‘हौसलोंसे उडान होती है !’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018   
Total Views |


 


पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करून पर्यावरणाला वाचविण्याच्या मोहिमेत मग्न झालेल्या अनामिका सेनगुप्ताची कहाणीदेखील काहीशी अशीच संघर्षमय आहे. 

 

छोट्या-छोट्या गाव-खेड्यांत-शहरांत वाढलेल्या लोकांची जीवनकथा अनेकदा रंजक असते. अर्थात याला अनेक घटक कारणीभूत असतात. मोठ्या शहरांतल्या लोकांपेक्षा अशा लोकांना अधिक संघर्ष करावा लागतो, जो पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींपासून शाळा, दवाखाने आदी कशाचाही असू शकतो अन् जर गोष्ट स्त्रियांशी संबंधित असेल तर हा जगण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा करण्याचा संघर्ष कित्येक पटींनी वाढतो. पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करून पर्यावरणाला वाचविण्याच्या मोहिमेत मग्न झालेल्या अनामिका सेनगुप्ता हिची कहाणीदेखील काहीशी अशीच संघर्षमय आहे. अफाट पसरलेल्या मुंबईपलीकडील डोंबिवलीत राहिलेल्या-वाढलेल्या अनामिकाला आयुष्याच्या यशोशिखरावर पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण, तिने संघर्ष केला आणि जगाला मान्य करावे लागले की, ‘हौसलों से उडान होती है!’

 

डोंबिवलीत छोट्याशा चाळीतल्या एक खोलीत अनामिकाचे बालपण आणि तरुणपणही गेले. आईने नेहमीच तिच्या शिक्षणावर लक्ष दिले. अनामिका आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आईने प्रचंड मेहनत केली, कष्ट उपसले. मायानगरी मुंबईच्या पसाऱ्यात लाखो लोकांकडे रोजचा खर्च भागविण्यासाठीही पुरेसे पैसे नसतात, तीच गत अनामिकाच्या कुटुंबाचीही होती. शालेय पुस्तके विकत घेण्याइतकीही ऐपत नसलेल्या अनामिकाच्या आईने मग रद्दीवाल्याकडून पुस्तके आणली व दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी तीच पुस्तके उपयोगी पडली. याचा सदुपयोग करत अनामिकाने स्वतःचे शिक्षण आणि अभ्यास तर केलाच, पण आठवीत गेल्यानंतर एक वाचनालयही सुरू केले. याच वाचनालयातून तिने अन्य मुलांना भाड्याने पुस्तके दिली व त्यांचा वापर स्वतःच्या शिक्षणासाठी, खर्चासाठी केला. संघर्षमय परिस्थितीत कसेबसे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनामिकाने एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीही मिळवली. मात्र, वयाच्या २५ व्या वर्षी तिला एका अशा नात्यातून बाहेर पडावे लागले, जिथे तिला रोजच अपमानाचे घोट सहन करावे लागत असत. आयुष्याच्या या वळणावरही अनामिकाच्या आईने तिला धीर दिला, मदत केली. आतापर्यंत तिच्या आईने तिचे आयुष्य उत्तम, उत्कृष्ट व्हावे म्हणून कठोर संघर्ष केला होता, पण या नात्यामुळे अनामिकाचे आयुष्यच उद्ध्वस्त होत होते. अखेर तिने ठरवले की, नात्यातून बाहेर पडायचे आणि ती बाहेर पडलीही.

 

दिवस, महिने, वर्ष जात होते आणि वयाच्या तिसाव्या वर्षात पाऊल ठेवल्यानंतर अनामिकाकडे एचआर अधिकारी म्हणून काम करण्याचा आठ वर्षांचा अनुभव जमा झाला. परिणामी, तिला आपल्या अनुभवाची बक्षिसी मिळाली आणि अनामिकाची नियुक्ती ‘ग्लोबल रिक्रूटमेंट हेड’ या पदावर करण्यात आली. याचवेळी ती प्रेमात पडली व विवाहाच्या बंधनातही अडकली. विवाहानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आणि झाले, अनामिकाच्या आयुष्यातला संघर्षाचा, संकटांचा काळ पुन्हा एकदा सुरू झाला. तुम्ही म्हणाल की, मुलाला जन्म दिल्याने संघर्ष किंवा संकट कसे कोसळू शकते? पण वास्तव हेच होते. मुलाला जन्म दिल्यानंतर कंपनीने तिला नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला. कंपनीचे म्हणणे होते की, आई झाल्याने अनामिका आपल्या कामावर, करियरवर पुरेसे लक्ष देऊ शकणार नाही. नाईलाजास्तव मुलाच्या जन्मानंतर ती नोकरी गमावून बसली. खरेतर कोणतीही स्त्री मुलाला जन्म दिल्यानंतर आनंदित होते, पण मुलाच्या जन्मामुळे कंपनीने नोकरीवरून काढून टाकल्याने अनामिका व्यथित झाली, दुःखी झाली. नोकरी सोडून अनामिका मुलाकडे लक्ष देऊ लागली. पण, याचदरम्यान तिला एक कल्पना सुचली. तिने पाहिले की, मुलाचे कपडे बदलण्यासाठी जे दुपटे वापरले जाते, ते अमेरिकेतून आयात होते. तिला वाटले की, आपला देश इतका समृद्ध आहे, तरीही एवढी छोटीशी गोष्ट आपल्याला अमेरिकेतून आयात करावी लागते. नंतर तिने स्थानिक हस्तकला कारागीरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून शिशुंसाठीची दुपटे तयार करायला सुरुवात केली. दोन महिने हे काम चालले आणि वाट पाहिल्यानंतर अनामिकाला युरोपमधून ऑर्डर मिळाली. आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तिने एक फेसबुक पेजदेखील तयार केले आणि कंपनीचे नाव ठेवले ‘अलमित्रा सस्टेनेबल.’

 

मुलाला जन्म दिल्याच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकलेल्या कंपनीच्या नाकावर टिच्चून तिने स्वतःचीच कंपनी सुरू केली. आज तिचा मुलगा चार वर्षांचा आहे आणि ती, कंपनी म्हणजे करिअर व मुलाकडेही व्यवस्थित लक्ष देत आहे. आपल्या मुलाच्या जन्माच्या बरोबरीने तिने आपल्या कंपनीलादेखील जन्म दिला होता. आज दोन्ही वेगाने पुढे वाटचाल करत प्रगती करत आहेत. आज अनामिकाची कंपनी बांबूपासून तयार केलेले टूथब्रश, स्ट्रॉ, कापडी पिशव्या, घोसाळ्यापासून स्पंज, नारळाच्या शेंडीपासून ब्रश-घासणी आणि अन्य वस्तूंची निर्मिती करते. ही सर्वच उत्पादने पर्यावरणपूरक आहेत आणि त्याचा निसर्गावर काहीही विपरित परिणाम होत नाही. अनामिकाची ही वास्तव कथा नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरेल, असे वाटते. तसेच अनामिकाला तिच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@