचे 25 युनिट जरी झाले तरी या एक तासाच्या तालीम हॉलचे 750 रुपये होतात. असे एकूण 850 रुपये प्रतितास भरावे लागत असल्याने हा नाकापेक्षा मोती जडच म्हणावा लागेल.
 
 
मी नक्कीच प्रयत्न करणार
मला याबद्दल काहीच ठावूक नाही. याबद्दल अधिक माहिती घेऊन मी नक्कीच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. स्थानिक रंगकर्मींना दिलासा देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार.
स्वाती काळे,
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
 
संभाजीराजे नाट्यगृह भाडे
अ‍ॅडव्हान्स - 25,000
भाडे - 30,000
वीजदर (प्रतियुनिट) - 30 रु.
साहित्य संघ नाट्यमंदिर, मुंबई
अ‍ॅडव्हान्स - नाही
भाडे - 13,000
वीजदर (प्रतियुनिट) - भाड्यात समावेश
 
रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई
अ‍ॅडव्हान्स - 8,500
भाडे - 8,500
वीजदर (प्रतियुनिट) - भाड्यात समावेश
 
बालगंधर्व नाट्यगृह, पुणे
अ‍ॅडव्हान्स - 10,000
भाडे - 10,000
वीजदर (प्रतियुनिट) - भाड्यात समावेश
 
प.सा. नाट्यमंदिर, नाशिक
अ‍ॅडव्हान्स - 4,500
भाडे - 5000
वीजदर (प्रतियुनिट) - भाड्यात समावेश
 
काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिर, मुंबई
अ‍ॅडव्हान्स - नाही
भाडे - 20,000
वीजदर (100 रू.) - प्रति स्पॉट
@@AUTHORINFO_V1@@