रॅडक्लिफ... प्रभावी कलाकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |
 
 
जळगाव :
५८वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांचे हेमंत पाटील लिखित, दिग्दर्शित रॅडक्लिफ लाईन हे भारताच्या फाळणी वेळी घडलेल्या घडामोडीवर आधारित नाटक सादर झाले. नाटक राष्ट्रभक्तीवर आधारित असल्याने नाटकाची सुरुवात राष्ट्रगीताने करून मूळजी जेठाने आपल्या नावाप्रमाणेच नाटकाची सुरुवात दमदार केली. देश इंग्रजांपासून स्वतंत्र करीत असताना या भारतातील प्रत्येक मनुष्य देशप्रेमाने, मनाने एकमेकांशी जोडला गेला होता. त्याला फक्त अखंडित देश हवा होता. मात्र, भारताच्या फाळणीनंतर धर्माधर्मात, माणसांत गैरसमज पेरला गेला. माणूस माणसापासून दूर गेला आणि देशात कायमची अशांतता निर्माण झाली. अशांतता आपण त्यावेळी भारतात आलेल्या रॅडक्लिफ ब्रिटिश अधिकार्‍यांमुळे निर्माण झाली, असे मानत आलो आहोत. मात्र, रॅडने भारताचा भौगोलिक नकाशा पाहून फाळणीचे चित्र उभे केले होते. येथील जातीयता पाहून नव्हे तर येथील धर्माचे, जातीयतेचे भांडवल येथीलच त्यावेळेच्या राजकीय पुढार्‍यांनी सत्तेचे डावपेच करून आपसातच सीमा रेषा आखून दिली. जिला रॅडक्लिफ लाईन अस मानलं जात. रॅडक्लिफ या ब्रिटिश अधिकार्‍याचा मूळ हेतू आणि आपल्याच सत्तेत असलेली किल्मिशे यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने लेखक हेमंत पाटील यांची नाटकाची संहिता होती. तिला प्रसंगानुरूप घडवण्यात वापरण्यात आलेला शाब्दिकसाठा अतिशय सुंदररीतीने मांडण्यात आणि ते नाटक रंगमंचावर उत्कृष्टरीतीने सादर करण्यात दिग्दर्शक या दोन्ही भूमिका हेमंत पाटील यांनी लीलया पेलल्या. मुजफ्फर आणि साहिल या नवतरुणाच्या प्रवेशाने नाटकाची सुरुवात होते. ज्यांना द जिहादच्या कामात सामील करून घेण्यासाठी देशाचे, धर्माचे नाव सांगून महाविद्यालयात पटवून सांगितले जात असते.ही मुले परिस्थितीने गरीब असल्याने पोटासाठी दगडफेक करणे, रक्तबंबाळ करणे अशी कामे करतात. मात्र, त्यांचा संपर्क जेव्हा म्हातारा अर्थात चौकीदाराशी येतो तेव्हा त्याच्यामार्फत त्यांना या देशाची फाळणी कशी झाली आणि कोणी कोणते राजकारण वापरले, याचा उलगडा होतो. म्हातारा त्यांना १ पाकिस्तानी आणि १ हिंदुस्थानी सैनिकांत घडलेला प्रसंग सांगतो. ज्यात हे दोन्ही सैनिकीही फाळणीपूर्वी देशावर आतोनात प्रेम करणारे असतात. फाळणीनंतर मात्र फक्त आपला धर्म कसा श्रेष्ठ आणि एकमेकांनी एकमेकांचे कसे हाल केले, अत्याचार केले याविषयीच गैरसमज सोबत घेऊन सैनिक म्हणून जगत असतात. पाकिस्तानी सैनिक जो हिंदुस्थानी सैनिकाकडे लाल किल्ला ते लाहोर यांच्यात खोदला जाणारा सुरुंग घेण्यासाठी आला असतो मात्र दोघांच्या चकमकीत पाकिस्तानी सैनिक हिंदुस्थानी सैनिकाला जेरीस आणून आपल्यासोबत घेऊन जाण्यात यश मिळवतो. मात्र, त्यांच्या मागावर गुप्तपणे हिंदुस्थानी वरिष्ठ सैनिक ताराचंद (अजय शिंदे) येत असतो आणि दोघांना पकडतो. पाकिस्तानी सैनिकाला मारून आणि हिंदुस्थानी सैनिकाला गद्दार ठरवून तो आपली बढती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. तोच स्वतः त्या सैनिकांना रॅडक्लिफच्या फाळणीविषयीचे धोरणही सांगतो. या दोन्ही सैनिकांना आपला या देशातील राजकीय लोकांनी सत्तेसाठी वापर करून घेतला, हे लक्षात आल्याने ते दोघे ज्यांनी आपल्या मनात गैरसमज निर्माण करून जातीयतेची, अराजकतेची सीमा रेषा आखली, त्यांना तशीच ठेवायला सांगून आम्ही आमचे मुक्त मरण स्वीकारायला तयार आहे या बाण्यासह तारासिंगमार्फत गोळ्या झेलून मरण पत्करतात. म्हातारा जो गांधीजी आणि भगतसिंग या दोघांना मानणारा आहे, त्याला सर्वधर्म मान्य आहेत. तो त्याच तारासिंगचा नातू असून त्या दोघांच्या स्मरणार्थ बांधलेल्या चौकीचा चौकीदार या नात्याने मुजफ्फर आणि साहिल यांनाही आपल्यातील गैरसमजाची सीमारेषा पुसून टाकायला सांगतो. मनामनात खोदला गेलेला हा जातीयतेचा सुरुंग बुजायला सांगतो. अशी या नाटकाची कथा..अतिशय सुंदर आणि कोणाला सहसा माहीत नसलेली ही फाळणीबद्दलची कथा रसिकांसमोर आणण्याची कल्पनाच खूप छान होती. त्यात यशही आलेय.दिनेश माळी यांचे नेपथ्य, कुर्बान तडवी यांची प्रकाशयोजना, प्रज्ञा भिडे यांची रंगभूषा, भारत भूषण यांची वेशभूषा सरसच. मात्र सर्वात अव्वल राहिले ते सागर सोनवणे यांचे पार्श्वसंगीत उत्तमच. पूर्वार्धात दोन्ही सैनिकांमधील प्रसंग काहीसा लांबला गेला असे सारखा वाटलं. मात्र, प्रसंगानुसार प्रभावी संवादसोबत असल्याने ते झाकले गेले. त्याच प्रसंगात पाकिस्तानी सैनिकाने गोळीबार उलट्या बंदुकीने घाईने केला. या घाईने सूक्ष्म झालेल्या चुका ..मात्र प्रयोग एकदम टका टक|
 
 
उत्तम नाटक सादर करण्याचा उत्तम प्रयत्न आणि उत्तम यशही आलेय, असं म्हणण्यात काही हरकत नाही. नाटकास भावी निकालासाठी शुभेच्छा.. एक खंत एवढीच की, आज समीक्षकांना कथेचा सारांश दिला गेला नाही. सारांश हा लेखकाचा मूळ हेतू, आशय काय आहे, हे समीक्षकांना आणि परीक्षकांना कळावा, यासाठी असतो. तो तसाच्या तसा कोणी वृत्तपत्रात छापत नाही. याची दखल समन्वयक यांनी घ्यावी, ही विनंती.
 
@@AUTHORINFO_V1@@