झोपडपट्टीधारकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

नगरपालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष रमण भोळे यांची ग्वाही

 
भुसावळ :
रेल्वे प्रशासनाने गत काही दिवसांपूर्वी चांदमारी चाळ, आगवाली चाळ, १५ बंगला यासह विविध भागांचे अतिक्रमण काढले. परंतु, झोपडपट्टीधारकांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, यासाठी शासनाने आवश्यक निधीची तरतूद करणेकामी व पाठपुरावा करण्याबाबत विचारविनिमय करण्यात यावा. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने २८ रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्याचे ठरविण्यात आल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.
 
 
नगरपरिषदेच्या सभागृहात २८ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष रमण भोळे हे होते तर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेते हाजी मुन्ना तेली, उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, शिक्षण सभापती ऍड. बोधराज चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस माजी नगरसेवक दर्डा यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेत चार विषयांवर चर्चा करण्यात आली. अतिक्रमणग्रस्तांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत शासनाकडे माहिती देणे, सदरचे प्रश्नी योग्य ते मार्गदर्शन शासनाकडून घेणे, अतिक्रमणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक जागेची शासनाकडे मागणी करणे, त्याबाबत पाठपुरावा करणे, आवश्यक त्या निधीची शासनाकडे मागणी करणे यासह प्रधानमंत्री जनविकास योजनेंतर्गत अल्पसंख्याक समुदायाकरिता अनुज्ञेय असलेल्या कामांचे खर्चअंदाज तयार करणे व तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे याविषयांवर चर्चा करण्यात आली.
 
 
जनाधार विकास पार्टीचे नगराध्यक्षांना निवेदन
सभा सुरु असताना जनाधार विकास पार्टीच्या वतीने शेख जाकीर शेख सरदार, हाजी सलीम पिंजारी, साधना भालेराव यांच्याकडून नगराध्यक्षांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी साधना भालेराव यांनी आक्रमक होत सभागृहात हा विषय मागेच मांडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले गेले नाही, असा आरोप केला.
 
 
झोपडपट्टीवासीयांच्या समस्या
सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : भोळे
रेल्वे प्रशासनाने आगामी काळात येऊ घातलेल्या नवीन प्रोजेक्टसाठी अतिक्रमण काढले. मात्र, पर्यायी जागेचा विचार केला नाही. न. पा. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी बैठकीस सर्व उपस्थित नगरसेवकांना सांगितले. झोपडपट्टीधारकांच्या विषयावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा. सुनील नेवे, नगरसेवक रवींद्र खरात, गटनेते हाजी मुन्ना तेली, नगरसेवक पिंटू कोठारी यांनी चर्चेत सहभाग घेत काही प्रस्ताव सुचविले व त्यावर उपाययोजना करण्याचे नगराध्यक्षांना सुचविले. यावेळी नगरसेविका अरुणा सुरवाडे यांनीही या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्षांना लेखी निवेदन दिले.
@@AUTHORINFO_V1@@