पंजाबच्या गनी अलीने पटकावली ‘केशव केसरी’ गदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

श्रीराम रथोत्सव समिती व केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झाली कुस्त्यांची दंगल
मल्ल मुलींसह मुलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद, ३५० वर कुस्तीगीरांची उपस्थिती

 
 
जळगाव :
श्रीराम मंदिर संस्थान, रथोत्सव समिती आणि केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे २८ नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची भव्य दंगल अभूतपूर्व जल्लोषात सागर पार्कवर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेदरम्यान पार पडली. ५ लाख ५१ हजार रुपये बक्षीसांची भव्य कुस्ती दंगल झाली. त्यात हरियाणाचा महान भारत केसरी प्रवीणसिंह सोनीपत पहेलवान आणि पंजाबचा प्रसिद्ध मल्ल गनी अली यांच्यातील शेवटीची व मुख्य लढत आकर्षण ठरली. पण ती काही मिनिटात आटोपली.
 
 
यंदाच्या या शेवटच्या मानाच्या कुस्तीतील विजेत्या गनी अलीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्याहस्ते ‘केशव केसरी’ हा किताब देऊन ‘गदा’ बक्षीस स्वरुपात देण्यात आली. गनीला ५१ हजार रु. बक्षीसही देण्यात आले. दोन क्रमांकाची कुस्ती दिल्लीचा निर्मल देशवल पहेलवान आणि पंजाबचा हरीश डांगर पहेलवान यांच्यात झाली. निर्मलने बाजी मारली. तिसरी कुस्ती गनीचा भाऊ तालिब अली आणि चंदगीराम यांचा शिष्य हरियाणाचा जयदीप यांच्यात झाली. ती बरोबरीत सुटली. नामांकित ३७ जोड्या मैदानात उतरल्या होत्या.
 
 
प्रमुख लढतीतील जळगावातील नितीन गवळी आणि कल्पेश मराठे यांच्या रोमहर्षक कुस्तीत जळगावातील नितीन गवळी आणि कल्पेश मराठे यांच्या रोमहर्षक कुस्तीत कल्पेशने बाजी मारली.
 
 
राज्यासह अन्य राज्यातूनही प्रतिसाद
चाळीसगाव , भुसावळ, धरणगाव , जळगाव शहर ,एरंडोल, पाचोरा, अमळनेर,पारोळा, नशिराबाद, रावेर, रसलपूर , बीड , सिल्लोड, औरंगाबाद,जालना, रांजणगाव , हिंगोली, धुळे, नंदुरबार, अजिंठा, बुरहानपुर, खंडवा , हल्दा , पंजाब,हरियाणा, दिल्ली येथील एकूण सुमारे ३५० वर पहेलवान सहभागी झाले होते.
 
प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, कुस्ती प्रकल्प प्रमुख व प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित संचालक दीपक गजानन जोशी तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, श्रीराम रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, तसेच कुस्ती क्षेत्रातील अनुभवी, जाणकार पहेलवान या दंगलीच्या आयोजित आखाडा प्रमुख सुनील जगन्नाथ शिंदे (सुपडू पहेलवान), राहुल रमेश वाघ (सदस्य जिल्हा कुस्तीसंघ), कुस्ती समितीचे अध्यक्ष बापू तथा दिलीप आनंदा पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र रामदास सपकाळे आणि माधवराव कुळकर्णी, भरत भोईटे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
 
मुलींच्या लढती झाल्या चुरशीच्या...
मुलांच्या १०० वर लढती झाल्या. मुलींच्या सर्व ६ लढती सायंकाळी झाल्या. त्या चुरशीत ठरल्या. त्यात विशेषकरुन एरंडोल व बर्‍हाणपूरच्या मल्ल सहभागी झाल्या होत्या. त्यात बर्‍हाणपूरच्या एकाच वस्तादच्या ‘गुरु’ च्या ४ पहेलवान शिष्या होत्या. दोन्ही ठिकाणच्या या मल्लांनी ३-३ लढती जिंकत ‘दंगल’ चित्रपटाची आठवण करुन देत शौकिनांची जोरदार दाद मिळवली. प्रतिष्ठानच्या ‘समतोल’ प्रकल्पाचे प्रमुख दिलीप चोपडा यांनी त्यांना रोख बक्षिसे देत कौतुक केले.
 
१२ महिला पहेलवान
प्रमुख, लहान आणि महिलांच्या कुस्ती लढती मिळून१०० पेक्षा अधिक चुरशीच्या लढती झाल्या. या लढतीचे द्रोण कॅमेर्‍याद्वारे चित्रीकरण केले जात होते . तसेच दोन भव्य एलइडी वॉलवर लढत प्रेक्षक बघत होते . पोलीस अधिकार्‍यांच्या हस्ते काही लढती लावण्यात आल्या व पंच म्हणून त्या अधिकार्‍यांनीच भूमिका पार पाडली.
* ४० फूट व्यासाचा मातीचा आखाडा, एकाच वेळी लहान्यांच्या २,३,४ आणि मोठ्या गटाच्या २-३ कुस्त्या होत होत्या.
* ६० बाय ७५ फुटाचा डोम... एलईडी पडद्यावर लढती बघता येत होत्या.
* राज्यातून व अन्य राज्यांतूनही सुमारे ३५० मल्ल सहभागी. त्यात बालवयीन, युवा व प्रौढ कसलेल्या, नामवंतांचा समावेश
* एकूूण साडेपाच लाखांच्या बक्षिसांची लयलूट असेल. अन्य मान्यवरांनी आणि शौकिनांंनी दिलेल्या बक्षिसांची गणती नाही.
* खान्देश व मालेगाव परिसरात चॅनेल २६ वर दूरदर्शन केबल वाहिनीवरही लाईव्ह प्रसारण.
* मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभी बलोपासनेची देवता वीर हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वालन झाले. मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन तसेच श्रीफळ वाढविण्यात आले.
* पहेलवानांसह १५ जणांचे रक्तदान
* केशवस्मृती सेवा संस्था समूहातील माधवराव गोळवलकर रक्तपेढीतर्फे मोबाईल व्हॅनद्वारे रक्तसंकलन करण्यात आले. १५ जणांनी रक्तदान केले त्यात ६ पहेलवानांचा समावेश होता.
* अवघ्या १५ रुपयात भोजनसेवा
* परगावाहून आलेल्या व अन्य पहेलवान, शौकिनांसाठी अल्पदरात, अवघ्या १५ रुपयात भोजनसेवा मंडपाशेजारी करण्यात आली होती.
* सुमारे २५ ते ३० हजार प्रेक्षकांनी मैदान फुलून गेले होते. शेवटची काही मिनीट तर आखाड्याभोवती शेकडो शौकिनांनी गर्दी केली होती.
क्षणचित्रे....
* दुपारी २ वाजेपासूनच सागरपार्कवर वर्दळ.
* हलगी व डफाचा दणदणाट सुरु होता.
* गीता फोगाट या महिला कुस्तीगिराच्या जिद्द व यशोगाथेशी संबंधित ‘दंगल’ चित्रपटातील गाणीही वाजवली जात होती.
* राज्यातील अनेक ठिकाणाहून तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातीलही अनेक पहेलवान कुस्तीत स्पर्धेत सहभागी झाले होते.
* वाळूच्या गोण्या वर्तुळाकार रचून त्यात सुमारे २ फूट उंच व ४० फूट व्यासाचा वर्तुळाकार आखाडा पिवळ्या मातीने बनवला होता. संयोजकांच्या अचूकता, कल्पकतेचा तो प्रतीक ठरला.
* आखाड्यालगतच एका मंचावर बलोपासना व शक्ती, भक्ती आणि युक्तीची देवता वीर हनुमानाची प्रतिमा होती.
* आखाडा पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ झाला.
* मल्लविद्येत नावलौकिक मिळवू इच्छिणारे लहानमोठे मल्ल, आखाडाचालक तसेच कुस्ती शौकिन दुपारपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* विशेष म्हणजे जात, पात, धर्म आणि राजकारण विसरुन अनेक नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. मुस्लिम युवक आणि ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती.
* तुतारीच्या निनादात आणि भारत माता की जय, वंदे मातरम्, सियावर रामचंद्र की जय, या घोषणा देत कुस्त्यांना शुभारंभ झाला आणि तुतारीच्या निनादात कुस्त्या लावण्यात येत होत्या.
 * केशव स्मृतीसेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर तसेच जि.प.चे मुख्याधिकारी कौस्तुभ दिघेगावकर यांच्या हस्ते बालगटातील जळगावच्या राजू हरी कुंभार व भैया विलास हटकर यांचे पहिली कुस्ती लावण्यात आली. त्यात राजूने बाजी मारली.
 * आखाड्यात एकाच वेळी बालगटातील २-२, ३-३, ४-४ कुस्त्या रंगत होत्या.
* सायंकाळनंतर सारे मैदान लख्ख प्रकाशाने उजळून निघाले होते. आखाड्या भोवती प्रकाशझोत लावलेले होते. भव्य २ पडद्यावर आखाड्यातील झुंज पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
* आखाड्याच्या चारही बाजूने वर्तुळाकार बैठक व्यवस्था होती. मात्र शेवटी कुस्तीप्रेमींचा उत्साह एवढा वाढला की, आखाड्या भोवती शौकीनांनी बैठक मारली होती.
* विजेत्या मल्लांना मंचावर बोलावून ४ आकडी ते १०-२० रुपयांपर्यंत रोख बक्षीसे देण्यात येत होती.
* कुस्ती समितीतील पदाधिकारी तसेच जळगावसह जिल्ह्यातील गावोगावचे जुने, नवे पहिलवान तसेच मल्लविद्येत नावलौकिक मिळवू इच्छिणारे लहानमोठे मल्ल, आखाडाचालक तसेच कुस्ती शौकिन दुपारपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@